श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7


पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना

जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले.

वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप खूप आनंद झाला होता. जिजाबाईंच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पतिदर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नऱ्हेकरासारख्या विश्वासू माणसावर ते सोपवीत होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता.

मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला. बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेची माणसे पाहत होता. अंतराबरोबर माणसांचे वेष, बोली भाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्वापदे
आढळत होती. प्रचंड फत्तरांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला. थंडीवाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता. बालमनावर वेगळ्या मुलुखाचे नवे संस्कार घडत होते.

एका मुक्कामावर असतानाच बंगळूरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला. भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाज्यावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूंच्या बुरुजांवर पल्लेदार तोफा होत्या. वेशीत संभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खूण केली. दोघे पायउतार झाले.

शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारीत शंभूराजे म्हणाले, ‘शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराजसाहेब गेले दोन दिवस तुमची वाट पाहण्यात बेचैन आहेत.’

मेणा आला. शंभूराजे पुढे आले. मेण्याचा पडदा सरकावला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या. पागोटे, चुणीदार विजार हा संभाजीचा वेष होता. कमरेला तलवार लटकाविली होती. वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसरूड फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजीने पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले. न राहवून मासाहेबांनी संभाजीला छातीशी ओढले, आणि त्याचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला, ‘महाराजसाहेब वाट पाहत आहेत.’

संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले; आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता. वेष निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते, थक्क करणारे होते.

वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळत होते. त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकताच शिवाजीची नजर खिळून राहिली. मंद गतीने घोडी पुढे जात होती. वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दरवाज्याशी तांबडे एकसारखे वेष घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाज्यात आला. शिवाजीने खोगिरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले; घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला; आणि जमिनीवर अलगद उडी मारली. शिवाजी पायऱ्यांजवळ आला. त्याने वर पाहिले- वाड्याच्या प्रवेशद्वारी उंची पुरी, रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर रुळत होते. डौलदार दाढी शोभत होती. संभाजीने शिवाजीला नाजूक ढोसणी दिली; आणि त्याने मुजरा केला. पण शिवाजी मुजऱ्याकरिता वाकले नाहीत. वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते. वाड्याच्या दरवाज्याशी शिवाजीराजांच्या वरून भात ओवाळून
• टाकला गेला. पायांवर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आक्षर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होते. शहाजीराजे म्हणाले,

“या, राजे!”

शिवाजीमहाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यावर बसले. दोन्ही हात जमिनीला टेकवून त्यांनी शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठविले, कुरवाळले. शहाजीराजे म्हणाले,

“दादोजी! आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही, वाटतं ?”

‘आम्हांला मुजरा येतो, आबासाहेब! पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. ‘अस्सं!… आणि राजे, थोराड घोड्यावर बसून आलात, तट्ट का नाही घेतलं? मोठं घोडं बसायला कठीण.”

त्याच धिटाईनं शिवाजीराजे म्हणाले, ‘कसलं कठीण, आबासाहेब? घोड्यावर

बसायला मांड बळकट लागते.’

‘व्वा, राजे!’

तेवढ्यात दारी मेणा आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे सरसावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होता, त्याहीपेक्षा आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या; आणि तुकाबाई सामोऱ्या येऊन पाया पडल्या.

‘धाकट्या राणीसाहेब, पाया पडायची गरज नव्हती. ‘आपला मान मोठा! पण मला कसं ओळखलंत?’

‘घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही, असं कसं होईल?… पण छोटे राजे

कुठं आहेत? त्यांना आम्हांला पाहायचं आहे!’ तोवर संभाजी- शिवाजींसह एकोजीराजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया

पडले. तुकाबाई म्हणाल्या, ‘किती वर्षांनी परत घर एक झालं!’

‘बारा वर्षांचा वनवास संपला, असं दिसतं.’ जिजाबाई हसून म्हणाल्या.

