शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण

भाग एक

भोसले कुळात सन १५३० मध्ये बाबाजी भोसले यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव रेवावू होते. त्यांना सन १५५० मध्ये मालोजी तर सन १५५३ मध्ये विठोजी नावाचे पुत्र झाले. मालोजींच्या पत्नींचे नांव उमाबाई व दीपाबाई होते. दीपाबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. वनगोजी नाईक निंबाळकर हे त्या काळातील नावाजलेले व्यक्ती होते. उमाबाई साठे घराण्यातील होत्या. मालोजी व उमाबाई यांना सन १५९४ मार्च १८ रोजी शहाजी, तर सन १५९७ मध्ये शरीफजी नावाचे पुत्र झाले. शिवभारतमध्ये मालोजीराजेंचा उल्लेख मराठा म्हणून केलेला आहे. बाबाजी भोसलेंना त्या काळी राजे ही पदवी निजामाकडून मिळालेली होती. तीच पुढे त्यांच्या जहागिरीसह मालोजीराजांकडे हस्तांतरित झाली. बाबाजीराजेंचा मृत्यू सन १५९७ मध्ये झाला. मालोजी राजेंना वडिलोपार्जित पुणे जिल्ह्यातील जहागीर मिळाली होती. मालोजी राजे वेरूळला राहात होते. तेथे त्यांच्याकडे मोठ्या भागाची निजामशाहीतील पाटीलकीही होती. मालोजीराजेंनी घृष्णेश्वराच्या मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धारही केला होता. श्री शिवशंकर हे भोसले कुळाचे कुलदैवत होते. मालोजीराजे व विठोजीराजेंकडे पुणे येथील मोठ्या जहागिरीसह दौलताबाद परिसरातील व निजामशाहीतील बरीच मोठी खाजगी जहागीर होती. मालोजीराजेंचे शौर्य व दबदबा यामुळे निजामशहा मालोजीराजेंना वचकून असे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून कवींद्र परमानंद यांनी शिवचरित्र लिहिलेले आहे. त्यात परमानंद मालोजीराजेंबाबत असा उल्लेख करतात की, “दक्षिण दिशेला श्रीमान मालवर्मा नरेश्वर (क्षत्रिय मालोजीराजे ) सूर्यवंशात जन्माला आले. ते स्वतः सूर्यासारखेच तेजस्वी होते.” मालोजी राजे महाराष्ट्रात राज्य करणारे, प्रसन्न मनाचे आणि आपले कर्तव्य पार पाडण्याच्या बाबतीत धुरंधर राजे होते. पुणे प्रांतात वास्तव्य करताना त्यांनी भीमा नदीच्या काठी आपल्या राज्याचा विस्तार केलेला होता. ते अत्यंत समृद्ध, बुद्धिमान व पराक्रमी असून त्यांना स्वतःलाही वडिलोपार्जित राज्य मिळाले होते तर राजे ही पदवी होती. सन १६०६ मध्ये इंदापूर येथील एका लढाईत मालोजीराजे मारले गेले. शहाजी व शरीफजी यांच्या पालनपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी आई उमाबाई व काका विठोजी यांच्यावर आली. पुढे सन १६२१ मध्ये विठोजींचा मृत्यू झाला. भोसले घराणे मूळचे वेरूळचे होते. वेरूळकर भोसलेंचा बाबाजी राजेंपासूनचा इतिहास शौर्याचा, स्वाभिमानाचा व मानवतेचाच होता. त्यांना स्वतंत्र निशाण ‘भगवा ध्वज’ वापरण्यास मुभा होती. निमाजशहाच्या दरबारी मोठा सन्मानही होता. 

दक्षिणेतील यादवांचे साम्राज्य बुडाले होते. सन १३१५ नंतर काही यादव आपापल्या शौर्य व कौशल्यांच्या बळावर बाहेर पडले. कालांतराने यादवचे जाधव झाले. यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज चंद्रवंशी मानत. यापैकी गोविंद देव (इ.स. १३३६ ते १३६०), ठाकूरजी (इ.स. १३८० ते १४४०), भूतजी (इ.स. १४४० ते १५००), अचलोजी जाधव (इ.स. १५०० ते १५४०), विठोजी जाधव (इ.स. १५४० ते १५७०) प्रमुख होते. विठोजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र लक्ष्मणसिंह ऊर्फ लखुजी जाधव वडिलोपार्जित ५००० ची मनसब व देशमुखी वतनावर आले. लखुजीराजेंचा जन्म सन १५५० चा असावा. अशा रीतीने केवळ विसाव्याच वर्षी लखुजी निमाजशाहीतील मानाचे सरदार झाले. लखुजींच्या वडिलांचे नाव विठोजी जाधव तर आईचे नाव ठाकराई राणी होते. लखुजींना एक लहान बंधू होते. त्यांचे नाव जगदेवराव. फलटणचे वंगोजी नाईक निंबाळकर पवार यांच्या घराण्यातील म्हाळसाबाईंशी लखुजींचा विवाह झाला होता. लखूजी राजेंना दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादूरजी हे चार पुत्र तर जिजाऊ ही एक सुकन्या होती. लखुजींनाही निजामशाहीत बहुमानासह राजे पदवी प्राप्त होती. पुढे स्वपराक्रमावर लखुजी राजेंना बऱ्हाडातील सिंदखेडराजाची देशमुखी प्राप्त झाली. तेथे त्यांनी स्वतंत्र राजवाडा बांधून सन १५७६ पासून राहू लागले. सिंदखेडला दहा हजार सैन्यांसह राहू लागल्यामुळे सिंदखेडची भरभराट होऊ लागली. एकेकाळी सिंदखेडची लोकसंख्या पंचेचाळीस हजारांवर पोचली होती. लखुजी राजेंच्या वैभवामुळे सिंदखेडचे नाव बदलून सिंदखेड राजा झाले. 

