मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण

मराठा ते मराठेशाही कुळवाडी भूषण

Maratha Empire मराठा साम्राज्य मराठेशाही

प्राकृतातील शब्द मरहट्टी, मरहट्टा, महारट्टा पुढे संस्कृतात मराठी, मराठा, महाराष्ट्र झाले असावेत, असा अनेक संशोधक अभ्यासकांचा दावा आहे; परंतु मराठा कोण? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. भारताचा प्राचीन इतिहास प्रामुख्याने वायव्य, उत्तर गंगा-यमुना खोरे ते पुढे ईशान्यकडे पसरलेल्या प्रदेशाशीच संबंधित लिहिला गेला आहे. नर्मदा वा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील महाराष्ट्रासह जवळपास सर्वच दक्षिणेचा प्राचीन इतिहास साधारण मौर्य साम्राज्याच्या -हासापासून वा इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून समोर येतो. सातवाहन राजा हाल यांनी लिहिलेला गाथा सप्तशती हा मऱ्हाटीतील उपलब्ध असा पहिला ग्रंथ मानतात. त्याचा कालखंड साधारण इ.स.पूर्व २०० मानतात. अलीकडच्या काळात पुरातत्वविद्या बरीच विकसित झालेली आहे. त्यातील काही उत्खननाच्या संशोधनानुसार आजच्या महाराष्ट्र राज्यात सुमारे इ. स. पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी प्रगतीशील शेती होत असे. तसेच मध्य पाषाण युगातही गोदावरी-प्रवरा परिसरातील नेवासे भागात मानव वस्ती होती. सावळदे (खानदेश) इ.स.पूर्व २५००, दायमाबाद-जोर्वे (अहमदनगर) इ.स. पूर्व २२००-१०००, माळवा तापी-कृष्णा-गोदावरी खोरे इ.स.पूर्व १८००- १७००, इनामगाव (पुणे) इ.स.पूर्व १७००-९००, नागपूर-भंडारा जिल्हा, पूर्व विदर्भ- इ.स.पूर्व १२०० याप्रमाणे मानववस्ती वसाहती व शेतीचा शोध लागलेला होता. याचाच अर्थ महाराष्ट्रात इ. स. पूर्व दोन हजार वर्षांपूर्वीपासून मराठा समाज व मराठी भाषा यांचे अस्तित्व होते. वायव्य भारतातील सिंधू संस्कृतीचा -हास सुरू असतानाच तिकडील विस्थापित शेतकरी व इतर व्यावसायिक दक्षिणेकडे स्थलांतरित झाले असावेत, असे मानणाराही अभ्यासक वर्ग आहे. जगभर पसरलेल्या गोंडवनाचा भागही विदर्भ-महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र दक्षिण व उत्तर भारताच्या मध्यावर आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून महाराष्ट्राची संस्कृती संमिश्र आहे; परंतु ती दक्षिणेला द्रविडी संस्कृतीला जवळची आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकापासून पैठण वा सोपारा या अद्ययावत नगरांचा तसेच बाजारपेठांचा उल्लेखही सापडतो. आधुनिक मानव प्रजाती-होमो सेपिअन भारतीय गोंडवनात उत्क्रांत झाला असावा, असे मानणाराही वर्ग आहे. या सर्व मांडणीवरून किमान एवढा एक निष्कर्ष जरूर निघतो की, महाराष्ट्रात पाषाण युगापासून मानव वस्ती होती. ताम्रपाषाण युगात आजच्या सर्व महाराष्ट्रात वसाहती, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, समाजव्यवस्था, भाषा-बोली विकसित झाल्या होत्या. निसर्गातील चढउतार वगळता बहुताशी महाराष्ट्रातील मानवी जीवन सुमारे आजपासून चार हजार वर्षांपूर्वी बरेचसे स्थिरावले होते असे म्हणता येते. दहा हजार वर्षांपूर्वी मानवास शेतीचा शोध लागला. तेव्हापासून सुरू असलेली नागरीकरणाची प्रक्रिया आजही नव्या स्वरूपात सुरूच आहे. 