पहिले दोन-चार दिवस आपण कोठे वावरतो, हेही शिवाजीला कळत नव्हते. अनेक सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवान शिसव्याचे अप्रतिम कोरीव काम कमानीवर, खांबांवर, सज्जांवर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती; पण सारी कशी चूपचाप! वाड्यामागे मांसाहारी, शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या- आमोऱ्यासामोऱ्या एकीत सोवळ्यात वर्दळ करणारे, मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत, तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे. रात्री अपरात्री जाग आली, तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घुंगरांचे, गाण्याचे स्वर कानांवर पडत. एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे,तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते.

एके दिवशी दोन प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीवर बसले होते. शिवाजीराजांच्याकडे पाहताच शहाजीराजे म्हणाले,

‘या, राजे!’

शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले,

‘आबासाहेब!’ शब्द उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले,

“महाराजसाहेब!’

शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, ‘राजे, इतर आम्हांला ‘महाराजसाहेब’ म्हणत असतील; पण तुम्ही ‘आबासाहेब’च

म्हणत जा.”

शिवबा हसला. महाराजांनी विचारले,

‘का आला होता, राजे?’

‘महाराज, आम्ही बंगळूर पाहायला जाऊ?” ‘कोण येतंय् बरोबर?’

‘दादामहाराज आहेत. धाकले राजे आहेत.”

‘आणि वशिला लावण्यासाठी मधले राजे आले! ठीक आहे. जाताना बरोबर स्वार घेऊन जा… पंत, यांना पाठविण्याची व्यवस्था करा. दिवस मावळायच्या आत परत या.’

शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते; नानाविध वस्त्रांनी, भांड्यांनी सजलेल्या पेठा पाहत होते. रस्त्याने जात असता अचानक शिवाजीराजांची नजर खिळली. ते जवळच्या संभाजीला म्हणाले,

‘दादा, ते पाहा.’

दोन गोरे, उंच पुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यांवर केसांचे टोप होते. पायांतल्या बंद वहाणांच्या टाचा खूप उंच होत्या. संभाजीराजे म्हणाले,

“राजे! ते फिरंगी व्यापारी!’

‘कुठं असतात हे लोक?’

‘साता समुद्रांपलीकडे असतात.” ‘मग इथं का आले?’

‘व्यापार करायला.’

‘व्यापार करायला त्यांचा मुलूख नाही?”” संभाजीराजांना त्याचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले.
पण चार दिवसांनी त्या व्यापान्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आता एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलावणे आले. शिवाजीराजे सदरेत गेले. तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर राखे पसरली होती. शिवाजी येताच शहाजीराजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटले, ‘राजे, पाहा एखादी फिरंग पसंत पडते का?’ शिवबांनी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरविली; आणि त्यांची नजर: बंदुका ठेवल्या

होत्या, त्यांवर खिळली. शहाजीराजांनी विचारले,

तुम्हांला बंदूक उडवता येते ?? “आम्ही शिकू.’

‘शाब्बास! आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ.’

व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या. लांब झोकनळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कामगिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांच्यासह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेविला गेला. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले; आणि नेम धरून त्यांनी बार काढला.

नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले,

‘राजे, हे हत्यार चांगलं आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची! आमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार – हवालदाराला सांगेन. तो बंदूक चालवायला शिकवील.”

महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचा सहवास फार आवडे. जे मातब्बर सरदार घरी येत, त्यांना ते शिवबाची ओळख करून देत असत. म्हणत,

‘हा जन्माला आला, आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले, तरी शिवबाला घेऊन जात. शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाई.

तुकाबाई, जिजाऊ महालात असता अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या. जिजाऊंकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, ‘दादोजी आम्हांला हिशेब सांगत होते. मोठं धामधुमीनं शिवबांचं लग्न केलंत,

म्हणे.’

