श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10
राजांची दौड सुरू झाली.
राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. ‘केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला, म्हणे.’
‘भारीच धाडशी पोर.’ जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. ‘तेच सांगण्यासाठी आलो होतो मी. वेळीच राजांना आवरणं आवश्यक आहे.’
“आम्हांला वाटलं होतं की, तुम्हीही राजांचं कौतुक कराल.’ ‘कौतुक जरूर वाटतं, मासाहेब! म्हणून जबाबदारी कशी विसरता येईल? मासाहेब, राजांच्या शिकारीचा छडा लावलाय् मी. राजे रोहिडेश्वरी देवदर्शनाला जातो, म्हणून सांगून गेले होते. त्यामुळं मी परवानगी दिली. बरोबर शिकार हवालदार नसता मी शिकारीला परवानगी दिली नसती.’
‘गैरसमज होतोय्, पंत. आम्ही सुद्धा चौकशी केली. मारलेल्या गाईमुळं गाव कष्टी झालं होतं. ते पाहून राजांचं मन कळवळलं. वाघाची शिकार करून प्रजेला ते संकटमुक्त केलं, याचा आमच्याप्रमाणेच तुम्हांलाही अभिमान वाटायला हवा.’ ‘का वाटणार नाही? राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे.”
‘काय म्हणायचं आहे तुम्हांला ?’ न समजून जिजाबाईंनी विचारले. “मला एवढंच म्हणायचं आहे, मासाहेब! राजे असं धाडस वापरायला अजून
मुखत्यार नाहीत.’ “कारण ?”
‘कारण विचारता, मासाहेब? राजांनी वाघावर गोळी चालवली. वाघ जखमी
झाला. भाला घेऊन ते पुढं सरसावले. मासाहेब, जरा डोळ्यांपुढे प्रसंग आणा…
वाघ कच्चा जखमी असता… त्यानं झेप घेतली असती, राजांच्या छातीवर आपले
पंजे रोवून….
‘पंत!’ मासाहेब ओरडल्या. घामाने चेहरा भरून गेला होता. ‘नाइलाजानं बोलावं लागतं, मासाहेब! कोवळं वय वेडं धाडस. शिकारीची वार्ता ऐकताच सारं शरीर गलितगात्र झालं. उठायचं बळ पायांत राहिलं नाही. मासाहेब, जीवनात आलेला आनंद, दुःख माणूस सहन करतोच. तुम्हीही सहन केलं असतं. पण आमची काय वाट? एका राजांच्या जिवावर, मासाहेब, आज हजारो घास खाताहेत. लाखांचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल?”
दादोजींना बोलवेना. त्यांनी डोळे टिपले. ते म्हणाले,
‘मासाहेब, हे तुम्हीच राजांना सांगू शकाल. वेळीच जरब बसली नाही, तर पुढं काही उपयोग होत नाही. यावर निर्णय आपला.’
पंत थकल्या पावली निघून गेले. मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते. दादोजींनी सांगितले, त्यात काही खोटे नव्हते. मासाहेबांचा राग उफाळला. त्याच संतापाने त्या राजांच्या महाली गेल्या. मासाहेबांना आत आलेल्या पाहताच शिवाजीराजे उभे राहिले. मासाहेबांनी एकदम विचारले,’राजे, कुणाला विचारून शिकारीला गेलात?”
‘मासाहेब, आम्ही…’ ‘त्या भाकडकथा बाहेरच ऐकल्यात मी! त्या नका सांगू, बार चुकला असता,
तर…’
‘मासाहेब, आबासाहेबांनी आम्हांला विश्वासानं बंदूक दिली. आमचं निशाण चुकत नाही, हे तुम्हीही जाणता. आम्हांला माहीत आहे… ते पंत सांगणार, आणि तुम्ही….
