मराठे पानिपत जिंकले असते तर

मराठे पानिपत जिंकले असते तर

पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ?

1. राजकीय परिणाम:
जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता आणि एक भक्कम मध्यवर्ती सत्ता म्हणुन प्रस्थापित होऊ संपुर्ण हिंदुस्थान त्याच्याखाली एकसंध झाला असता, एकच एक अशी मध्यवर्ती प्रशासकीय व्यवस्था निर्माण होऊ शकली असती/ झाली असती.

2.सामाजिक व सांस्कृतिक परिणाम:मध्यवर्ती मराठा शासनामुळे हिंदु संस्कृती आणि प्रथा यांचे अधिक जोमाने पुनरुज्जीवन देशभर झाले असते आणि विशेषत्वाने इथल्या संस्कृतीवर निर्माण झालेला मुस्लिम प्रभाव ओसरू लागला असता. परिणामस्वरूपी इथली सामाजिक वीण ( विशेषत्वाने उत्तरेतील ) बदलली असती आणि त्याचा इथल्या भाषा, कला व सांस्कृतिक प्रथांवर मोठा प्रभाव पडला असता.

3.आर्थिक परिणाम:
एकचएक मध्यवर्ती सशक्त सत्तेमुळे हिंदुस्थानचे व्यापारी धोरण व आर्थिक संबंध वेगळ्या प्रकारचे राहिले असते. 18 व्या शतकातील युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर भारत आणि आशियातून संपत्तीचे जे वहन युरोपात सुरु झाले त्याची दिशा आणि दशा कदाचित बदलली असती. त्यामुळे नंतरच्या सुमारे दीडदोनशे वर्षांच्या आर्थिक वसाहतवादी शोषणामुळे पश्चिमेकडील श्रीमंत जग आणि पुर्वेकडील भुकेकंगाल जग अशी जगाची जी आर्थिक विभागणी झाली कदाचित ती तशी झाली नसती, जागतिक आर्थिक विकासाचे डायनॅमिक्स बदलुन गेले असते.

4. आंतरराष्ट्रीय संबंध:
मध्यवर्ती मराठा सत्तेने युरोपातील विविध शक्तींशी वेग्वेगळ्याप्रकारचे आणि अधिक प्रभावी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले असते. त्यांच्या आपापसातील संघर्षाचा फायदासुद्धा त्या स्थितीत आपल्याला घेता आला असता परिणामी तिकडचे आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, शास्र आपल्याला मुत्सद्देगिरीने उपलब्ध झाले असते. त्याचा फार मोठा परिणाम आशियात येऊ घातलेल्या वसाहतवादावर झाला असता.

5.धार्मिक परिणाम:
इथल्या धार्मिक स्थितीवर फार मोठा परिणाम घडुन आला असता. हिंदु धर्म मध्यवर्ती भुमिकेत येऊन त्याचा फार मोठा प्रभाव इतर धर्मांवर निर्माण झाला असता.

6.क्षेत्रीय स्थैर्य आणि संघर्षांवरील परिणाम:
त्याकाळी विविध भागात विविध छोट्यामोठ्या राजवटी होत्या व त्या एकमेकांशी आणि मराठ्यांशीसुद्धा संघर्षरत असायच्या. निजाम, अवधचा शुजा, बंगालचा नवाब, राजपुतान्यांतील विविध राजवटी या सर्वांवर मराठी प्रभाव पानिपतापूर्वीच निर्माण झालेला होता, यातल्या काही राजवटी आल्रेडी मराठांकीत होत्या, चौथ आणि सरदेशमुखी देत होत्या, काही राजवटी या अपॉर्च्युनिस्ट धोरण बाळगत होत्या. मराठ्यांनी निर्णायक विजय मिळवल्यानंतर त्यांनी या सर्व परस्पर संघर्षावर मोठा प्रभाव निर्माण केला असता आणि त्यांच्या सीमारेषा, परस्पर व मध्यवर्ती सत्तेशी संबंध आणि हक्क यांची पुनर्रचना, स्थैर्य याबाबत स्थायी तोडगे निघत गेले असते.

7. आधुनिक भारताची निर्मिती:
परकीय सत्तांशी अधिक सक्षम मध्यवर्ती सत्तेने निर्माण केलेले अधिक सशक्त संबंधमुळे ज्ञान, तत्वज्ञान, सायन्स, तंत्रज्ञान याचे अधिक मोकळे आणि दोन्ही दिशांनी आदानप्रदान झाले असते परिणामी 18 व्या शतकाच्या उत्तरार्धातच किंवा 19 व्या शतकाच्या पुर्वार्धातच आधुनिकीकरणास सुरवात झाली असती.

एखादी घटना घडली असती तर तिने त्यांनंतरच्या भविष्यकाळात ( म्हणजे आताच्यासापेक्ष भुतकाळातच ) काय प्रभाव निर्माण केला असता याचे अनुमान लावणे तसे फार अवघड असते. पण पानिपतच्या युद्धामुळे तात्काळी अधिक प्रभावी होत असलेली आणि मध्यवर्ती भुमिकेत येत असलेली मराठी सत्ता काही काळ दुर्बळ आणि विस्कळीतही झाली, मराठा काँफीड्रसीं मध्ये परावर्तित झाली हि घटना प्रामुख्याने नंतर वसाहतवादास कारणीभुत ठरली. ते युद्ध वेगळ्या दिशेने गेले असते तर त्याचा निव्वळ देशावरच नव्हे तर देशाबाहेरही मोठा प्रभाव पडला असता हे निदर्शनास आणुन देण्याचा हा प्रयत्न आहे, याबद्दल अनेक मतं असु शकतात याची जाणीव आहे !

डॉ प्रशांत भामरे

Leave a Comment