मालोजीराजे भोसले व लखुजी राजे जाधव दोघेही समवयस्क होते.. रुबाबदार शरीरयष्टीचे होते. दोघेही आपापल्या शूर वडिलांनी कमावलेल्या वतनावर ऐन तारुण्यात आलेले होते. एवढेच नव्हे तर दोघांनीही आपापली बहादूरकी निजामशहासमोर प्रदर्शित करून आपले राजेपद व स्वतंत्र बाणाही राखला होता. याशिवाय दोघेही त्यावेळच्या सुप्रसिद्ध वनगोजी नाईक निंबाळकर पवार घराण्याशी रक्ताच्या नात्याने जोडलेले होते. दोघांच्याही बायका निंबाळकर घराण्यातील होत्या. यामुळे दोघांचेही राजकीय तसेच कौटुंबिक संबंध होते. वेरूळ व सिंदखेड राजा असे ओलाव्याने एकमेकांत गुंफलेले होते.. दोघांचाही एकमेकांस भक्कम आधार होता. दोघे एकत्र दरबारात ज्या स्वाभिमानाने, रुबाबाने व आत्मविश्वासाने वागत होते, ते पाहून प्रत्यक्ष निजामशहा अस्वस्थ होत असे. 

वेरूळकर भोसल्याकडे सिंदखेडकर जाधवरावांचे वा सिंदखेडकर जाधवरावांकडे वेरूळकर भोसल्यांचे कारणाशिवायही बरेचदा येणे-जाणे होत असे. दोन्ही कुटुंबातील नाते व स्नेह यामुळे घट्ट होत असे. दोन्ही कुटुंबात बालगोपालांचा राबता होता. सणासुदीला एकत्र आल्यास महिना-पंधरा दिवस राजवाडा चिमुकल्यांच्याच ताब्यात असायचा. खेळण्याशिवाय ही चिमुरडी मंडळी बुजुर्गांसारखीच खलबतेही करत. सदरेवरील कामकाज समजून घेत. अशाच काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी मालोजीराजे सहकुटुंब – उमाबाई, शहाजी, शरीफजीसह सिंदखेड राजास आले होते. वर्ष १६०५ असावे. राजवाड्यात व बागेत सर्व मुले खेळत होती. भोसले व जाधवराव कुटुंबही मुलांच्या बागडण्याचा आनंद उपभोगत होते. नेमके योगायोगाने बाल शहाजी व बाल जिजाऊ त्याच वेळी सोबत हातात हात घालून भोसले व जाधवराव कुटुंब बसले होते तेथे आले आणि आपापल्या आईजवळ बिलगून बसले. थोड्या वेळाने पुन्हा उठून सवंगड्यांमध्ये खेळायलाही गेले. शहाजीचे वय होते अकरा वर्षे, तर जिजाऊंचे वय होते सात वर्षे. अल्लडपणाने धावणाऱ्या त्या लेकरांचा निरागसपणा डोळ्यांत साठवतानाच, म्हाळसाराणीने उमाबाईकडे पाहात आनंद व्यक्त केला. दोघींची नजरभेट झाली. मायेची नजर एकमेकीस समजायला वेळ लागला नाही आणि पाहता पाहता – ध्यानीमनी नसताना शहाजी व जिजाऊंचा विवाह निश्चित झाला. वेरूळकर भोसले व सिंदखेडकर जाधवराव व्याही व्याही झाले. दोन्ही कुटुंबात आनंद झाला. याच आनंदात मालोजीराजे वेरूळला परतले. लग्नाबाबत चर्चाही सुरूच होती; परंतु अचानक बादशहाने मालोजीराजेंना इंदापूर परिसरातील बंडाळीविरोधात कारवाईसाठी पाठविले. पुढे दुर्दैवाने सन १६०६ मधील या इंदापूरच्या लढाईत मालोजीराजेंना मृत्यू आला. त्यामुळे शहाजी-जिजाऊ विवाह पुढे सन १६१० मध्ये वेरूळ देवगिरी परिसरात लखूजी राजेंनी निझाम बादशहाच्या उपस्थितीत थाटामाटात पार पाडला. शहाजी जिजाऊ विवाह जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. इतिहास व इतिहास निर्मात्यास जन्म देणारा ठरला. 

शहाजीराजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी वेरूळ येथे भोसले गढीवरील वाड्यात झाला. वडिलांचे नाव मालोजीराजे, तर आईचे नाव उमाबाई. शहाजीराजेंचे रूप अत्यंत राजबिंडे होतेच, पण शरीरयष्टीही रुबाबदार होती. मालोजीराजेंनी शहाजीस सर्वच क्षेत्रातील अत्याधुनिक शिक्षण दिले होते. मालोजीराजेंच्या मृत्यूसमयी शहाजी अकरा वर्षांचेच होते. तरीही निजामशहाने बाल शहाजीस वडिलोपार्जित मनसब व जहागीर दिली. 

काका शरीफजी व आई उमाबाईंनी शहाजीस जगातील एक महान योद्धाच नव्हे, तर महान भाषातज्ज्ञ, महान राजनीतीज्ञ, महान कलोपासक, महान द्रष्टा, महान लोकनेता, महान पिता बनविले. 

शहाजीराजांचे कौटुंबिक जीवन जिजाऊसोबतच्या विवाहाने सुरू झाले सासरे व जावई निजामशाहीत होते. शहाजी जिजाऊ यांना एकूण सहा अपत्ये झाली होती; परंतु दुर्दैवाने थोरले संभाजी (जन्म १६२१) व लहाने शिवाजी (जन्म १६३०) जगू शकले. शहाजी महाराजांचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाई यांचेसोबत (१६२६) झाले होते. तुकाईपासून त्यांना व्यंकोजी नावाचा पुत्र झाला होता. मोगल-आदिलशहा शहाजी तहानुसार शहाजीराजे सन १६३६ नंतर कर्नाटकात सर्वच कुटुंबासह गेले. थोरले पुत्र संभाजी कनकगिरीच्या लढाईत (१६५५) मारले गेले. जिजाऊ व शिवाजी सन १६४२ दरम्यान महाराष्ट्रात परतले. स्वराज्य निर्माण करून छत्रपती झाले. 

व्यंकोजींनीही तंजावरला मराठा राज्य स्थापन केले. तंजावरचे साम्राज्य सतराव्या शतकातील जगातील अत्यंत भरभराटीसह उत्तम भाषिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला- संगीत क्षेत्रातील जागतिक केंद्र होते. मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळम, तमिळ या भारतीय भाषांसह फ्रेंच, इंग्रजी अशा भाषांचे आश्रयस्थान होते. जगातील प्रसिद्ध सरस्वती ग्रंथालय तंजावरला होते. संगीत, नाटक यांचे प्रेरणास्थान होते. सर्वच क्षेत्रातील कलाकार तंजावरला माहेरघरच मानत असत. सर्वच राजे व राजपुत्र विविध क्षेत्रात निपुण होते. राजपुत्र शहाजीराजे यांनीच मराठी भाषेतील पहिले नाटक पंचभाषाविलास लिहिले व सादर केले होते. पुढे महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेले मराठी नाटक ‘तृतीय रत्न’ व ‘पंचभाषाविलास’ यात बरेच साम्य आढळते. 

आजही तंजावर एक महान वारसा जपत आहे, परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील मराठा राज्यकर्ते, संशोधक, अभ्यासक, विद्वान तिकडे जात नाही. परिणामी एक वारसा आमच्या पूर्ण दुर्लक्षितपणामुळे भ्रष्ट होत आहे. महाराष्ट्रातील मराठा युवकांनी मुद्दाम महाराष्ट्राबाहेरील मराठा समाजासोबत संबंध वाढवलेच पाहिजेत. तसे होत नसल्यामुळे तिकडील मराठा समाज आरएसएससारख्या मराठा-बहुजनविरोधी संघटनांच्या भ्रष्ट प्रचारास भुलत आहेत. यानिमित्ताने आपण आज जागृत राहणे गरजेचे आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आल्यास हाती तलवार घेऊन व घोड्यावर बसून येणार नाहीत तर अत्याधुनिक नॉलेज पॉवर व आर्थिक पॉवरचे सत्तादीश म्हणूनच येतील. याच कारणांमुळे राजकीय स्थैर्य व गरज म्हणून शहाजीराजे राजकीय सोय व अंतिम सुरक्षा याचा अंदाज घेत निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही; तर कधी स्वतंत्र बंडखोरी करून वाटचाल करत होते. 