याचदरम्यान समाजव्यवस्था निर्माण झाली. कुटुंबे आली, वस्तू व इतर आपसात विनिमयासह हातवाऱ्याच्या माध्यमातून मूक भाषेतून देवाण-घेवाण सुरू झाली. स्वरयंत्राचा विकास होत गेला. स्वरातून शब्द व भाषा विकसित झाली. बोली आली. लिपी आली आणि आज प्रमाणित मराठी भाषा झाली. उपलब्ध सर्वमान्य पुराव्यांवरून असे दिसते, की इ.स.पूर्व २५०० ते १५०० दरम्यान आजच्या महाराष्ट्रातील बहुतांशी भौगोलिक भागावर मानवी वसाहती निर्माण झालेल्या होत्या. हे महाराष्ट्रातील पहिले नागरीकरण म्हणता येईल. पुढे इ.स.पूर्व सातशेच्या दरम्यान महाराष्ट्रात दुसरे प्रगतशील असे नागरीकरण झाल्याचे मानतात. म्हणजेच गाव शहर विकास, शासन व प्रशासन विकास, समाजव्यवस्था विकास, विनिमय, भाषा व लिपी वापर, नाणे चलनव्यवस्था, व्यापार व व्यवसाय विकास, दूर प्रदेशाची दळणवळण व्यवस्था, संरक्षण व्यवस्था इत्यादी बाबी त्या-त्या प्रदेशात विकसित झालेल्या होत्या. याचाच अर्थ महाटी भाषेच्या विविध बोलीभाषा, वऱ्हाडी, गोंडी, कोकणी, अहिराणी, घाटी इ. स. पूर्व सातव्या शतकात विकसित झाल्या असाव्यात. तिचे नामकरण मरहट्टी झाले. मरहट्टी भाषा बोलणारा समूह तो मरहट्टा. मरहट्टा समाज ज्या भौगोलिक भागात राहतो तो महारट्टा. मरहट्टा (मऱ्हाठा), महारट्टा हे सर्वच मूळ प्राकृत शब्द आहेत. आजच्या भाषेत थोडक्यात सांगायचे झाल्यास सुमारे चार हजार वर्षांपासून विकसित होत आलेला मरहट्टी भाषा बोलणारा व महाराष्ट्रात राहणारा कृषी व कृषीपूरक व्यवसायावर उदरनिर्वाह करणारा मानव समूह म्हणजे “मराठा समाज” (मऱ्हाटी). भारताच्या भौगोलिक स्थितीनुसार इथे प्रांत, संस्कृती, भाषा, समाज निर्माण झालेले दिसतात. जगभरही तसेच झाले. चीनमधील समाज चिनी, जपानमधील जपानी, भारतामधील भारतीय, इंग्रजी बोलणारे इंग्रज, बंगाली बोलणारे बंगाली, पंजाबी बोलणारे पंजाबी, तसेच मराठी बोलणारे मराठा. महाराष्ट्रात राहतात ते मराठा. थोडक्यात, मराठी भाषा, मराठा समाज व महाराष्ट्र यांचा इतिहास असा प्राचीन आहे. इ.स.पूर्व सातव्या शतकात महाराष्ट्रात व्यवसायांचे रूपांतर जातव्यवस्थेत झालेले नव्हते. महाराष्ट्रात जात व्यवस्था इ.स.च्या नवव्या शतकानंतर म्हणजे सुमारे हजार वर्षांपूर्वीच विकसित झाल्याचे समाजशास्त्रज्ञ मानतात. या काळात आर्य वैदिक संस्कृतीचा प्रभावही नर्मदा नदीच्या उत्तरेकडेच प्रामुख्याने आढळतो. उत्तर भारतात चार्वाक, जैन, बुद्ध मतवादी समूहाशी आर्य वैदिक संघर्ष वाढत गेला. त्यामुळेही इसवीसन सहाव्या-सातव्या शतकात जैन व बौद्ध दक्षिणेकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे आसऱ्यासाठी आले. यातून महाराष्ट्राच्या संमिश्र संस्कृतीची सुरुवात झाली. प्राकृत मराठीवर दक्षिणेकडील द्रवीड प्रामुख्याने कन्नड व तेलगू, तर उत्तरेकडील आर्य संस्कृत भाषेचा प्रभाव वाढला. मरहट्टी, महाटी संस्कृतमध्ये मराठी झाली. मरहट्टा, महाटाचे मराठा झाले. महारट्टाचे महाराष्ट्र झाले. संमिश्र संस्कृतीचे परिणाम समाज जीवनात दिसू लागले. 