‘शिवबा!” मासाहेबांचा आवाज करडा बनला, ‘कुणाबद्दल हे बोलता? क्षमा मागा!’ राजांनी आवंढा गिळला. ते म्हणाले, ‘पण आमचं…’ “क्षमा मागितल्याखेरीज एक शब्दही बोलू नका!’
राजांच्या डोळ्यांत पाणी तरळले. ते कसेबसे म्हणाले,
‘आम्ही चुकलो. क्षमा करा!’ ‘दादोजींची जाऊन क्षमा मागा. त्यांना हे वचन द्या.’
“जशी आज्ञा!’
संतापाने फुललेले, डोळ्यांत पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजीराजांचे रूप पाहून मासाहेबांचे मन कळवळले. त्यांनी राजांना मिठीत घेतले; पण मिठीतून बाहेर
पडून राजे जाऊ लागले. ‘कुठं निघाला?’
मागे न पाहता राजे म्हणाले, ‘पंतांच्याकडे!’
पंत आपल्या खोलीत बसले होते. राजांना पाहताच ते म्हणाले,
‘राजे!’
● शिवाजीराजे काही न बोलता वाकले. त्यांनी पंतांचे पाय शिवले. पंत आशीर्वाद
पुटपुटत म्हणाले, “हे काय?”
‘आम्ही पुन्हा असं वागणार नाही… क्षमा करा…..
‘क्षमा केव्हाच केली, राजे! चूक कुणाच्या हातून होत नाही? एकदा केलेली चूक ध्यानी आली, आणि ती परत केली नाही, की माणसाला सुधारायला फारसा वेळ लागत नाही.’
पंतांचे बोलणे संपताच राजे वळले, आणि आपल्या महालात गेले. थोपविलेले ओघळत होते. रात्री दिवे लागले, तरी राजे महालीच पडून होते. पावलांचा अश्रू
आवाज येताच त्यांनी डोळे उघडले. सईबाई उभ्या होत्या.
‘काय पाहिजे?’
‘जेवायला बोलावलंयू!’
‘कुणी?’
‘मासाहेबांनी!’
‘आम्हांला जेवायचं नाही, म्हणून सांगा.’
‘असं काय…?’
“सांगितलं ना? मग जा.”
•गाल फुगवून सईबाई म्हणाल्या, ‘मग आम्हीही जेवणार नाही.’
“नका जेवू. तुम्ही जेवला नाही, म्हणून जग उपाशी मरायचं नाही. जा!’ सईबाई धावत महालाबाहेर गेल्या. रात्र झाली, वाढली, पण राजांना परत
बोलवायला कुणीच आलं नाही.
सकाळी राजांचे स्नान झाले. देवदर्शन झाले. महालीच दूध पिणे झाले. हे सारे मासाहेबांना चुकवीत झाले. पलंगावर वाघाचे छावे झोपले होते. सईबाई त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर पावले वाजली, म्हणून राजांनी पाहिले. दारातून मासाहेब आत येत होत्या.
मासाहेबांना पाहताच राजे पाठ फिरवून उभे राहिले. सईबाई बच्चे न दिसतील, अशी खबरदारी घेऊन पलंगाशेजारी उभ्या राहिल्या. राजांच्या कानांवर शब्द आले, ‘राजे, आईला पाहून केव्हापासून पाठ फिरवू लागलात ? आम्हांला पाहून एवढे
कष्ट होत असतील, तर आम्ही जातो. आपल्याला आजही भूक नसेल, तर तसं
कळवा. आमचं जेवण आजही बंद ठेवू. तेच विचारायला आम्ही आलो होतो.’ मासाहेब जेवल्या नाहीत. त्यांना उपास घडला! राजांना असह्य झाले. ते वळले. आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले. एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले. मासाहेब म्हणाल्या,
‘राजे, पुसा ते डोळे! राजांनी डोळे ओले करायचे नसतात. बायकोसमोर तर मुळीच नाही. काल तुम्ही शिकार केलेली सांगितलीत; पण वाघाचे छावे आणलेले सांगितले नाहीत. ते आम्हांला पाहायचे आहेत. कुठं आहेत?’ राजांची नजर पलंगाकडे गेली. सईबाई गोंधळून उभ्या होत्या. पिलांना त्यांनी
आडोसा धरला. या बाजूला झाल्या. मासाहेब पुढे झाल्या. गादीवर ते एकमेकांना
बिलगून झोपले होते.