सन १६३२ दरम्यान निजामशाहीत पेच निर्माण झाला होता. बुडती निजामशाही वाचविण्यासाठी शहाजीराजांनी बाल मुर्तझास मांडीवर बसवून सुमारे साडेतीन वर्षे स्वतंत्र कारभार पाहिला. याप्रसंगी काही काळ जिजाऊ, संभाजी, शिवबा, शहाजीराजेसोबतच होते. बाल शिवाजीच्या मनात स्वराज्य बीजारोपण करण्यात हा काळ खूप महत्त्वाचा ठरला आहे. सर्वच पुत्रांना याचा फायदा झाला. जिजाऊ व शहाजी यांना भविष्यातील संघर्षाबाबत विचार करण्यास शहागडवरच्या वास्तव्याचा फायदाच झाला होता. पेमगढ किल्ल्याचे नामकरण शहागढ करून तेथे स्वतंत्र राजधानी स्थापन केली होती; परंतु मोगल व आदिलशहा एक होऊन शहाजीराजांना तह करण्यास भाग पाडले. हाच १६३६ चा तह. शहाजीराजांचे हे राजकारण यशस्वी झाले असते तर कदाचित सन १६३६ मध्येच शहाजीराजे स्वराज्य संस्थापक होऊन छत्रपतीही झाले असते. तो प्रयत्न त्यांनी पुढेही कर्नाटकात आदिलशाहीत असताना दोनदा – सन १६४९ व सन १६५९ केला होता. अफझलखानाच्या हातून प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवबा मारले गेल्यास सरळ विजापूरवरच हल्ला करून आदिलशाही जिंकून स्वराज्याची स्थापना करण्याचा बेत त्यांनी आखला होता; परंतु त्यांची स्वराज्य संकल्पना पुढे पुत्र शिवाजीने सन १६७४ मध्ये राज्याभिषेक करून प्रत्यक्षात आणली. 

शहाजी राजेंच्या कार्यकर्तृत्व व थोरवीबद्दल अनेक समकालीन लिखाण उपलब्ध आहे. अनेक चरित्रकारांनी शहाजीराजांची विविध वैशिष्ट्ये मांडलेली आहेत. परकीय इतिहासकारांनीही मोगल, आदिलशाही इत्यादी शहाजीराजांबद्दल गौरवपर लिखाण केलेले आहे. इतिहासाच्या भाषेत शहाजीराजे मराठेशाहीचे जन्मदाते होते. शहाजी जिजाऊ हेच स्वराज्य संकल्पक होते. शहाजी राजांच्या दरबारात जवळपास ऐंशीपेक्षा जास्त विविध विषयांचे मातब्बर जाणकार पंडित असत. शहाजीराजांचे सुमारे पस्तीस भाषांवर प्रभुत्व होते. एवढ्या भाषा जाणणारे ते आतापर्यंतचे एकमेव इतिहास पुरुष आहेत. मराठेशाहीत गनिमीकावा, अत्याधुनिक युद्धनीती, राजनीतीला नीतितत्त्वांची जोड व लोक कल्याणासाठी स्वराज्य अशी तत्त्वे रुजविण्यात शहाजी – जिजाऊंचा पुढाकार होता. शहाजीराजांच्या दरबारातील कवी जयराम पिंडे यांनी शहाजीराजांमधील सद्गुणांची तुलना करताना म्हटले आहे की, “शहाजीराजांचे शौर्य अर्जुनासारखे, औदार्य विक्रमादित्यासारखे, तर नवनवे ज्ञान ग्रहण करण्याची प्रवृत्ती भोजराजा सारखी होती.” शहाजीराजांनी जिजाऊ, तुकाई, संभाजी, शिवाजी, व्यंकोजी यांनाही शस्त्र व शास्त्रामध्ये पारंगत केले होते. तंजावर (तामिळनाडू) येथील मराठेशाहीतील कला, साहित्य, शिल्प, नाटच, भाषा इत्यादी क्षेत्रातील पुरातन अवशेष शहाजी महाराजाच्या दूरदृष्टीचे द्योतक आहेत.

शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण  पुरुषोत्तम खेडेकर 

(भाग-दोन) 

छत्रपती संभाजीराजे यांनी बुधभूषणम् या आपल्या संस्कृत शहाजी राजांवरे गौरवपर लिहिलेले आहे. 

भृशदान्वय सिन्धू सुधाकरः प्रथितकीर्ती रुदारपराक्रमः।अभवर्तकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः । 

अर्थ : ‘पृथ्वीतलावरील सामर्थ्यवान, अष्टवसूमध्ये श्रेष्ठ किंवा प्रत्यक्षात शिवच असणारे शहाजीराजे, कीर्तिवान, पराक्रमी, उदार तसेच कलागुणसंपन्न आणि राजकारणामध्ये पारंगत होते. अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपश्रेष्ठ गुणसागरावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. असे सिंधू सुधाकरासारखे महाबलशाली, कीर्तिवान, पराक्रमी, उदार व अर्थकलामध्ये प्रवीण असे एकमेव राजे शहाजी होऊन गेले. 

