श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 13
राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. बारा मावळांतले मावळे येत. मावळ्यांच्या नावनिशीवार याद्या होत. तीन हजारांपर्यंत मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता, तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते सचिंत बसलेले असत.
एके दिवशी पंत राजांना म्हणाले,
‘राजे! हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत?” “त्या कामी निष्ठा लागते. तेवढी त्यांच्याजवळ आहे.’
‘फार दिवस पुरायची नाही ती. राजे, सैन्य नुसत्या निष्ठेवर लढत नसतं. त्याला पोटही असतं.”
पंत, मला आपला रोग कळला. आपण चिंता करू नका. पैशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही.
‘संतापू नका, राजे! त्याऐवजी थोडा विचार करा. गडाची बांधणी, मावळ्यांचे पगार हे सारं छत्तीस गावच्या पोटमोकाशावर चालेल कसं?” ‘ज्यानं बुद्धी दिली, तो चालवायला समर्थ आहे. पांगळा सुद्धा पायांविना चालविण्याची
त्याची शक्ती आहे, हा विश्वास तुकाराम महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे.’ •राजांनी अवसानाने उत्तर दिले खरे; पण पंतांच्या सांगण्यातली सत्यता त्यांना जाणवत होती. पैशाशिवाय हे चालणार कसे? किती उपास सहन करीपर्यंत मावळे राजांच्या कामी गुंतणार ? राजांना काही सुचत नव्हते. ते बेचैन झाले. जिजाबाईंच्या लक्षात ही बेचैनी येत होती. त्यांनी राजाला विचारले,
‘राजे, रोहिडेश्वर बांधला जातो आहे. सारं काम होत आहे. मग तुम्ही उदास का? कसलं संकट आहे?’ ‘छे! तसं नाही, मासाहेब! ही सारखी रपेट होत आहे ना, त्यामुळे तुम्हांला तसं
वाटत असेल.’ ‘शिवबा! आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरू यांच्यापासून काहीही लपवून ठेवता येत नाही– ठेवूही नये.’ राजांनी नि:श्वास सोडला. पंतांचे बोलणे सांगितले. जिजाबाई म्हणाल्या,
“सध्या तर चिंता नाही ना! मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं? माणसं दोन स्वभावांची असतात. काही मागचा-पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं; पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसरी, मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामाचा विचार त्यांना नसतो. स्वारीचंच बघा ना. झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे. परिणाम ते जाणीत नाहीत. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आलं आहे.’ ‘पण हे वेडं धाडस ठरलं, तर?’
‘कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला. मोगलाई-आदिलशाहीला एकट्यांनी तोंड दिलं. बंडावा मोडला, म्हणून त्यांना पराजित समजायचं? ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली. लोकांनी वाळीत टाकलं त्यांना. ते पराजित होते? मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं? भीतीपोटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही, हे लक्षात ठेवा.’
‘मासाहेब!’
‘राजे, देवाधर्मावर विश्वास ठेवून कार्य आरंभलंत. ते पार करण्याची ताकद त्याची आहे. त्याची शंका घेऊ नका. राजे, मनात आणाल, ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देव्हाऱ्यात देव, तशी मनात निष्ठा, हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका.’
• जिजाबाईच्या बोलण्याने राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झाडून टाकून ते मोकळे झाले.
• राजांचे लक्ष वळले तोरण्यावर आकाशाला भिडलेला, चढायला कठीण, पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला. किल्लेदार गाफील. राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली; आणि गाफील गड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला. तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आग्नेयेस दुरजादेवीचा डोंगर ताब्यात घेतला. दोन्ही गडांच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते. हिंमत बांधून राजांनी गडाचे काम सुरू केले.
घरचे गुपित गावात पसरायला वेळ लागत नाही; मग सह्याद्रीच्या उघडपणे फडकणारी स्वराज्याची द्वाही कशी दडून राहील? राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांदल देशमुखांच्यासारख्या देशमुखांनी ह्या बंडाव्याची आगळीक शिरवळला जाऊन सुभानमंगळ किल्ल्याच्या ठाणेदार अमीनला दिली. अमीनाचे डोळे उघडले. त्याने तातडीने विजापूरला शिवाजीच्या बंडाव्याचे वृत्त कळविले. बाबाजी नरसप्रभू गुप्ते राजांना मिळाल्याबद्दलची तक्रार केली गेली.
