शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवाजी महाराज कर्नाटकात

शिवराय कर्नाटकात कुळवाडी भूषण पुरुषोत्तम खेडेकर

शहाजीराजेंना कर्नाटकात आदिलशहाने दक्षिणेकडील पाळेगार नायक व इतर बंडखोऱ्या संपवण्यासह दक्षिण प्रदेश जिंकण्याची कामगिरी तातडीने दिली. सन १६३७च्या सुरुवातीलाच बेंगळूर येथे पोहोचताच शहाजीराजांनी सर्वच मुलांच्या सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था केली. शस्त्र, शास्त्र, भाषा, खेळ, क्रीडा, मल्लविद्या, धनुर्विद्या, तलवारबाजी, न्याय, तत्त्वज्ञान, धर्मज्ञान, भूगोल, इतिहास, सामाजिक कायदे व नीतिमत्ता, अर्थशास्त्र, दुर्गशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, राजनीती, युद्धनीती, पत्रव्यवहार, कथा, काव्य, वाचन, लिखाण, शिल्पकला, बांधकामशास्त्र, खगोलशास्त्र, फलज्योतिष शास्त्र, स्थापत्य, लोककला, कृषी, भूगर्भशास्त्र, चौसष्ट कला इत्यादी प्राचीन व आधुनिक औपचारिक व अनौपचारिक शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था केली. त्यासाठी नामांकित शिक्षक व प्रशिक्षक नेमले. जिजाऊंवर देखरेखीसह मूल्यांकनाचीही मोठी जबाबदारी दिली होती. शहाजीराजेही सोयीनुसार चौकशी करत, आढावा घेत असत. दरबारात असल्यास सर्व मुलांनाही विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ नामवंतांकडून ज्ञान ग्रहण करण्याबाबत सांगितले जात असे.

यातूनच शिवरायांना मराठी, कन्नड, संस्कृत, फार्सी, तेलगू, उर्दू, हिंदी इत्यादी भाषांवरील प्रभुत्वासह इंग्रजी, पोर्तुगीज, फ्रेंच अशा परकीय भाषांची तोंडओळख झालेली असावी. कारण शहाजी महाराजांच्या दरबारातील विविध भाषा पंडितांमध्ये परकीय- युरोपियन भाषा पंडितांचाही समावेश होता. तसेच राजनैतिक वा व्यक्तित्व विकासाची गरज म्हणून जर स्वत: शहाजीराजेंनी पस्तीस देशी-परदेशी भाषांवर प्रभुत्व मिळविलेले असेल, तर त्यांनी मुलांवर किमान दहा-पंधरा भाषांची सक्ती केलीच असावी. याशिवाय शहाजीराजे अत्यंत प्रतिकूल वातावरणात व स्वकौशल्यावर बहुभाषिक पंडित झालेले होते. जिजाऊंनाही म्हाळसाराणींनी बालपणीच सुमारे आठ भाषा व लिपींचे शिक्षण दिलेले होते. तसेच पुढे परकीय इंग्रज, पोर्तुगीज वकील-व्यापारी सदिच्छा भेटीसाठी येऊ लागल्यामुळे जिजाऊंनीही या युरोपियन भाषांची तोंडओळख करून घेतली होती. थोडक्यात, ज्या मुलांचे मायबाप नामांकित भाषापंडित व भाषातज्ज्ञ होते, बहुभाषिक होते. त्यांनी आपल्या मुलांना बहुभाषिक शिक्षण देऊन त्या भाषा बोलणे, वाचणे व लिहिणे यात तरबेज केलेले असणारच याबाबत शंका नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात तत्कालीन अस्सल पुरावे उपलब्ध नाहीत; परंतु बाल शिवबासोबतच बेंगळूरला शिकलेले त्यांचे समवयस्क व सहाध्यायी सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्या वंशजांनी तंजावर येथे निर्माण केलेले जागतिक, सांस्कृतिक व बहुभाषिक केंद्र याची साक्षीदार आहे. दक्षिण भारतात तंजावरचे संस्थान विकसित होण्यापूर्वीच संभाजीराजे (मोठे बंधू) व शहाजीराजे यांचा मृत्यू झाला होता. काही राजकीय घडामोडींमुळे बेंगळूरही सोडावे लागलेले होते; परंतु तंजावर स्थिरस्थावर झाल्यावर सन १६७४ नंतर मोठे युद्ध करायची वेळ आली नव्हती. संस्थानात शांतता व सुरक्षितता होती.