घाबरून जिजाबाई म्हणाल्या, ‘खर्च फार झाला का?’ ‘आणखीन का केला नाही, याची तक्रार आहे. आम्हांला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठविला असता वरातीला.’ ‘आपण येणार, म्हणून सारे वाट पाहत होते.’
‘मनात असूनही ते आम्हांला जमलं नाही. शिवबांचं लग्न पाहायचं फार मनात होतं.”

“मग आणखीन एक लग्न करू. तुकाबाई म्हणाल्या. “खरंच की! आम्ही नाही, ते लग्न कसलं? पण नवरी?’ ‘ती मी पाहिलीय. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना! नक्षत्रासारखी मुलगी

आहे.”

‘खरंच! ठरवून टाकू लग्न!” म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले.

जिजाबाईना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या,

‘एक लग्न नुकतंच झालं. तोवर…. ‘राजांना अनेक लग्नं शोभून दिसतात. पहिली केली, ती निंबाळकरांची ना?’ ‘हो!’

‘मोहिते घराणं मोठं तोलाचं.’

तुकाबाईंच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या,

‘मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच.” ‘हो! पण तेव्हा थोरले मामंजी बारगीर होते, हे विसरला.’

‘बारगिराचे राजे झाले ना! वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला, सम्राट झाला. कूळ पराक्रमानं पाहिलं जातं, धाकट्या बाई!’

“सोयरीक नको, म्हणून इकडं सांगायचं का?” ‘तसं केव्हा म्हटलं मी? मी आपलं बोलून दाखविलं.’

तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली.

राजा बोले, दळ हाले, तशी हां हां म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्णअंबारीतून नवरानवरीची वरात काढली. तोफांच्या, बंदुकांच्या आवाजांनी सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली.

शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्यसंपन्न!

स्नान, पूजा-अर्चा, काव्यचर्चा, आयुधघराची पाहणी, लष्करतपासणी, बागबगीचे, रात्री नाचरंग, नृत्यगायन, शृंगार यांत शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई. या दोन्हींत दिवसरात्रीचा फरक होता. मोहिमा, मृगया सोडली, तर दिनक्रम हाच असे. शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत, ते सरदार, मानकरी, शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई. कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे, तर कुणाचे शिंगाच्या आवाजाने.
दोन प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले,

‘आई, आपल्याकडे माणसं येतात, तशी इथं का येत नाहीत?” दोघींनी शिवाजीकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, ‘काय म्हणतोस तू? अरे, इथं किती तरी सरदार, उमराव येतात.’

‘ते नव्हे. आपल्याकडे कसे पाटील येतात. नानू वस्ताद येतो. मावळे येतात. • तुकाबाई छद्मी हसून म्हणाल्या, ‘शिवाजीराजे, हे महाराजांचे ठिकाण आहे. इथं तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे.’

‘राजे कुणाचे?’

‘प्रजेचे!’

‘मग ज्या राजाच्या घरी प्रजा जायला भिते, तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले, तर सारे त्यांना पोहोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामांनी मिठी मारली. तो खरा राजा ना, आई?’

तुकाबाईंचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, ‘जा, खेळ जा बाहेर! बघ, दादा, एकोजीराजे कुठं आहेत, ते!’

शिवबा बाहेर गेला; पण त्याची शंका तशीच राहिली. बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिला; पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या

गोष्टी दिसत होत्या; पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजीराजांना आठवत होते पुणे. नजरेसमोर येत होते शिवापूरवाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कुणाला ?

सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला. पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत, असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले.

बाहेरच्या पटांगणात दोन घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले,

‘या, राजे!’

शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, ‘आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यांतलं उजवं जनावर कोणतं, ते सांगा.’

दोन्ही घोडे सारखे, एका उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ज्ञासारखे घोड्यांभोवती

फिरत होते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखीत होते.
उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्याच्या ओठाळीला हात लावीत असता शहाजीराजे म्हणाले,

‘हं, राजे, चावेल!’

‘हा चावणार नाही. हा चांगला घोडा आहे.”