सरकारी चक्रे जशी फिरत होती, तशी तोरणा गडावर चुनाघाणीची चक्रे मंद गतीने राबत होती. तटाचे काम चालले होते. हाती लागलेल्या गडाच्या तुटपुंज्या खजिन्यावर आणि धान्यसाठ्यावर एवढे मोठे काम होणार कसे? खजिना झर झर संपत होता. राजे विचारात पडले होते. काही मार्ग सुचत नव्हता. पुण्यात ते संचित बसून होते. मासाहेबांना ते म्हणाले,
‘मासाहेब, गडाचं काम थांबवावं लागणार!’ मासाहेब काही बोलल्या नाहीत. राजे म्हणाले,
‘काय करावं, सुचत नाही.’
‘जे होईल, ते खरं. त्याला इलाज नाही.’ मासाहेब अस्वस्थ झाल्या. एवढ्या हौसेने मांडलेला डाव मध्येच बंद ठेवावा लागणार. हे त्यांना पाहवत नव्हते. न राहवून त्या म्हणाल्या, ‘राजे, दागिने, भांडी काढली, तर?’
“जर जमत असतं, तर तेही करण्यात आम्ही कुचराई केली नसती. पण तोरण्यासारखा अव्वल गड बळकट करायला तेवढंच आर्थिक बळ हवं. देवीडोंगराच्या तर तीन माच्या बांधायला हव्यात. तरच त्याला शोभा, बळकटी येईल. आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू.’
जड पावलांनी राजे उठले आणि शयनगृहाकडे गेले. रात्रभर राजे तळमळत होते. पहाटेला त्यांना जागे करण्यात आले. तानाजी आल्याची वर्दी आली. एवढ्या भल्या पहाटे तानाजी! राजे तसेच बाहेर गेले. तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थकवा मुळीच
नव्हता. राजांनी अधीर होऊन विचारले,
‘तानाजी, तातडीनं बरं ?’
तानाजी राजांच्या कानाजवळ कुजबुजला. राजांचा चेहरा क्षणात उजळून निघाला. ते म्हणाले, ‘देवाची कृपा! थांब, तानाजी. मासाहेबांना सांगून येतो आम्ही. त्या काळजीत
असतील.’
मासाहेब उठल्या होत्या. एकनाथी भावार्थ रामायण वाचीत होत्या. राजे महालाच्या दाराशी थांबले. आतले दृश्य पाहून ते मुग्ध झाले. मासाहेबांच्या उजव्या हाती समई तेवत होती. समईची काजळी हळुवार हातांनी सईबाई झाडीत होत्या. जिजाबाईची नजर हाती धरलेल्या पोथीच्या पानावरून फिरत होती. शब्द उमटत होते…
अवताराचें सामर्थ्यपण। प्रपंचपरमार्थी सावधान। उभयतां दिसों नेदि न्यून। तें चिन्ह अवधारीं।। तोडी नवग्रहांची बेडी। सोडवी देवांची बांधवडी। उभवी रामराज्याची गुढी। आज्ञा धडफुडी तिहीं लोकीं।। सांडी समाधीची भ्रांति। धनुष्यबाण घेऊनि हाती। रामनामाची ख्याति । त्रिजगती उद्धरी ।।
• अध्याय संपला. जिजाबाईंनी पोथी मस्तकी लावली; आणि त्या सईबाईंना म्हणाल्या, ‘कशाला एवढ्या भल्या पहाटे उठतेस?”
राजांनी हाक मारली, ‘मासाहेब!’ ‘कोण, शिवबा?’ म्हणत उठत असताना त्या म्हणत होत्या, ‘शिवबा, रात्रभर झोप आली नाही, बघ.’
राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खिळली. आश्चर्यानं त्या म्हणाल्या, ‘नेहमी कसला हसत असतोस? मनात काय आहे, ते काही कळत नाही.’ राजे जवळ गेले. सईबाईंच्याकडे पाहत म्हणाले, ‘तोंडात तीळ भिजेल का ?’
सईबाई म्हणाल्या, ‘नाही भिजायचा! मी जाते!’ आणि एवढे बोलून त्या निघून गेल्या. मासाहेब म्हणाल्या,
“उगीच चिडवतोस तिला.’ “ते जाऊ द्या. मासाहेब, आनंदाची बातमी आहे.’
‘काय? आता मांडलेला पसारा आवरल्याखेरीज काही करू नको.’ ‘तो चुटकीसरशी आवरला जाईल.’ ‘ते कसं?’