यातूनच स्वत: व्यंकोजीराजेंसह पुढच्या सर्वच वंशजांनी तंजावरला जागतिक पातळीवर सांस्कृतिक, साहित्यिक, बहुभाषिक, संगीत, कला, स्थापत्य अशा क्षेत्रात मान्यता प्राप्त करून दिली. शिवाजी महाराज व त्यांच्या वंशजांना अखेरपर्यंत शत्रूविरोधात लढावेच लागले. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही शिवाजी महाराजांना कला, साहित्य, संगीत, भाषा अशा क्षेत्रात वेगळे काम करण्यासाठी उसंत मिळाली नाही; परंतु त्यांनी निर्माण केलेले सर्व क्षेत्रिय तज्ज्ञ हे शिवाजी महाराजांचे द्रष्टेपणच होते. दुर्गशास्त्रात शिकलेल्या स्थापत्य शास्त्राचा उपयोग शिवाजी महाराजांनी नवीन गडकोट किल्ले, जलदुर्ग बांधण्यासाठी केला. त्यांचे हस्तलिखित पत्रे उपलब्ध आहेत. शिवपुत्र संभाजीराजेंच्या बहुभाषिक पांडित्यावरही आता शिक्कामोर्तब झालेले आहे. स्वराज्य निर्मितीच्या दगदगीत शिवाजी महाराजांना स्वतःकडे आवश्यक तेवढे लक्ष देता आले नसावे; परंतु पुत्र संभाजीस त्यांनी देशी-परदेशी अठरा भाषांचे पंडित बनविले होते. यावरून सद्सद्विवेक बुद्धीसह तर्काचा वापर करून व तत्कालीन परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे एवढे अनुमान जरूर काढता येईल की, ज्या व्यक्तीच्या वडिलांचे पस्तीस भाषांवर, मातेचे आठ भाषांवर व पुत्राचे अठरा भाषांवर प्रभुत्व होते, त्या शिवाजींनी किमान दहा गरजेच्या भाषांवर आपली छाप निश्चितच निर्माण केलेली असावी. बाल शिवबांच्या शिक्षकासह जिजाऊंचा असा अनुभव होता की, बाल शिवबास काही पुस्तकातील पाठ वा रामायण-महाभारत- वेद-उपनिषदे पुराणे वा इतिहास यातील शिक्षण औपचारिकपणे सुरू करण्यापूर्वीच शिवबाने त्यातील बहुतांशी भाग वाचलेला, समजून घेतलेला व ध्यानातही ठेवलेला होता. शहाजीराजेंचा मोठा ग्रंथसंग्रह होता. कदाचित शहाजी-जिजाऊ यांनी कर्नाटकमधील वास्तव्यात आपसात चर्चा करून भविष्यात स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊंनी शिवबासह महाराष्ट्रात जाण्याबाबत निश्चय केलेला असावा. त्यामुळेच बाल शिवबांमधील उपजत शहाणपणास जाणीवपूर्वक विशेष उजाळा देण्यावर जिजाऊंनी भर दिलेला दिसतो. यामुळेच भविष्यात शिवाजी महाराजांनी जीवनात शून्य चुकांचा अवलंब केला, असे म्हणता येईल. सन १६३७, १६३८, १६३९ अशी सुमारे तीन वर्षे शहाजी महाराज लढायांतच अडकलेले होते. यातून आदिलशहाचे राज्य व शहाजीराजांचीही खाजगी जहागीर वाढत होती. यापेक्षाही शहाजी राजेंचा मानसन्मान व दबदबा विजापूर दरबारात वाढत होता. विशेष चर्चेसह काही जणांसाठी अभिमानाचा, तर काही जणांसाठी रागाचा असा हा विषय होता. यातूनच नैसर्गिक अंगाने विजापूर दरबारात शहाजीराजेंच्या मित्रांसह शत्रूंचीही संख्या वाढत होती. त्यातच शहाजीराजांना हारही माहीत नव्हती. शहाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या कथाही मुलांच्या शिक्षणाचा आपोआपच अविभाज्य भाग बनत. शहाजीराजांच्या दरबारात असणाऱ्या अनेक पंडितांचाही शिवबांचे शिक्षक म्हणून संबंध येत असावा. त्यापैकी एक जयराम पिंड्ये यांच्या राधामाधव विलास चंपू या काव्यात खालील अर्थाचा चंपू आहे.

‘जगदीश्वर ब्रह्मदेवास प्रश्न विचारतात की, तूं एवढी सृष्टी निर्माण केलीस, पण तिचे रक्षक (राखणदार) कुठे ठेविलेस ते सांग ? त्यावर ब्रह्मदेव उत्तरतात, पूर्वेचा रक्षक रवि (सूर्य), पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे. त्याचप्रमाणे उत्तरेचा रक्षक शहाजहान तर दक्षिणेचा लोकपाल शहाजी आहे.’

