श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6
शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्यासह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची दु:खे पाहून जिजाबाईंचे डोळे पाणावत.
बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखीत होते. वाड्यात येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादोजींनी निष्णात, पटाईत ढालकरी, पट्टेकरी बालराजांच्याकरिता आणविले होते.
सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजीच्या खेळात हिरिरीने भाग घेत.
एके दिवशी पंतांनी आत येऊन मुधोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली.
मुधोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुधोजींनी मुजरा करताच बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया
पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या,
‘केव्हा आलात आपण?”
‘शहाजीराजांच्या कृपेनं कैद संपली. फलटण जहागीर पूर्ववत मिळाली. मुलुखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो.’ “बरं झालं आलात, ते. इथं सारंच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी
असली, तर तेवढाच आधार वाटतो.’
‘मासाहेब! पुणे परत उठवलंत. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलंत?” ‘मी काय करणार? दादोजींसारखी माणसं होती, म्हणून हे जमलं.’
‘करणारी करतात. पण त्यालादेखील देवीचा कौल लागतो.’ मुधोजी म्हणाले. सईकडे बोट करीत, विषय बदलीत मासाहेब म्हणाल्या, “काय नाव हिचं?’
‘सईबाई… आणि हा मुलगा, बजाजी.”
सात-आठ वर्षांची सई आपल्या विशाल नेत्रांनी मासाहेबांकडे पाहत होती.
गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान… चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालीत होते. मासाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुधोजी पुण्यात राहिले. मासाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजीबरोबर राहत होता.
संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाठी, बोथाटी झाली; आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खणखण आवाज उठू लागले. सदरेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुधोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुधोजीच्या कानाशी
वाकली. मुधोजी म्हणाले, नंतरऽऽ’
‘चला ना, आबा!’ गाल फुगवून सई म्हणाली.
सांगितलं ना, मध्ये बोलू नको, म्हणून?’
‘काय म्हणते, सई ?’ जिजाऊंनी विचारले. सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली. म्हणाली,
‘मासाहेब, बघा ना! बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला.’ ‘भारी सतावते ही पोर!’ मुधोजी म्हणाले. ‘चला, मुधोजी! आम्हीही खेळ पाहायला येऊ. फार दिवसांत आम्हांलाही वड
मिळाली नाही.’
मासाहेब उठल्या. मुधोजींना उठावेच लागले. मासाहेबांचा हात धरून सई बाहेर आली. मासाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसल्या, दादोजी, मुधोजी अदबीने बाजूला बसले. चौकात चार जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादाने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले, ‘नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलंत?’
नानू म्हातारा होता, तरी वाळल्या हाडांत तेज होते. तो म्हणाला, ‘मासाहेब! दावतोच की आता.’ नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला,
‘राजे, लाठी घ्या.’
लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती. तीन हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला,
‘बेतानं, हं राजे! नाही तर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला.’ सारे हसले. नमन करून, हातांवर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी
त्याचे अनुकरण केले. ‘राजे, करा मोहराऽऽ!’
राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होते. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला,
“राजे, सांभाळा!’
-आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागे सरकत होते…… आणि राजांच्या हातची काठी सुटली. नानूने मासाहेबांच्याकडे पाहिले. निःश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या,
‘नानू, अरे बेतानं! पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलास वाटतं.’
‘नाही, मासाब! या खेळात न्हान-मोठं कुठलं? जो आधी साधंल, त्याचा डाव. अजून राजांचं हात बळकट झालं न्हाईत, म्हनून काठी सुटली. असंच शिकायचं.’
त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळ उभी केली, आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा विटा दीड हात उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते. कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विट्याच्या • टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, दुसऱ्या
‘राजे, चाल करा!”
मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून आठ हातांवर राजे आले, आणि एकबळाने त्यांनी विटा फेकला. सरसरत विटा सुटला आणि हातावरच्या केळीत भसकन घुसला. ओढीबरोबर त्याच क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला.. न राहवून मुधोजी ओरडले,
‘व्वा, राजे!’
सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळ हलविली; आणि चौकात दुसरे दोन मोने आणले गेले. मासाहेबांच्या
बैठकीच्या समोर दोन्ही मोने आठ हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजीराजांनी दोन्ही हातांत पट्टे चढविले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठांवरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली, तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवबाची नजर दादोजींकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले. हात फिरवू लागले. हात फिरवीत ते केळींच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला, आणि डोळ्यांचे पाते लवायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईकडे
पाहिले. त्या म्हणाल्या, ‘नानू वस्ताद ! आमच्या सईबाईना, राजांनी काय केलं, ते दाखवा.”
नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळी मधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहताच सईबाईचे डोळे विस्फारले गेले. ती उद्गारली,
‘अगो बाई!’ आणि तिने पदर तोंडाला लावला.
सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, ‘सई, हा नवरा चालेल का तुला?”
•सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवयांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली,
‘हो, चालेल.” मासाहेब गोन्यामोच्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या,
‘हात, गधडे असे ‘हो’ म्हणून सांगतात का?’
मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले,
‘मासाहेब, एक अर्ज आहे. ‘ ‘काय, दादोजी ?’
“गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल, तर ही गोष्ट पक्की करावी, राजेही आता दहा वर्षांचे होतील. जोडाही शोभून दिसेल.’ ‘नानू वस्ताद काय म्हणतात दादोजी ?”
नानू म्हणाला, ‘खरंच आहे ते. देऊ या बार उडवून. समदं झालं… वाडा झाला, चौक झालं, लिवनं-वाचनं झालं. सूनबाईशिवाय घराला शोभा हाय, व्हय? आवंदा करून टाकू या.’ ‘अहो, पण निंबाळकर मामा काय म्हणतात, ते तरी विचारा, पोर त्यांची.’
‘असे शब्द वापरू नका, मासाहेब! पोर आपली आहे. महाराजांच्या कृपेने जीव वाचला, जहागीर मिळाली, अत्राला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली, तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधांवर कळस चढेल.” ‘जगदंबेच्या मनात असेल, तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध
पुढं चालू होईल… दादोजी!’
“जी?’
‘चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीनं खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांना कळवा. तिकडून होकार आला, की आपण हे कार्य पार पाडू.”
मासाहेब उठल्या. सई म्हणाली, ‘मासाहेब, एवढ्यात जायचं?’
मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, ‘एका बैठकीत जेवढं केलंस, ते का थोडं झालं? आता ऊठ, बाई. पुष्कळ कामं आहेत.’
सर्वांचे मुजरे झाले. सईबाईसह मासाहेब आत गेल्या. ओलावलेल्या पापण्यांनी मुधोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले.
दुसऱ्या दिवशी उन्हे माळवदीवर आल्यावर लाल महालातून दोन घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले. दोन दिवसांनी मुधोजीराव सई- बजाजीसह फलटणला गेले.
दिवस उलटत होते. बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते.. बंगळूरची थैली पुण्यात आली. दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली.. मजकुरावरून नजर फिरत असता होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मासाहेबांनी अधीरतेने विचारले,
‘काय आज्ञा आहे ?’
‘महाराजसाहेबांना हा संबंध मान्य आहे, एवढंच नव्हे, तर लग्नप्रसंगी मोकळेपणानं खर्च करण्याची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली, की कळविण्याची आशा झाली आहे. महाराजसाहेब जातीनं लग्नाला हजर राहणार आहेत.’
“पंत, फलटणला मुधोजीरावांना कळ्या. दिवस थोडे आहेत. सारं व्यवस्थित व्हायला हवं.’ सारी सूत्रे भराभर हलविली जाऊ लागली. फलटणहून मुधोजीराव कुटुंबपरिवारासह
आले. एक शंका होती, तीही दूर झाली… शिवाजी-सईबाईच्या कुंडल्या जमत
होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ ठरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला
शाखी बसले. सर्वानुमते शके १५६२ विक्रमनाम संवत्सर, वैशाख शु॥५ हा मुहूर्त
घरण्यात आला.
शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला.
पंतांना आता क्षणाचीही उसंत नव्हती. कलाबूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या,
‘पंत, केवढा पसारा मांडणार आहात? हे लग्न बेतानं केलं, तरी चालेल.
पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, ‘मासाहेब, या लग्रात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वसते आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत; ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल? या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल.’