असे सर्वगुणसंपन्न शहाजीराजे कर्नाटकातील होदेगिरी येथील आदिवासी बांधवांना नरभक्षक वाघापासून सुरक्षित करण्याच्या निमित्ताने नरभक्षक वाघांची शिकार करण्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आले होते; परंतु घनदाट जंगलात घोड्याचा पाय एका नाल्यातील वेलीत अडकला. शहाजीराजे घोड्यावरून फेकले गेले. मोठ्या दगडावर डोके आपटून प्रचंड रक्तस्त्राव झाला. २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजेंचा मृत्यू झाला. त्यावेळी जिजाऊ राजगडावर, तर शिवाजी सुरतच्या स्वारीवर होते. शहाजीराजेंची समाधी होदेगिरी येथे (जिल्हा-दावणगेरे, कर्नाटक) आहे. मूळ व्यंकोजीराजेंनी बांधलेल्या शहाजीराजांच्या समाधीच्या देखभालीसाठी आदिलशहाने शेजारची गावे दिलेली होती. स्वतंत्र भारताचे तत्त्कालीन कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५५ दरम्यान नूतनीकरण केले होते. सध्या मराठा गोसावी मठ बेंगळूर समाधीची देखभाल करत आहे. शहाजीराजेंच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मराठेशाहीचे आज सातारा, तंजावर, कोल्हापूर, नागपूर असे भोसले घराणे आहेत. स्वराज्याची मूळ राजधानी किल्ले रायगड जवळपास ओस पडलेली आहे. अशा “या मराठेशाहीच्या व आजच्या भारताचे संस्थापक संकल्पक शहाजीराजांबद्दल मराठा समाज बेफिकीर आहे. शहाजी महाराज समाधीसाठी कर्नाटक सरकार दरवर्षी निधी देत असते. गेले पाच वर्षे होदेगिरी येथे मराठा सेवा संघ कर्नाटक शाखा व मराठा गोसावी मठ बंगलोर माध्यमातून तीन दिवसांचा महोत्सव २१, २२ व २३ जानेवारीस दरवर्षी संपन्न होत आहे. महाराष्ट्र शासन तंजावर,ग्रंथात

होदेगिरी, कुषकगिरी, बंगलोर, जिंजीबाबत उदासीन आहे; सामान्य मराठा युवकांना महाराष्ट्राबाहेरील या मराठा साम्राज्याचा अतीव अभिमान आहे. परंतु त्यांच्या आर्थिक मर्यादा आहेत तर शहाजीराजेंचे वारस याबाबत अनभिज्ञ आहेत. आजच्या शिवप्रेमी रयतेने त्यांचा केवळ मानसन्मानच करावा अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. परिणामी मराठा इतिहासाचे साक्षीदार उद्ध्वस्त होत आहेत तर गुलामीचे प्रतीक असे अनेक स्थळे जागतिक सन्मानाचे मानसन्मान धारण करत आहेत. सामान्य शिवप्रेमी आज सत्ताहिन वा संपत्तीहिन आहेत तर सत्ता, संपत्ती, राजकीय सत्ताधीश असलेले अनेक वारसदार पूर्ण बेफिकीर आहेत. त्यांना त्यांच्या पूर्वजांचा खरा इतिहासच माहिती नाही. तो समजून घेण्याची त्यांची इच्छा नाही. परिणामी त्यांचे अज्ञान व समाजावर असलेला प्रभाव दुर्दैवाने बहुजन मावळ्यांना घातक ठरेल अशाच विध्वंसक शक्तींना पोषक व पूरक ठरत आहे. जणू काही काळच मराठा-बहुजन समाजावर रूसला आहे. या दुरवस्थेला दूर करण्यासाठी आपल्याला नवीन स्वराज्य लोकशाही मूल्यांचा आदर ठेवून, ताब्यात घेऊन कल्याणकारी शिवराज्य निर्माण करावे लागेल. हीच शहाजी महाराजांना आदरपूर्वक शिवांजली ठरेल. 

शहाजीराजांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच त्यांची प्राणप्रिय जिवलग सखी-पत्नी जिजाऊ होत. जिजाऊंचा जन्म लखुजीराजे जाधव व म्हाळसाराणी यांच्या पोटी दिनांक १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा येथील भव्य राजवाड्यात सकाळी सूर्योदयसमयी साधारण सहा वाजता दरम्यान झाला होता. माता म्हाळसाराणी व काका जगदेवरावसह ज्येष्ठ बंधू दत्ताजी यांनी जिजाऊस औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासह सर्वच शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, भाषा, मैदानी खेळ, राजनीती, पत्रव्यवहार, घोडसवारी इत्यादी क्षेत्रांत वयाच्या दहाव्या वर्षीच तरबेज केले होते. शहाजीराजांशी विवाह होऊन पुढे जिजाऊ स्वराज्याची प्रेरक शक्ती बनल्या. शहाजीराजांच्या जीवनातील धावपळीत, अडीअडचणीत, अत्यंत कठीणप्रसंगी जिजाऊंनी धीर न सोडता शहाजीराजांना सर्वतोपरी बळ व मानसिक आधार दिला. विजापूर दरबारातील खंडागळे हत्ती प्रकरणप्रसंगी गैरसमज वा अहंगंडातून थोरले बंधू दत्ताजी तर चुलत दीर संभाजी मारले गेले. वडिलांनी पुत्रवियोगाचा राग नवऱ्यावर काढला. भातवडीच्या लढाईत बाका प्रसंग उभा राहिला. शहाजींना उसंत नाही. जिजाऊ चारचौघीसारखे वाड्यातील बंदिस्त जीवन जगण्यास तयार नाहीत. सर्वच दगदग व तिचे होणारे सर्वच दुष्परिणामही जिजाऊंनी स्वेच्छेने स्वीकारले. वडील लखुजी राजे, बंधू व भाच्यांची निजामशहाने दगाफटका करून २५ जुलै १६२९ रोजी देवगिरी येथे हत्या केली. संसार व मुलांचे संगोपन आणि स्वराज्य संकल्पना व स्वराज्य निर्मिती याची सांगड घालता घालता चार अपत्य मृत्युमुखी पडली. थोरले संभाजी व लहानगे शिवाजीच जगले. विनय, प्रेम, कर्तव्य, दृढनिश्चय, त्याग, तपस्या, प्रचंड महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास इत्यादी सद्गुणांची साक्षात मूर्ती म्हणजेच जिजाऊ होत. जिजाऊंच्या अंगच्या या गुणांमुळेच मराठेशाही व स्वराज्य उभे राहू शकले असे अनेक इतिहासकार व चरित्रकार मानतात. जिजाऊ ह्या शहाजींच्या पत्नी, संभाजी व शिवाजीच्या आईपेक्षाही सर्वांसाठी प्रेरणा होत्या. म्हणूनच त्या जिद्दीने बाल शिवबास घेऊन बेंगळूर-कर्नाटक येथून भोसलेंच्या वडिलोपार्जित पुणे जहागिरीत आल्या. शहाजीराजेंच्या सोबत व मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पुत्र संभाजी व सावत्र पुत्र व्यंकोजी यांनी दक्षिण जिंकावी. “शिवबाला घेऊन मी उत्तरेत स्वराज्याचा विस्तार करेन. योग्य वेळी दक्षिण व उत्तर एक करून आम्ही अखंड भारत स्वराज्यात सामील करू. सर्व परकीय शक्तींना हाकलून लावू.” एवढी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या त्या इतिहासातील एकमेव स्त्री आहेत. 