अश्वपरीक्षेसाठी आणलेला महंमद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला,

“अल हम दुलील्लाह ! उमर लहान, पण जानकारी केवढी !”

‘राजे, तो घोडा काय वाईट आहे?’

‘पायांत बेडी आहे. कपाळावर उतरंड आहे. केव्हा बुजेल, याचा नेम कुणी द्यावा?’ राजांनी सांगितले.

“पंत, राजांना हे ज्ञान कसं?’

‘नेहमी पागेतच असतात राजे! घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं!”

‘तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात,

संस्कृत काव्य करतात, काव्यचर्चेत भाग घेतात; पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्र्यांच्यामुळं सारी वळणं ब्राह्मणी बनली आहेत.’ संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले,

‘राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे, तर तुम्ही घ्या. आम्ही पागेत जातो, तेव्हा एक श्लोक म्हणत असतो… तुम्हांला

संस्कृत येतं ना?”

‘हो, थोडं थोडं.’

‘चालेल! आम्ही सांगतो, तो श्लोक लक्षात ठेवायचा 18

यस्याश्वा तस्य राज्यं यस्याश्वा तस्य मेदिनी यस्याश्वा तस्य सौख्यं यस्याश्वा तस्य साम्राज्यम्।

‘लक्षात राहील? नाही राहिला, तर पाठ करून घेऊ. राजे! ज्यांच्या घरी हे ऐश्वर्य आहे, त्यांचंच राज्य अभेद्य असतं, हे विसरू नका.’ आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, ‘पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमचीच दृष्ट लागायची त्यांना.’

रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंच्याकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या,

‘राजे, तुम्हांला घोडा कसा मिळणार! शिवाजीराजे लाडके, आणि तुम्ही सगळ्यांत धाकटे. तुमच्या नशिबी घोडा नाही.”
ते शब्द काळीज कातरीत गेले; पण जिजाबाई काही बोलल्या नाहीत,

• रात्री जेवणे झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी, संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कोठे गेली, हे त्यांना समजेना. जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठविले. जेव्हा ते दोघे आले, तेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती. जिजाऊंनी विचारले,

‘कुठं सापडले हे दोघे ?’

नाचमहालात गाणं चाललंय् न्हवं तिथं स्वाऱ्या होत्या.’ ‘नाचमहालात?’ जिजाबाई उद्गारल्या.

‘आत न्हवं; बाहिरच! चोरून आत बघत व्हते.’

“जा तू.”

नोकर गेला. जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरविली. त्यांचा स्वर करडा बनला.

“राजे, हे खरं?”

शिवबा काही बोलला नाही.

‘कुणाला विचारून गेला होता, राजे? सांगितलं नव्हतं, रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही, म्हणून?”

शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात तो म्हणाला, ‘दादामहाराज म्हणाले, चल, गंमत बघू या.’ ‘अन् तुम्ही नाचगाणं… तेही चोरून… पाहायला गेलात! शरम वाटली नाही?’

चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ

घेत त्या म्हणाल्या,

‘राणीसाहेब नाचगाणं पाहिलं, म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही, तर कुणी?”

‘बाई, लहान असलीस, तरी हात जोडते. तू यात पडू नको.’ – आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले.

‘उगीच लहान सहान गोष्टींवर कसलं रागवायचं? हे चालायचंच!’

‘हे तुम्हांला चालेल! आम्हांला ते परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकायचं

नाही.” तुकाबाईही संतापल्या. त्या म्हणाल्या, ‘कळतात बोलणी! राणीसाहेब, एवढी काळजी वाटते, तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही?” ‘खरंच सांगायला हवं.’ जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या, ‘ज्या घरात मूल वाढतं,

तिथं कसं वागावं, हे मोठ्यांना कळायला हवं.’ तुकाबाई आल्या, तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंदके देत झोपी गेले;पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत.

दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधीत होत्या. सायंकाळी ती ● मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, • एकोजी सारे होते. बोलता-बोलता शहाजीराजांनी विचारले, ‘आम्ही विसरलोच ! काल शिवबांची कुणी दृष्ट काढली का?”

‘खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली.’ ‘आम्ही समजलो नाही.’ शहाजीराजे हसून म्हणाले.

‘राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील, असं त्यांना वाटतं.’

‘असं कोण म्हणतं?”

“खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथं राहायचे झाले, तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत, असं म्हणतात.’

‘मतलब?’ गंभीर होत महाराज म्हणाले. ‘काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते.’

‘मग?’

‘ते बंद झालं पाहिजे, असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. ‘

‘खरं?’ जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले,

‘आमच्या सवयी बदलणं कठीण! ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील, असं वाटत असेल, तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं!’

महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या,

‘बघा, बाई! तुम्हीच म्हणालात सांगा, म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता.

एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला

बरा, असे जिजाबाईंना वाटले.

एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला.

शिवाजीराजे पुण्याला जाणार, हे साऱ्या वाड्यात पसरले. वर्ष-दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता. ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगीत असत. सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले,

शहाजीराजांचा ‘राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार आमची आठवण येईल ना?’ ‘आबासाहेब!’ म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले. “हो हां। राजे। पुरुष कधी रडतात का?? कंठ दाटून आल्याने स्वर घोगरा झाला होता. शेजारी दादोजी हे पाहत उभे होते.

शहाजीराजे म्हणाले,

‘दादोजी, आम्हीदेखील पुण्याला येऊ लवकरच.’

‘खरंच याल?’ शिवबांनी हसत विचारले. ‘अगदी खरं! आता तुम्ही जहागिरदार तुम्ही आज्ञा केलीत, की आम्ही आलोच!’ ‘आमची कुठं आहे जहागीर?’ शिवबांनी विचारले.

‘मग आहे, ती कुणाची?’

‘आपली.’

”राजे!’ दादोजींनी दटावले.

शिवाजीराजे कावरेबावरे झाले. काय चुकले, हे त्यांना कळेना.

राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, ‘दादोजी, राजांचं खरं आहे. आपलं म्हटल्याखेरीज प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो, कशाकरिता? ती तयार व्हावी, म्हणून ना? मग जहागिरदार तयार करायचा झाला, तर जहागीर नको? पंत, आमच्या जहागिरीतला छत्तीस गावांचा मोकासा राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे. नाव मात्र दप्तरी न राहता त्याचा अंमल सुरू करा. राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे. राजे, ही जहागीर राखलीत, तर पुणे जहागीर तुमची!’

पंत म्हणाले, ‘राजे, पाया पडा! नशीब थोर, म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर, म्हणून हे पाहायला मिळालं. ‘

शिवबांनी शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांना हृदयाशी कवटाळीत शहाजीराजे पंतांना म्हणाले,

‘पंत, या पोरानं वेड लावलं. उद्या हा गेला, म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलंत तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटविलीत.’ पंतांचे डोळे ओले झाले. उपरण्याने त्यांनी डोळे पुसले.

दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव नीळकंठ, नारोपंत दीक्षितांचे चुलतभाऊ बाळकृष्णपंत अमात्य म्हणून पाठविण्याचे ठरले. त्याखेरीज़ जहागिरीचे मुतालिक म्हणून दादोजीपंतांची नेमणूक होती, ती निराळीच.

शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले,

‘संभाजीला थोडे दिवस नेऊ का?” ‘नको! राणीसाहेब, संभाजी आमच्या वातावरणात वाढले. ते इथं रमलेत. राहू

दे त्यांना तिथंच!” ‘आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून…!’

‘आम्ही रागानं म्हणत नाही. आम्हांलाही तुमचा विचार पटला. म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय्. त्यांना पाहून आम्हांला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो. तुम्ही शिवाजीराजांना करा.’ आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले, ‘पाहू, कोण सरस ठरतं, ते!’

जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाबाईनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले,

‘पंत! राजांना संभाळा. त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर

तुमच्या हवाली करीत आहो. जीवमोलानं तिचा संभाळ करा.’

• गावाबाहेर पहिल्या मुक्कामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोहोचवायला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागल्या. संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले.

बंगळुराहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते. थोडे मोठे झालेले. बदल पडला होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत. आता फडाला भारदस्तपणा आला होता, आदब आली होती. कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते.

दीड वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजी नऱ्हेकरांच्याकडून समजावून घेत होते. दप्तरतपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवीत होते; पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावीत होते. राजे स्नान व देवाला नमस्कार करून आले. जिजाबाई वाट पाहत होत्या.

मासाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले; आणि दुधाचा पेला त्यांनी ओठी
लावला. दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या,

‘राजे, आता उठा। नाही तर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील.” तोच नोकर आला. त्याने वर्दी दिली, ‘मुधोजीराव निंबाळकर आले आहेत.’ शिवाजीराजे गडबडीने उठले. बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, ‘राजे, मुधोजीराव आपले सासरे. उघड्या डोक्यानं सामोरे जाऊ नका.” महाली जाऊन, पागोटे घालून, शिवाजीराजे बाहेर गेले. ‘या, राजे! काय म्हणतं बंगळूर ?’ मुधोजीरावांनी विचारले.

राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुधोजीराव उठले. मुजरा केला. जिजाऊंनी विचारले, ‘मामासाहेब, आपण आलात. आमची सून नाही आणलीत?”

‘आणली तर! नाही तर राजे रागावतील ना!’ मुधोजीराव म्हणाले, ‘राणीसाहेब, तो पाहा, मेणा आलाच. ‘

वाड्याच्या दारासमोर मेणा थांबताच दासी धावल्या. दादोजी पगडी, उपरणे सावरून पायऱ्या उतरले. पायांवर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांचा त्या स्वीकार करीत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला. वाड्याच्या • प्रथम सदरेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. जेथे दादोजी होते, तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, ‘भारीच पोक्त झालीस, हो! आणि नवऱ्याच्या कुणी पाया पडायचं?”

आणलेला भाव कुठच्या कुठे गेला. सईबाई खुदकन हसल्या, आणि जिजाऊंना बिलगल्या. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या,

‘आता कशी शहाणी झालीस! पण भारी ऐट करू नको. राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली. ‘

“करू द्या.’

‘तुझ्यापेक्षा छान आहे. गोरी गोमटी आहे.’

‘असू दे! माझ्याबरोबर खेळायला येईल ती.’

सारे हसले. मुधोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, ‘खरंच, मोठी राणी शोभणार ही!’
दोन दिवसांनी मुधोजीराव सईबाईना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईंच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईंचा खेळ वाड्यात रंगत होता.

दुपार टळली होती. सईबाई मासाहेबांच्याकडे आल्या. मासाहेबांनी वर पाहताच त्या म्हणाल्या,

‘मामीसाहेब!’

“थोबाड फोडून देईन, पुन्हा ‘मामीसाहेब’ म्हटलंस, तर.’ सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या,

‘मासाहेब!’

हसू लपवीत जिजाबाई म्हणाल्या, ‘काय पाहिजे आता? सई! अग, लौकर मोठी हो. तू आणि तुझ्या पोरी सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नव्हे.’ सईबाई हिरमुसल्या होऊन वळल्या. जिजाबाई ओरडल्या,

‘ये! मागे फीर. ‘

सईबाई वळल्या. मासाहेबांनी विचारले,

‘का आली होतीस?’

‘आज शुक्रवार. जोगेश्वरीला जाऊन येऊ का, म्हणून…’

‘मग जा ना! पंतांना सांग जा…’ सईबाई धावत गेल्या. दादोजी काही तरी लिहीत होते. सईबाईंना पाहताच

दादोजींनी विचारले, ‘राणीसाहेब! काय हुकूम ?”