‘छान आहेत.’ सईबाईंच्याकडे वळून म्हणाल्या, ‘यांची जोखीम सूनबाईंच्यावर दिसते. तूही या खेळात सामील झालीस का?…. ‘बोथडीनं पाजावं लागतं, मासाहेब! सकाळीच दूध पाजलं.’ दूध पितात?’
“छान केलंस! पण तू काही खाल्लंस का?’
रागाने राजांच्याकडे पाहत सईबाई म्हणाल्या,’एक दिवस जेवलं नाही, म्हणून जग उपाशी मरत नाही.’ रागाने सईबाई निघून गेल्या. शिवाजीराजांच्या ओठांवर हसू उमटले.
गजबजून उन्हाळा आला, तसा लाल महालाचा मुक्काम खेडबाऱ्याच्या वाड्यात हलला. राजे, जिजाबाई, दादोजी यांच्या खेडबाऱ्याच्या मुक्कामाबरोबर खेडबारे गेले. वाड्याकडे वर्दळ सुरू झाली. दादोजींनी शिवापूरला लावलेल्या आंब्याच्या बागांनी रूप घेतले होते. राजे दादोजींच्या बरोबर अनेक वेळा बाग पाहायला जात..
• फाल्गुन पुनव जवळ येत होती. घरी सणाची तयारी चालू होती. फाल्गुन पुनवेला सकाळी वाड्यासमोर होळीचौकात साफसफाई झाली होती. एरंडाचे भले थोरले झाड वाजत गाजत आणले गेले. ते सांगायला राजे धावत आत गेले. आतल्या सोप्यात सई उभी होती. राजांनी विचारले,
‘मासाहेब कोठे आहेत?’
‘आपल्या महालात रडताहेत.’
‘काय झालं?’
‘मी विचारलं. पण सांगेनात. खेळ जा, म्हणाल्या.’
राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांना पाहताच जिजाबाईंनी गडबडीने डोळे पुसले. राजे जवळ गेले, बसले; आणि जिजाबाईंच्या गळ्यात पडत त्यांनी विचारले,
‘मासाहेब, काय झालं?’
त्या एका वाक्यात आवरलेले अश्रू झरू लागले. शिवाजीराजांना कवटाळून त्या रडत होत्या. राजांनी कष्टाने मिठी सोडविली. मासाहेबांचे अश्रू पुशीत ते म्हणाले,
‘मासाहेब, आमची शपथ आहे.’ ‘हां, राजे! सुटली म्हणा!’
‘म्हणतो. पण का रडता, सांगा!’
‘सांगते. सुटली, म्हणा!’
‘सुटली!’
जिजाबाईंनी डोळे पुसले. राजांना जवळ घेत त्या म्हणाल्या, ‘राजे, तुमच्या दादामहाराजांची आठवण झाली.’
‘का?’ ‘त्यांचा आज वाढदिवस. तुमचा वाढदिवस आम्ही करतो, पण यांचा कोण करीत असेल?”
‘मासाहेब, मग दादासाहेब महाराजांना बोलावून का घेत नाही?” जिजाबाईचे डोळे भरले. त्या अश्रू आवरीत म्हणाल्या,
“तेवढं हातांत असतं, तर शंभू लांब का राहिला असता?’ गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या,
राजे चला. आज होळीचा दिवस. काम फार आहे.’
होळीचा सण झाला; आणि उन्हाळा आपल्या रखरखीत पावलांनी अवतरला. मोहोरलेल्या आम्रवृक्षांनी आपल्या धरतीवर छाया धरली. वाढत्या दिवसांबरोबर आंब्याचे शेडे फळभाराने धरणीकडे झुकत होते.