जिजाऊंना ते पटले. त्यांनी नंतर काही आढेवेढे घेतले नाहीत. मुधोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरीक कशी पार पडणार, याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून, ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले.
‘मासाहेब, मुलीचे लग्र वधूपित्याच्या घरी व्हावं, हा शिरस्ता आहे. फलटणला आमच्याकडे व्हावे, ही विनंती आहे.’ मुधोजींनी अर्ज केला,
मासाहेब म्हणाल्या, ‘मामासाहेब! अजून का आम्हांला परके समजता ? है या कोणाचं ? थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण- घराण्यातल्याच ना? राजांनी पुणे वसवलं. इथंच त्यांचा विवाह व्हावा, हे बरं वाटतं.’
‘जशी आज्ञा । पण, मासाहेब, राग होणार नसेल, तर आणखीन एक विचारावं
वाटतं.’
‘काय?’
‘सोयरीक ठरली. मुहूर्त ठरला; पण घेण्यादेण्याचं काही ठरलं नाही.’
“घेणं-देणं व्यवहारात येतं, मामासाहेब ही रक्ताची नाती! पोरगी देता, त्यापेक्षा •मोठं देणं कुठलं? तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे. ते दिलंत, की आमचं काही म्हणणं नाही.’
‘सांगा, मासाहेब!’
मासाहेब हसत म्हणाल्या, ‘आणखीन द्यायचे, ते आशीर्वाद! त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या, की सारं आलं. ‘
“पण महाराजसाहेब काय म्हणतील?”
‘इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच, तर बेलाशक आमचं नाव पुढं करा.”
मुधोजीरावांना शब्द फुटत नव्हता. गहिवरून ते म्हणाले, ‘मासाहेब, पोरीला पदरी घेतलंत, आणि साता जन्मांचं कल्याण केलंत. लग्रात आम्ही काही तरी केल्यासारखं वाटावं, म्हणून तरी काही काम सांगा.’
‘सांगू ना! जरूर सांगू. मामासाहेब, वऱ्हाड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी… रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण इवं उतरल्याचा आनंद आम्हांला होऊ द्या.
जिजाबाईंनी सांगितले, त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगांनी रंगविले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवसघर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता. मांडवासाठी वासे, वेळकाठ्या यांचे ढीग रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे यांबरोबरच हंड्याझुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनारशाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवीत होते.
हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चाललेली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला.
अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापुराहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला.
उमाबाई म्हणाल्या, ‘मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीच असं. लहान होता, म्हणूनच लग्नाला तरी सापडला… तो नाही आला, तर काय झालं? पुढं येईल.’
शहाजीराजे येणार नाहीत, म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. अकरा वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते. दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या.
पाचही देवांना कौल लावून मुहूर्तमेढ रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे, आडपडदे वाऱ्यावर झुलू लागले.
मुधोजीरावांचे वऱ्हाड वाजत-गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडवाऱ्यातून बैलगाड्यांची रीघ पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी, घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या, आणि माणसांनी गाडीतळातच गाडीचा आसरा केला. हररोज हजार पान उठत होते.. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्याच, तर
त्या म्हणत, “तुम्ही विसावा घ्या. काही आमच्याकडून राहिलं, तर सांगा.’
मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले; आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादासाठी हजारो हातांनी वधूवरांच्या वर अक्षत फेकली. वाद्यांचा गजर झाला..
मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरी टोप शिरी होता. कपाळी गंध होते.. अंगात जरी बुट्टीचा अंगरखा होता. कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकारांनी आलंकृत होते. दोघांच्या शालीना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलांवर बोटे मोडली.
मोहरांचा सतका केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर-सोप्यात आली. राजांनी दादोजीच्या पायांवर डोके टेकले. दादोजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजविलेला देखणा घोडा समोर आला.
सईबाई म्हणाली,
‘मी घोड्यावर बसणार!’
‘तुमच्याचकरिता आणलायू हा घोडा.’
‘अंहं! मला दुसरा घोडा पायजे. मला घोड्यावर बसता येतं की!” सारे थक्क झाले. कुणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ‘ही काय रपेट आहे? वरात आहे ही! हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला.
वरात चालू लागली. शेकडो पलोत्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादोजी, मुधोजी, हनमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्र्यांचे ताफे लागले होते. मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती; झोप येऊ नये, म्हणून शिवबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले.
********