‘अशानं आम्ही बोलणार नाही.’ सईबाई म्हणाल्या.

‘खरंच, तुम्ही राणीसाहेब! आता त्या मासाहेब आणि तुम्ही राणीसाहेब.’

‘पंत, आम्ही देवाला जाऊ?’

‘जरूर! मी मेण्याची व्यवस्था करतो.’

संध्याकाळी सईबाई दासी-मैत्रिणींसह जोगेश्वरीला गेल्या.

नवरात्र जवळ आले. घट बसले. वाड्याच्या चौकात दरदरोज बकरे पडत होते. नवरात्राचे दिवस केवढे धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजविलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात तर एकच गडबड उडालेली असे. नवरात्र जवळ आले, की सारी शखे धुऊन, पुसून, उजळून चकचकीत केली. • त्यांत जात. मीठ आणि चिंचेचे बोळे घेऊन तलवारी, जंबिये, विटे साफ केले जाते. घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लाविलेली असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे, नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जंबिये, बिचवे, कटारी असत. त्यांच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यांसारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणेपण, त्यांचा बोज राजे समजावून घेत.

वाड्याच्या देव्हाऱ्यात सुवर्णसमया अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊच्या पानांची माळ वर बांधली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत.

नवरात्रात दररोज रात्री वाड्यात चौकामध्ये गोंधळ उभा राही. ‘उदे, ग! अंबे, उदे।’ च्या घोषाने वातावरण भरून जाई. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्यांची माळ घातलेले, तेल माखून घेतलेले भुत्ये आपले फेटे सावरीत हाती संवळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळविला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचायला सारे उतरले, की पोतांच्या हेलकाव्याबरोबर जी •फरफर घुमे, ती ऐकण्यात राजे रंगून जात.

• खंडेनवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात • बकऱ्याचा बळी पडे; आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. नऊ दिवस पूजेत राहिलेली आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढीत.

सायंकाळी चांगले कपडे करून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांच्या गालाला

तीट लावीत जिजाबाई म्हणाल्या, “राजे, आता फार दिवस हे सीमोल्लंघन चालायचं नाही.’

‘मग काय करायचं?”

‘या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं. शत्रूचा बीमोड करायचा. घर यशानं भरायचं. पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं.’ ‘आम्ही तसंच करू.’

राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजविलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मांड टाकली. राजांच्या बरोबर दादोजीही जात होते. मागे-पुढे घोडेस्वार चालत होते. सोन्याच्या माळावर येऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली, आपल्या तलवारीने सोने पाडले, आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाज्यात सईबाईनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले.

“राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या,

‘राजे, आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा.’ राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले,

‘झालं?’ ‘हो!’

राजे वळले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यांतील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली, आणि राजांच्या मस्तकी लावली. ● राजांनी विचारले,

‘मासाहेब, ही अंगठी का ठेवली?”

‘राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आलात ना! तुमच्या मागून लक्ष्मी येते. पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली, की तिचा पाय तोडायचा.’

‘पाय तोडायचा?’ राजे उद्गारले.

‘हो! एकदा का तिला लंगडी केली, की घराबाहेर कशी जाईल?’

राजे हसले.

जिजाबाई म्हणाल्या, ‘राजे, आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मीमागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या • पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी, आणि संकटे समोर बघावीत. हे विसरू नका…. दादोजी वाट पाहत असतील. सदरेत जा.’

राजांनी जिजाबाईंना वंदन केले; आणि राजे सदरेत गेले.

सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार आले. पाटील, वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी, नोकर आले. घराचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांनाकवटाळले.

जिजाबाई म्हणाल्या, ‘राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या?” दादीजी राजांना जवळ घेत म्हणाले, “मासाहेब, ही मोहर माझीच आहे. यापरतं भाग्य नाही.’

Leave a Comment