‘मासाहेब तुम्ही म्हणालात, तेच खरं, मनात हिंमत असली, तर देव्हाऱ्यात देव प्रकटायला वेळ लागत नाही. हलक्या आवाजात राजे म्हणाले, ‘तानाजी बातमी घेऊन आला आहे काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं, विपुल साठा आहे धनाचा. मोहरांचे हंडे आहेत!’
‘लाज राखली देवानं!’
राजे तानाजीकडे गेले. तानाजीला सांगताच तानाजी म्हणाला, ‘नको, राजे! जोखमीचं काम. तुम्ही चला. ‘
‘तसं काही तुमच्या मनात असतं, तर खजिन्याची वार्ता सांगायला कशाला आला असता तुम्ही? शिबंदी घे; आणि खजिना घेऊन इकडे ये. माझी तिथं काही गरज नाही.’
राजे स्नान करून महालात आले; पण सईबाई कुठेच दिसत नव्हत्या. तेवढ्यात मनोहारी दूध घेऊन आली. राजांनी विचारले,
‘राणीसाहेब कुठं आहेत?’
‘मुदपाकखान्यात!’ ‘त्यांना पाठवून दे!’
राजे पलंगावर बसून होते. सईबाई आत आल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा
तांबूस दिसत होत्या. त्यांनी विचारले,
‘काय?’
“दिसला नाही, म्हणून हाक मारली.’
सईबाई म्हणाल्या, ‘जा म्हणवून घेण्यापेक्षा महालाबाहेरच राहिलेलं बरं.’ ‘राग गेलेला दिसत नाही.’ म्हणत राजे उठले. राजे उठलेले पाहताच सईबाई
पाठ फिरवून उभ्या राहिल्या. राजे आर्जवाने म्हणाले,
‘ऐकावं तरी…’
‘उगीच काही सांगू नका. तीळ भिजत नाही तोंडात!’
“आता जे काही सांगणार आहोत, ते चारचौघांत सांगायला मुळीच हरकत नाही. आम्ही घेतलेले किल्ले– तोरणा, दुरजादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहो. आदिलशाहीपुढं आम्ही शरणागत जाणार आहो…’
‘काय?’ म्हणत सईबाई वळल्या. चेहरा भीतीने व्यग्र झालेला. डोळे भरलेले.. • उजवा हात हलवीत त्या थरथरत्या ओठांनी ‘नाही, नाही’ म्हणत होत्या; पण शब्द फुटत नव्हते. राजांना बोलल्याचा पश्चात्ताप झाला. त्यांनी झटकन सईबाईना घेतले. त्यांचा चेहरा हातांत घेत ते म्हणाले,
‘खुळी! थट्टा केलेलीही कळत नाही? आम्ही कधी शरणागत जाऊ?” राजांनी • सईबाईचे डोळे पुसले. खाली पाहत सईबाईनी नाक ओढले; आणि त्या एकदम हसल्या.
‘सई, इकडे बघ.’
सईबाईंनी नजर वर केली. राजांच्या गालांवर कोवळी दाढी शोभत होती. पातळ ओठांवर तेच हास्य विलसत होते. नजरेला नरज देत राजे म्हणाले, ‘तोरण्यावर खजिना सापडला, सई! मोहरांचे हंडे सापडले. सई, गडाचं काम
आता बघता बघता पुरं होऊन जाईल!’
‘खरं?’
“हो!’
‘मग मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते, तर काय बिघडलं असतं?’ ‘असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची? कालच आम्ही तुझी जासूद म्हणून नेमणूक करून दिली. असला अधीरेपणा जासुदाला काय कामाचा?’
राजांच्या विस्फारित नेत्रांकडे पाहताच सईबाई मोठ्याने हसल्या. राजांनी त्यांना
एकदम जवळ घेतले. ते म्हणाले,
‘सई, हे तुझं खळखळून हसणं मला फार आवडतं.’ ‘सोडा पाहू! कोणी आलं, तर?’
‘काय बिशाद आहे कुणाची? राजे-राणीसाहेब आपल्या महाली आहेत, हे
मनोहारीला माहीत असता महाली कोण येतो?” राजांच्यापासून दूर जात सईबाई म्हणाल्या, ‘मग का सोडलंत, तर?…’ राजांना सईबाई बोलल्याचा अर्थ कळेपर्यंत सईबाई महालाबाहेर गेल्याही होत्या.
****