आर्य जीवन पद्धतीचा प्रभाव वाढू लागला. एकसंध, एकजीव, एकत्रित मराठा समाज व्यवसायांनाच जातीत रूपांतरित करून विभागला गेला. शेती करणारा कुणबी झाला, कुंभारकाम करणारा कुंभार झाला, तेल काढणारा तेली झाला, विणकाम करणारा विणकर झाला. पुढच्या काळात जाती अंतर्गत विवाह व्यवस्था आली. मराठा हा मूळचा गण तसाच ठेवून मराठा-कुणबी, मराठा- तेली, मराठा-माळी, मराठा-धनगर, मराठा-शिंपी, मराठा-महार, मराठा- कुंभार, मराठा-चांभार इत्यादी नावांनी दहाव्या-अकराव्या शतकांनंतर वरीलप्रमाणे महाराष्ट्रात जातव्यवस्था रुजली. यासोबत देव, देऊळ, देवस्की, धर्म, जात, प्रमुख, जमीनदार, शासक निर्माण होऊन समाजव्यवस्थेत ‘मराठा’ शब्दाचे आकुंचन सुरू झाले. या सामाजिक प्रक्रियेच्या पृष्ठभूमीवरच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी सुरू होत्या; परंतु दुर्दैवाने भक्कम पुरावे उपलब्ध नसल्यामुळे हा राजकीय इतिहासही अंधार युगासारखाच आहे म्हणून तर्कांचा आधार अपरिहार्य ठरतो. 

मौर्यानंतर महाराष्ट्रावर सातवाहनांचे स्थिर राज्य आले. मराठे सातवाहनांचेच वंशज असल्याचेही मत आहे. प्रत्यक्षात सातवाहनांचाही इतिहास अस्पष्ट आहे. इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून सातवाहन, अभिर, त्रैकुटक, वाकाटक, चालुक्य, शिलाहार ते यादव इ.स. १३ वे शतक अशा राजवटी झाल्या. अल्लाउद्दीन खिलजीने सन १३१५ मध्ये यादवांचे राज्य जिंकले. पुढे काही काळ तुघलक • घराण्याची सत्ता आली. दक्षिणेत तुंगभद्रेच्या काठी विजयनगरचे साम्राज्य उभे राहिले. सन १३४७ मध्ये गंगू हसन बहामनीने बहामनी राज्याची स्थापना केली. पुढे ती विभागली. त्यातून गोवळकोंडा (हैदराबाद) कुतूबशाही, विजापूरला आदिलशाही, एलिचपूरला इमादशाही, अहमदनगरला निजामशाही, तर बीदरला बरीदशाही उदयास आली. २३ जानेवारी १५६५ च्या तालकोटराच्या युद्धात विजयनगरचे साम्राज्य अस्तास गेले. दक्षिणेस निजामशाही, आदिलशाही,कुतुबशाही यांच्या सत्ता स्थिर झाल्या. उत्तर भारतात मोगलांचे साम्राज्य विस्तारलेले होते. मोगलांची नजर आता दक्षिणेवर स्थिरावली होती. या काळपर्यंत भारताची भौगोलिक विभागणी उत्तर भाग-नर्मदाच्या उत्तरेकडील ‘हिंदुस्थान’ म्हणून ओळखला जाऊ लागला तर दक्षिण भारतास दख्खन वा दक्षिण म्हणत. दख्खनमध्येच महाराष्ट्राचा समावेश होता. सातव्या शतकात महाराष्ट्रात आलेल्या चिनी प्रवासी ह्यू-एन्त सग यानी मराठा समाजाबद्दल अभिमानास्पद गौरवोद्गार काढलेले आहेत. 