अनोळखी प्रदेशाचा विचार न करता जिजाऊंनी मावळ व मावळे जोडले. सामान्य शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील मुलांना पोटाशी धरून शिवबाच्या हवाली केले. धर्म जात – पंथ – जमात न पाहता मावळ्यांना प्रोत्साहन दिले. बाल शिवबास जहागिरीचा मोकासा देऊन लोककल्याणकारी कामास सुरुवात केली. स्वराज्य निर्मितीस उपयोगी राजकारण केले. कामास सुरुवात केली. त्यातून शिवाजीचे विवाह निंबाळकर, मोहिते, पालकर, इंगळे, शिर्के, गायकवाड, विचारे, जाधव घराण्यांतील मुलींशी केले. स्वराज्य निर्मिती हाच एकमेव ध्यास होता. त्यासाठी त्यांनी स्वतःचा पुत्र शिवाजीस संपूर्ण विचारानिशी पणाला लावलेले होते. यातूनच शिवाजीस जन्मभर मृत्यूच्याच दाढेत जगावे लागले. पन्हाळगडावर शिवाजी अडकलेले असताना जिजाऊ स्वतः घोड्यावर बसून हाती तलवार घेऊन फौजेसह वेढा उठविण्यासाठी निघाल्या होत्या. १४ मे १६५७ रोजी सईबाईच्या पोटी नातू संभाजीचा जन्म झाला. त्यावेळी शिवाजी महाराज मोहिमेवर होते. उसंत मिळताच काही मावळे सोबत घेऊन महाराज पुत्राचे मुख पाहण्यासाठी पुरंदरवर आले होते. तयार होऊन भेटीचा निरोप दिला. महाराज एकटे बाळ-बाळंतिणीस भेटण्यासाठी पोहोचले. सवंगडी मावळे बाहेरच थांबले. जिजाऊंनी मावळे सोबत का आले वा आणले नाहीत विचारले. महाराजांच्याही ही बाब लक्षात आली नव्हती. तेव्हा जिजाऊ शिवबास म्हणाल्या, बरे झाले. तुम्ही नवरा-बायको थोडे निवांत बोला. जिजाऊ बाहेर आल्या. मावळ्यांनी जिजाऊंभोवती गराडा घातला. जिजाऊंनी त्यांची खुशाली विचारली. त्यांना गोड गूळ-दाणे दिले. थोडा वेळ मावळ्यांसोबत घालविला. मोहिमांबद्दल त्यांच्या अंगावरून मायेचा हात फिरवला. नि सर्वांना बाळ- बाळंतिणीस भेटण्यास चालण्यास सांगितले. मावळे एकमेकांकडे पाहात खाणाखुणा करू लागले. जिजाऊंना या मूक खुणाबद्दल उत्सुकता होती. त्यांनी पुन्हा सर्वांना चला लवकर चला म्हणाले. तेव्हा मावळ्यांनी तोंड उघडले. प्रत्येकजण आपले नाव व जात सांगून आपण अस्पृश्य समाजातले महार, मातंग, तर कोणी आदिवासी रामोशी, कोळी, धनगर तर कोणी आपण मुसलमान असल्याचे, कुंभार-लोहार, न्हावी अशा जातीनिशी बोलू लागले. त्यामुळे आम्ही वाड्यात प्रवेश करू शकत नाही. असे साधारणपणे बोलू लागले होते. हे ऐकून जिजाऊ अस्वस्थ झाल्याच. पण जरा रागानेच सर्वांना उद्देशून बोलल्या, तुम्हाला कोणी सांगितले की, तुम्ही बाळ-बाळंतिणीस भेटीसाठी वाड्यात येऊ शकत नाही ? मावळे निरुत्तर झाले. आम्हीच बाहेर थांबून शिरस्ता पाळला असे सांगू लागले. हे ऐकून जिजाऊंनी सर्वांना समजावले. स्वराज्यात धर्म-जात- स्पृश्य-अस्पृश्य- पवित्र – अपवित्र मानत नाहीत. आणि शंभूबाळ हे स्वराज्याचे सुपुत्र आहेत. तुम्ही सर्व शंभूबाळाचे पालक आहात. असे म्हणत जिजाऊंनी सर्व मावळ्यांना सोबत वाड्यात नेले. बाळ व बाळंतिणीची भेट घडवून आणली. मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नंतर सर्वांना जिजाऊंनी पोटभर जेवण दिले. वरून सांगितले स्वराज्यात पोटभर जेवत जा. धडधाकट राहिले पाहिजे. सर्वांच्या अंगावरून मायेचा हात फिरवत जिजाऊंनी त्यांना निरोप दिला. अशाप्रकारे जिजाऊ लहान लहान प्रसंगातून समाजसुधारकांचे काम करत होत्या. संभाजीलाही जिजाऊंनी बापसे बेटा सवाई या अंगाने सर्वच क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ राजपुत्र बनविले. या व अशाच अनेक खडतर प्रसंगानंतर दि. ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक संपन्न झाला. जिजाऊंचा संकल्प पूर्ण झाला. शिवबा छत्रपती शिवाजी महाराज झाले. रयतेचे राज्य स्वराज्य उभे राहिले. लोककल्याणकारी लोकशाहीस्वरूप मराठेशाही जन्मास आली… पण जिजाऊंचे दैवत शहाजी महाराज हयात नव्हते. 

शिवराज्याभिषेकाचा परमोच्च आनंद डोळ्यात साठवून या रयतेच्या मातेने, जगन्मातेने, राष्ट्रमातेने जिजामाताने दि. १७ जून १६७४ रोजी किल्ले राजधानी रायगडच्या पायथ्याशी पाचाडच्या राजवाड्यात अखेरचा श्वास घेतला. स्वराज्य व शिवबा पोरके झाले. जागतिक इतिहासात राजनीतिज्ञ, योद्धा, भाषातज्ज्ञ, स्वराज्य संकल्पक व निर्माती, एक महान स्त्री इत्यादी विविध अंगांनी जिजाऊंचे स्थान निर्माण झालेले आहे. शहाजी राजेंच्या दरबारातील कविश्रेष्ठ जयराम पिंडे यांनी जिजाऊंबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी केलेली रचना अशी आहे. 