दादोजी दोन प्रहरच्या वेळी शहापूरच्या आंबराईतून फिरत होते. आंब्याच्या डेरेदार झाडांनी बाग सजली होती. कुठे तरी आंब्यांना तुरळक आंबे लटकत होते. पाच-सहा वर्षांच्या परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. नुकतीच आळी केलेली ती झाडे समाधानाने पाहत दादोजी जात होते. पाठीमागून कृष्णाजीपंत
चालत होते. दादोजी म्हणाले, ‘कृष्णाजी लवकर फळं धरली.”
‘पंत, याचं श्रेय तुम्हांला. शिवापूरला, शहापूरला, जिजापूरला तुम्ही चांगल्या बागा वसवल्या; माळरानावर नंदनवन केलंत.’
‘थोरल्या महाराजांना आंबे फार आवडतात. जेव्हा महाराज येतील, तेव्हा दुसऱ्या कशाला नसेल, तरी या बागांसाठी माझी पाठ थोपटतील.’
“पंत, ऊन्ह फार आहे. वेळही पुष्कळ झाला.’
‘हो ना! परंतू या.’
पंत वळले. आंबराईबाहेर घोडी उभी होती. जात असता अचानक पंतांचे पाऊल थबकले. एक राजस आंबा झाडावर हाताच्या उंचीवर डोलत होता. पिवळसर छटा आंब्यावर उमटली होती. न कळत पंतांचा हात उंचावला; आणि यांनी तो आंबा तोडला. आंब्याचा वास पंतांनी घेतला. आंबा पाहत असता यांचे हास्य मावळले. चेहरा गंभीर झाला. अंग कापू लागले.
‘काय झालं, पंत?’ कृष्णाजी म्हणाला. रागाने आंबा भिरकावून देत पंत उद्गारले,
‘केवढा मी असंयमी! केवढा पापी! धिक्कार असो…!’
पंत पुटपुटत तरातरा पावले टाकीत जात होते. कृष्णाजीपंतांना काही कळत नव्हते, समजत नव्हते. कृष्णाजीपंतांच्याकडे न पाहता दादोजींनी घोड्यावर मांड टाकली, टाच मारली. घोडे उधळले. वाड्यात जातानादेखील पंत कुणाशी बोलले नाहीत. वाड्याच्या मागे आपल्या निवासस्थानी ते निघून गेले.
जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. शेजारी सईबाई बसल्या होत्या.
पावलांच्या आवाजाने जिजाबाईंना जाग आली. घाबऱ्या झालेल्या गंगाबाई आत आल्या. जिजाबाईंना त्या म्हणाल्या, ‘राणीसाहेब! चला. हे कसंसंच करायला लागलेत.”
‘काय झालं?’ गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या. ‘भ्रमिष्टासारखे करताहेत. शिवापूरला बागेत गेले होते. तिथून आले, ते तलवार उपसून हात तोडायला बसले. वेळीच आवरलं, म्हणून बरं, बरं-वाईट आपल्यालाच बोलून घेताहेत. कुणाशी काही बोलत नाहीत. रडणं पडणं चालू आहे.’
गंगाबाईच्या बरोबर जिजाबाई धावल्या. मागोमाग सईबाई होत्या. तोवर शिवाजीराजे आले. सारे पंतांच्या निवासस्थानी गेले. खोली माणसांनी भरली होती. जिजाबाई राजांना पाहताच सारे बाहेर आले. जिजाबाई आत गेल्या. आतले दृश्य निराळेच होते. पंतांच्या दंडाला दोघांनी धरले होते. कोपऱ्यात तलवार पडली होती. पंत धापा टाकीत होते. पंतांनी नजर वर केली; आणि मासाहेबांना पाहताच ते म्हणाले,
‘मासाहेब!’
पंतांना पुढे बोलवेना. ते रडू लागले.