आपल्या पित्याच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या व राजनीतीच्या या कथा ऐकून शिवबास प्रेरणाच मिळत होती. सन १६४० दरम्यान शहाजी महाराजांचे कर्नाटक- दक्षिणेत वाढलेले खाजगी जहागिरीचे जाळे एखाद्या स्वतंत्र राजालाही लाजवणारे होते. तसेच मोठा दरबार, फौज, विविध विषयांचे पंडित, स्वकौशल्य याचा अंदाज घेऊन शहाजीराजांनी आदिलशाहीचा लचका तोडून पुन्हा एकदा स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न बेंगळुरात केला होता. शहाजीराजेंचा हा फसलेला स्वराज्य स्थापनेचा दुसरा प्रयत्न होता. हे दोन्ही प्रयत्न शिवजन्मानंतरचे होते. त्यामुळे शिवबास वेगळेच स्फुरण चढत असे. याचा परिणाम होऊन शिवबांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष मैदानी लढायाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. भालाफेक, तलवारबाजी, घोडदौड, हत्ती वा अंबारी, विविध डावपेच, इंग्रज-पोर्तुगीज-फ्रेंचांकडील बंदुका व इतर शस्त्रांची माहिती, तोफा व तोफखाना याबाबत शिक्षण-प्रशिक्षण सुरू झाले. याशिवाय जिजाऊ सर्वच मुलांना घेऊन परिसरातील विविध भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांना भेटी देत. तेथील महत्त्व समजावून सांगत. तेथील स्थापत्य, अवशेष पाहून मुलेही प्रश्नं विचारत होते. विजयनगरच्या उद्ध्वस्त साम्राज्याचा इतिहास ऐकून शिवबास शत्रू केवढा प्रबळ आहे याची जाणीव झाली. शिल्पकला इत्यादी विजयनगरचे हिंदवी रयतेचे साम्राज्य होते. ते संपवण्यासाठी आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा एक झाले होते. 

सन १५६५ च्या जानेवारीत तालकोटरा युद्धात विजयनगर हारले. आज आपले वडील शहाजीराजे स्वतंत्र राजे नसतानाही या शाह्यांशिवाय मोगलशाहीशीही लढत आहेत, मोठे झाल्यावर हीच जबाबदारी पित्यासारखीच स्वतंत्रपणे आपल्याला पार पाडायची आहे, एवढी जाणीव बाल शिवबास वयाच्या दहाव्या वर्षी झालेली होती. मुलांना प्रेरणा मिळावी, प्रोत्साहन मिळावे, त्यांचा आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान वाढावा, त्यांना व्यवहार समजावा, त्यांना रयतेचे सुख-दुःख समजावे, त्यांना राजकीय रीतिरिवाजासह राजकीय डावपेच समजावेत, सैन्याचा तळ व सैनिकांच्या जबाबदाऱ्यासह त्यांच्या हालचाली समजाव्यात, हल्ला व बचावाची प्रात्यक्षिके, तह व कलमांची मांडणी, बादशहाचा दरबार व सरदार इनामदारांचे संबंध, राज्याचा कोश उभारणी व कर आकारणी, लोककल्याणकारी कामे व माहिती यासारख्या कारणांनी शहाजीराजेंनी मुलांना व विशेषतः शिवबास सर्व जहागिरीत व आदिलशाही मुलुखात फिरवले. गावखेड्यासह सैनिकांच्या तळावर मुक्काम केले. सहभोजन केले. असे घडत होते शिवबा. 

त्याच वेळी जिजाऊंच्या माध्यमातून शिवबावर विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय, धार्मिक संस्कारांचे बीजारोपण होत होते. त्यातून शिवबास भारत भूमीवरील प्राचीन काळापासूनचे संघर्ष अभ्यासता आले. जिजाऊंनी त्यासाठी जाणीवपूर्वक संस्कृत पंडितांकडून वेद, उपनिषदे, दर्शने, आगम साहित्य, पाली साहित्य, रामायण, महाभारत, गीता, पुराणे, दशावतार कथा इत्यादी विविध धार्मिक साहित्याची ओळख करून दिली. याशिवाय भारत भूमीवरील सिंधू संस्कृतीचा उदय-विकास-हास, अनार्य विरुद्ध आर्य संघर्ष, कृषी उदय व विकास, कृषीसंस्कृती, अवैदिक विरुद्ध वैदिक साहित्य याची तोंडओळख करून दिली. तत्त्वज्ञानातील चार्वाक, महावीर, जैन व भगवान गौतम बुद्ध यांचे विचार व कार्य शिकविले. प्राचीन राजकीय संघर्ष, नंद घराणे, मौर्य साम्राज्य व सम्राट अशोकाचे कार्य, मौर्य साम्राज्य -हास व विविध साम्राज्यांचा उदय व विकास याचा मोठा प्रभाव शिवमनावर झाला असावा. याच सांस्कृतिक विचारातून महाराजांनी समुद्रदुर्गाचे नाव ‘सिंधुदुर्ग’ ठेवले हे सिद्ध होते. राज्यकर्त्यास सर्वच क्षेत्रातील माहिती असावी, या उद्देशाने शिवबास जिजाऊंनी आवश्यक हिंदू, वेदिक, जैन, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन व इतर पंथांचीही माहिती दिली. शाक्त, सुफी, भक्ती, लिंगायत, महानुभाव, वारकरी चळवळींचा इतिहासही शिकवला. बेंगळूरला येण्यापूर्वी शहाजी, जिजाऊ, सर्व मुले यांनी लोहगावला संत तुकाराम महाराजांची भेटही घेतली होती. एवढ्या बारकाईने जिजाऊ शिवबास बालपणात सर्वांगांनी घडवत होत्या. त्याच वेळी गरजेनुसार त्या माता, शिक्षिका, गुरू अशा विविध भूमिकाही पार पाडत होत्या. भारतीय मिथके, महाकाव्ये प्रामुख्याने रामायण व महाभारत, गीता, प्राचीन इतिहास, दशावतार कथा यांचा उलगडा करून वर्तमानात त्यापासून कोणता बोध घ्यायचा याचे विवेचन करत होत्या. या मौखिक वा लिखित साहित्यात दडलेला इतिहास वा सार शोधण्याची चिकित्सक वृत्ती जिजाऊंनी शिवबाच्या मनावर बिंबवली. त्यासाठी त्यांनी या साहित्याशी भारतीय प्राचीन इतिहासाचे नाते जोडले. 