जशी चंपकेशी खुले फूल जाई । भली शोभली जयास जाया जिजाई ।। 

जिचे किर्तीचा चंबू जंबू द्विपाला । करी साऊली माऊलीसी मुलाला ॥ 

अर्थ: एखादा मोठा बगीचा फुललेल्या जाईच्या फुलांच्या ताटव्याने खुलून जातो, त्याचप्रमाणे जिजाऊंच्या रूपाने शहाजी राजांचे जीवन सुशोभित झाले होते. असे असले तरी केवळ शहाजी राजांची पत्नी हीच जिजाऊंची ओळख नव्हती. जिजाऊंच्या वैयक्तिक कार्याचा, कर्तृत्वाचा, व्यक्तित्वाचा गौरव सर्वदूरपर्यंत (जंबू द्वीप) व सर्व दिशांमध्ये आदराने होत असे. अशा जिजाऊंनी सावली होऊन आपल्या सुपुत्राला सर्वच प्रकारची सोबत व शिक्षणही दिले. आई म्हणून शिवबावर सावलीसुद्धा धरली. जिजाऊंचा जन्म म्हणजेच माहेरघर विदर्भातील सिंदखेड राजा. दुष्काळी माळरानाचा भाग. पाऊस फार तर ५०० मि.मी. सासर वेरूळचे म्हणजे मराठवाड्यातील. बऱ्यापैकी डोंगराळ भाग, नगर, शिवनेरी, पुणे, माहुली, प्रतापगड, राजगड, महाबळेश्वर. संपूर्ण सह्याद्री. सुमारे तीन हजार मि.मी. पाऊस. पश्चिम घाट, पश्चिम महाराष्ट्र. तर अखेर किल्ले रायगड- पाचाड. कोकण प्रचंड पाऊस. सुमारे ६००० मि. मी., जिजाऊंचे जीवन व कार्य हा आजच्या महाराष्ट्राचा साक्षात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैचारिक ठेवाच आहे. स्वराज्याच्या प्रेरणा, स्वराज्याच्या संकल्पक व निर्मात्या, दोन छत्रपती घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या व्यक्तित्वाच्या प्रभावापुढे गागाभट्टही थक्क झाले होते. त्यांनी जिजामातेचा आदर करताना शिवराज्याभिषेक प्रसंगी खालील उद्गार काढले होते 

“कादंबिनी जगजीवनदान हेतु: । सौदामिनीत्व सकलही विनाशेजाय ।। 

आलंबिनी भवति राजगिरे दिदानी । जीजा भिदाय जयती शहाबकुटुंबिनीसा ॥” 

अर्थ : आकाशात पाण्याने भरलेल्या ढगांचा थवा पृथ्वीवर पाणी होऊन (संदर्भ : शिवराज्य प्रशस्ती: गागाभट्ट) बरसतो. त्या पाण्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना जीवनदान मिळते. त्याचप्रमाणे सर्वच रयतेच्या जीवनात आनंद फुलविणारी, वीज ज्याप्रमाणे अंधारासह सर्वच शत्रूंना सहजासहजी विनाश करण्यात यशस्वी होते, 

तद्वतच जनसामान्यांना सर्व प्रकारची सुरक्षितता प्रदान करण्यात अग्रेसर असणारी, रयतेच्या कलागुणांना सदा राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देणारी, तसेच जिने जिजाऊ हे नाव धारण केलेले असून जिच्या हृदयामध्ये रयतेसाठी सतत कुटुंबवत्सलता वास करते आहे, अशा राजमाता जिजाऊंचा जयजयकार असो. • जिजाऊंचे राजकारण म्हणजेच स्वराज्याची निर्मिती. जिजाऊंनी आयुष्यात 

व्यक्त केलेला निर्धार पूर्ण केला. स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. ऐन विशीत भाऊ व चुलतदिरांच्या हत्या पचवल्या. स्वतःची चार अपत्ये स्वराज्याच्या धावपळीत गमवावी लागली. स्वतःचे वडील, भाऊ, भाचे असे चार महाबलवान आप्तेष्टांसह इतर मराठे निजामशहाकडून कपटाने मारले जातात. पुढे दूर कर्नाटकात मोठा मुलगा संभाजी व पती शहाजीराजे यांचाही मृत्यू होतो. शिवाजी सतत मृत्यूच्याच दाढेत वावरत असतात. एकमेव नातू संभाजीही त्याच वाटेवर चालत आहे. अफझलखान भेट, पुरंदरचा मोगलांचा वेढा, लाल महाल शाहिस्तेखानावरील हल्ला, शिवाजी-संभाजी आग्रा येथे औरंगजेबाच्या जबड्यात सापडतात, पन्हाळगडावरील वेढ्यात शिवाजी अडकतात, राज्याभिषेकासाठी सर्व पुरोहितांचा विरोध… अशा अनेक जीवावरच्या तसेच अपमानाच्या प्रसंगी जिजाऊने आपली मायेची नजर शिवबाच्या स्वराज्यावर जागती ठेवली होती. आज लोकार्थाने जिजाऊ याच स्वातंत्र्यदेवता आहेत. लोकदेवता आहेत. रयतेच्या प्रेरणास्थान आहेत. वीरस्त्री, वीरकन्या, वीरभगिनी, वीरपत्नी, वीरमाता आहेत. जिजाऊंच्याच स्वतःच्या अंगभूत सामर्थ्यातून, आत्मविश्वासातून व सजग बुद्धीने जाणीवपूर्वक केलेल्या राष्ट्रीय परिस्थितीच्या मंथनातून जिजाऊंच्या स्वातंत्र्य निष्ठेचा स्वराज्य निर्मितीचा रयतेच्याच अंतिम कल्याणाचा उगम झाला होता, असे जाणवते. 

अशा महान मातेच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० रोजी किल्ले शिवनेरीवर सूर्यास्तसमयी एका नवसूर्याचा जन्म झाला. तोच सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!

1 thought on “शिवरायांचे पूर्वज कुळवाडी भूषण”

Leave a Comment