मासाहेबांनी मागे वळून पाहिले. भीतीने गारठलेले राजे, सईबाई उभे होते.
मासाहेब म्हणाल्या,
‘राजे, सई, तुम्ही वाड्यात जा. इथं कुणी राहू नका.’ क्षणात सारे पांगले. पंतांना धरलेल्यांना जिजाबाई म्हणाल्या,
‘पंतांना सोडा, आणि बाहेर जा.’ दोघे गेले. गंगाबाई पंतांच्या शेजारी बसल्या. जिजाबाई जवळ जात म्हणाल्या,
उठून ‘पंत, काय झालं? कशासाठी हा त्रागा?’
‘काय झालं?’ हाताचे पंजे पुढे करीत पंत म्हणाले, ‘मासाहेब, ह्या हाताला विचारा!’ आणि पंतांनी उजवा हात ताड ताड कपाळी मारून घेतला.
‘पंत!’ जिजाबाई ओरडल्या.
‘मासाहेब, हा दादोजी चांडाळ आहे! आज त्यानं चोरी केली!”
‘चोरी?’
‘होय, मासाहेब. त्याचं ताडन ह्या हाताला झालंच पाहिजे. बुद्धी फिरली. खाल्ल्या अन्नावर उलटला!’ म्हणत दादोजी तलवारीकडे वळले.
‘दादोजी, थांबा! काय झालं, ते सांगितल्याखेरीज रेसभरही पुढं सरकू नका.” ‘काय सांगू, मासाहेब? कोणत्या तोंडानं सांगू? थोरल्या महाराजांच्या परवानगीविना
या दादोजीनं राजांच्या बागेतला एक आंबा तोडला.’ ‘मग त्यात काय झालं?’ जिजाबाईनी विचारले.
‘काय झालं? मासाहेब, कोणत्या तोंडानं राजांना काही सांगायला जाऊ? लहान काय, आणि मोठी काय, चोरी, ती चोरीच ! तिचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे.’ दादोजींनी एकदम तलवारीला हात घातला. मासाहेब ओरडल्या, ‘हां, दादोजी, ज्यांची एवढ्या इमाने इतबारे सेवा करता, त्या तुमच्या थोरल्या
महाराजांची, माझी, शिवबाची शपथ आहे. टाका ती तलवार!’ • दादोजींच्या हातून तलवार पडली; आणि उपरण्यात तोंड लपवून ते रडू लागले.
एवढ्या वयोवृद्ध, तपोवृद्ध माणसाला रडताना पाहून जिजाबाईंचा जीव गुदमरला. ‘पंत, घडलं, ते नकळत! झालं, होऊन गेलं. तुमच्या आधारावर आम्हांला इथं पाठविलं गेलं. काही अविचार करून बसला असता, तर आम्ही काय करणार होतो? तुम्ही वयानं, मानानं मोठे. तुम्हांला काही सांगण्याचा अधिकार नाही. पण राहवत नाही, म्हणून सांगते… काही झालं, तरी आम्हांला विसरू नका.’
दुसऱ्या दिवशी दादोजी दप्तरी गेले, तेव्हा सारे त्यांच्याकडे पाहत राहिले. शामराव नीळकंठ उद्गारले,
‘दादोजी, हे काय?’ ‘काय झालं?’
‘तुमच्या अंगरख्याला बाही नाही…..
‘काढून टाकलीय्.’ दादोजी बैठकीवर बसत, हसत म्हणाले, ‘काल थोरल्या राजांच्या बागेत गेलो होतो. आंबा दिसला. धन्याच्या परवानगीविना तोडला. चोरी
केली. त्याची ही शिक्षा आहे.’
‘किती दिवस असा अंगरखा घालणार?’
‘किती दिवस? साऱ्यांना हा एक बाहीचा अंगरखा सरावाचा होईपर्यंत. गुन्हा करताना लाज वाटली नाही. निस्तरताना तरी का लाजावं?’
पंत हसले, पण कुणी हसू शकलं नाही.