जिजाऊंनी बाल शिवबास विविध धर्मग्रंथ व पुरातन साहित्यातील सार सांगून अवगत केले. शिवबांनीही वाचन करताना ती दृष्टी ठेवली. असे दिवसामागून दिवस जात होते. शहाजीराजेही उसंत काढून बेंगळुरात स्थिरावले होते. मुलांचे वय वाढत होते. बेंगळूर शहरातील मराठा वसतीही वाढत होती. दक्षिणेसह महाराष्ट्रातील मराठा समाज बेंगळुरात शहाजीराजांच्या आसऱ्याने स्थलांतरित होऊन राहू लागला होता. त्यांच्या विविध वसाहती निर्माण झाल्या होत्या. ज्येष्ठ बंधू संभाजीराजे बेंगळूरच्या दैनंदिन प्रशासनातही भाग घेऊ लागलेले होते. सामाजिक गरज म्हणून शहाजीराजांनी बेंगळूर शहरात सुमारे तीनशे एकरापेक्षा मोठ्या जागेवर मराठा गोसावी मठाची स्थापना सन १६४० च्या सुमारास केली होती. १६ मे १६४० रोजी शिवबांचे पहिले लग्न फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाईशी झाले. अशा रीतीने शिवबांचे कौटुंबिक जीवनात पदार्पणही झाले. शिक्षण, प्रशिक्षणही सुरूच होते. राजकीय गरज म्हणून शहाजी – जिजाऊंनी सल्लामसलत करून तसेच सुरक्षेच्या कारणास्तव सर्व कुटुंब एकत्रित राहणे धोक्याचे असल्याचे लक्षात घेऊन वेगवेगळे राहण्याचे ठरविले. निजामशहाने लखुजीराजांचे राजकीय वजन व लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून भीतीग्रस्त झाल्यामुळे नीच कपटाने लखुजीराजेंची भर दरबारात हत्या केली होती. आदिलशाहीत शहाजीराजेंचे शत्रूही दरबारापासून बाहेर पसरलेले होते. खंडागळे हत्ती प्रकरण प्रसंगीही आदिलशहाचे मौन संशयास बळ देणारेच होते. यातून कौटुंबिक सुरक्षितता धोक्यात असल्याचे जाणवत होतेच. याशिवाय शहाजीराजेंची पुणे – इंदापूर-सुपे-नाशिकपर्यंत पसरलेली खाजगी मालकीची जहागीर होती. तिच्या देखभालीसाठी जिजाऊसह शिवबास तिकडे पाठविण्याचे नक्की झाले होते. सन १६४९ व १६४२ याच पूर्व तयारीत गेले. शहाजी- जिजाऊंच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य-स्वराज्य निर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल होते. बाल शिवबास स्वराज्याचे छत्रपती  बनविण्यासाठी पालक शहाजी-जिजाऊंनी घेतलेला हा धाडसी निर्णय होता. त्यासाठीच सलग सुमारे सहा वर्षे शिवबास सूक्ष्मातिसूक्ष्म बाबीपासून ते महाकाय संकटावर मात करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. सन १६४२च्या मध्यास शिवबांचे दुसरे लग्न तळबीडच्या मोहिते घराण्यातील सोयराबाईंशी झाले. शिवबांचे बळ वाढविण्यासाठी ह्या विवाहातून राजकारणही साधले जात होते.

chhatrapati shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj

Leave a Comment