छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू आणि मराठी भाषा…🚩

(इतिहास अभ्यासक मालोजी जगदाळे).

पत्रलेखन आणि राजभाषेतील मराठीचे/मराठी शब्दांचे प्रमाण शिवपूर्वकाळात म्हणजे १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते.
शिवकाळात म्हणजे १६७७ मध्ये ६२.७ एवढे झाले. शाहूकाळात मराठी भाषेने कळस गाठला आणि इस १७२८ मध्ये हे प्रमाण ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या असलेल्या मराठीत तुर्की-अरबी-फ़ार्सी शब्द फक्त २९०० (२.९६%) आहेत.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याची स्थापना केली ‘तेव्हा राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फार्सी, अरबी, तुर्की- म्हणजेच या नव्या शब्दांना पर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यातूनच राज्याभिषेकानंतर (१६७४) त्यांनी ‘राज्यव्यवहार कोश‘ तयार करण्यासाठी रघुनाथ नारायण हणमंते या पंडिताची नियुक्ती केली. राज्यव्यवहार कोशाच्या दहा सर्गात १३८० फार्सी- दख्खनी उर्दू शब्द आले असून, त्यांच्या पर्यायी संस्कृत प्राकृत शब्द सुचविले आहेत.

यादरम्यानच्या काळात मराठीला संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यता मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केलं. त्याचप्रमाणे शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी अनेक ग्रंथांची  मोलाची भर घातली. नंतरच्या काळात मोरोपंत, कवी श्रीधर, निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ इत्यादींनी मराठी भाषेत, साहित्यात मोलाची भर घातली.

शाहूकाळात मराठा साम्राज्य उभे राहून मराठ्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य भारत येथे मजबूत ठाणी उभारली ज्यामुळे तेथील राजभाषा मराठी बनली आणि नंतरच्या काळात बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, तंजावर इ अनेक ठिकाणी मराठी भाषेचा मोठा प्रसार झाला. मराठा आणि मराठी यांची भारतभर ओळख छत्रपती शाहुमहाराजांमुळे निर्माण झाली.

ज्यामुळे आधुनिक राजकारणात सुद्धा राजभाषा म्हणून मराठी स्वीकारताना कोठेही उर्दू, फारसी, हिंदी भाषेचा टेकू घेण्याची गरज पडली नाही.

मराठी भाषा मोठी, राजमान्य आणि सर्वमान्य करण्यात जितका वाटा मराठी साहित्यिकांचा आहे, त्याहून मोठा वाटा हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा आहे.