याचाच अर्थ महाराष्ट्रात मराठा समाज पूर्वीपासून होता. शिवाजी महाराजांनी स्वपराक्रमावर स्वराज्य निर्माण केले होते; परंतु विरोधक मोगलशहा, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, पोर्तुगीज महाराजांना बरोबरीचे वा मानाचे स्थान देण्यास तयार नव्हते. यावर मात करण्यासाठी जिजाऊंनी महाराजांना राज्याभिषेक करून विधिवत छत्रपती होण्याची गरज असल्याचे जाणले. पूर्वतयारी करताना लक्षात आले की, स्थानिक पंडित विधी करण्यास तयार नाहीत. छत्रपती वा राजा होण्यासाठी धर्मशास्त्रानुसार ‘क्षत्रिय’ असणे अत्यावश्यक होते. तर पंडितांच्या मते ‘शिवाजी’ शूद्र होते. कारण समाजात द्विवर्ण व्यवस्थेनुसार ‘ब्राह्मण’ व ‘शूद्र’ हेच वर्ण होते. शिवाजी ब्राह्मण नव्हते. जिजाऊंनी स्थानिक पंडितांची विनवणी न करता काशीवरून गागाभट्ट या सर्वश्रेष्ठ पंडितास निमंत्रण दिले. स्थानिक पंडितांनी गागाभट्टांची भेट घेऊन शिवाजी शूद्र असल्याचे सांगितले. यावर मात करण्यासाठी महाराजांचे विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी यांनी एक खोटी कुंडली तयार केली. त्यात शिवाजीचे पूर्वज राजपूत – राणा असल्याचे दाखविले. राजपूत क्षत्रिय मानले. यावरून शिवाजीही राजपूत वंशज ‘क्षत्रिय’ झाले. ही एक राजनीती वा राजकीय खेळी होती. भारतातील मिथक कथानुसार ‘परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली होती.’ तसेच उपनयन विधी बंद झाल्यामुळे भारतात ब्राह्मण व शूद्र दोनच वर्ण शिल्लक होते. याचाच अर्थ त्यावेळी राजपूतही शूद्रच होते; परंतु गागाभट्टांनी हुशारीने महाराष्ट्रातील पंडितांना महाराजांचे क्षत्रियत्व सिद्ध करून गप्प बसवले होते. प्रत्यक्षात मराठा हे राजपुतांचे वंशज असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही. तसेच पंडितांना आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही जास्त जवळची वाटत होती. अकबराचे दर्शन म्हणजे देवदर्शन मानणारे पंडित होते. शिवाजी महाराज विधिवत अभिषिक्त छत्रपती झाले तर त्यांना गुन्हेगार पंडित-ब्राह्मणांना शिक्षा देण्याचे अधिकार प्राप्त होणार होते. शिवराज्याभिषेक समारंभ विनादिक्कत संपन्न व्हावा यासाठी राजपूत वंशज ही दिखाऊ कुंडली व वंशावळ तयार केली होती आणि त्यानुसार ६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक आनंदात संपन्न झाला होता. शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. अत्यावश्यक राजनैतिक काम पूर्ण होऊन यशस्वीपणे प्रत्यक्षात आले होते. तसेच पुढे दक्षिण दिग्विजय, इंग्रजांविरुद्ध लढे, जालना मोहीम, मोगल सरदार दिलेरखान विरोधातील राजनीती, शंभूराजे राजनीती इत्यादी कामात महाराजांना सविस्तर वेळ मिळाला नाही. त्यामुळे तयार केलेली दिखाऊ वंशावळही तशीच राहिली. पुढे अचानक ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचे देहावसान झाले. हा विषय अनिर्णितच राहिला. 

दुसरे म्हणजे मालोजीराजेंनी घृण्णेश्वरच्या शिवमंदिर वेरुळ मंदिरात वंशावळ दाखविणारा एक शिलालेख नोंदवून वा कोरून ठेवला होता. त्यावर राजपूत मुळाचा उल्लेख नव्हता. पुढे तो शिलालेख गायब झाला. मंदिरही उद्ध्वस्त झाले होते. आताचे मंदिर अठराव्या शतकात अहिल्यादेवींनी बांधलेले आहे. त्या शिलालेखातील वंशावळ सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वाचण्यात आली होती; परंतु पुढे पुरातत्व विभागातही तिचा मागमूस नाही. 

महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे लिखाण होय. संभाजी महाराजांनी बुधभूषणम्मधून आपल्या पूर्वजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यात कुठेही त्यांचे मूळ कुळ राजपूत असल्याचा उल्लेख नाही. संभाजी महाराज शिवराज्याभिषेक व गागाभट्टाशी जवळीक ठेवून होते. त्यांना सर्व माहिती होती. तसे असते तर त्यांनी कुठेतरी कुळाभिमान म्हणून राजपूत उल्लेख केला असता. 

या व अशाच विविध पुराव्यांवरून वा तर्कावरून मराठा समाज हा मूळचा महाराष्ट्राचाच मूळ मराठावंशीय आहे हे सिद्ध होते. भोसले एकमेव घराणे राजपूत मानल्यास भोसले नसताना महाराष्ट्रात लढलेले शूरवीर घराणे जाधव, पवार, निंबाळकर, कोंडे, शिळीमकर, ढमाले, ढमढेरे इत्यादींचे काय ? थोडक्यात, मराठ्यांनी स्वतःस राजपूत वंशीय मानून वेगळेपण दाखवू नये. त्यात मोठेपण नाही. राजपूत म्हणजेच राजस्थानातील मराठे असे म्हणता येईल. वंशावळही मान्य केल्यास भोसले राजपूत ठरतात. सर्व मराठा समाज नाही. 

महाराष्ट्रात विविध सत्तांच्या उदयामुळे विशेषतः यादव काळापासून मराठे राजकारणात सक्रिय सहभाग देत असल्याचे जाणवते. यादव व विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मराठे कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाहीत- सरदार-इनामदारापासून देशमुख-पाटीलपर्यंतच्या जहागिरीत काम करू लागले. यापैकीच एक बाबाजीराजे भोसले या मूळ पुरुषांपासून पुढे मालोजीराजे,शहाजीराजे ते छत्रपती शिवाजी राजे उदयास आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. पहिले छत्रपती झाले. या काळापर्यंत भारतासह दक्षिणेतही राज्यकत्यांची नावे घेऊनच राज्यकारभार चालत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात प्रथमच राजाने निर्माण केलेल्या राज्यास घराण्याचे नाव न देण्याचा निर्णय घेतला. आपल्या राज्यास हिंदवी स्वराज्य संबोधले. रयतेचे राज्य म्हटले. महाराष्ट्रातील रयतेचे राज्य. महाराष्ट्रातील रयत म्हणजेच मराठा रयत!! मराठा समाज यावरूनच जागतिक राजकीय इतिहासात या काळाची नोंद ‘मराठेशाही’ नावानेच झालेली दिसते. यावरून शिवकाळात जरी ‘मराठा’ ही एक जात म्हणून विकसित झालेली होती, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील सर्व धर्म, जात, पंथ, जमातीतील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मराठा होय, हीच नीती व भावना जोपासली होती. इतिहासात इ.स. १६०० ते १८१८ हा मराठेशाहीचा काळ मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाळ अवघा पन्नास वर्षांचाच होता. जन्म १९ फेब्रुवारी १६३० तर मृत्यू ३ एप्रिल १६८०. गडकोट किल्ले हेच शिवरायांचे जन्मभर निवास राहिले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य समजून घेऊ.

Leave a Comment