श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 11
खेडबाऱ्याचा मुक्काम लौकरच पुण्याला हलला. शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली. जिजाऊंना अलीकडे शिवाजीचे वर्तनच कळत नव्हते. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत; नाही तर बहुधा फिरतीवर असत. पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरी गेले. त्या वेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून दादोजी परत आले. त्यांनी चौकशी केली. राजे रोहिडेश्वरी गेल्याचे कळले. पंत चिंताग्रस्त झाले. जिजाऊंना म्हणाले,
‘मासाहेब, राजे मध्येच रोहिडेश्वरी बरे गेले? आठ दिवसांपूर्वीच खेडबाऱ्याहूनही गेले होते ना?”
“हो! त्यांना ते ठिकाण फार आवडतं. देवाधर्माचा भारी छंद आहे त्यांना, ‘ “ते काही वाईट नाही! पण मला दुसराच वास येतो.’
कसला?”
‘अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत ? नेताजी, येसाजी, तानाजी, बाजी, बाळाजी, चिमणाजी… किती नावं घ्यावीत ? प्रत्येक खेपेला कोणी तरी नवं दिसतं, तो दादाजी नरसप्रभू तर अलीकडे सावलीसारखा चिकटलाय.’ काय म्हणायचं आहे तुम्हांला ?”
‘मला काही कळत नाही, मासाहेब! राजांच्या वयाची माणसं असती, तर मी समजू शकलो असतो. पण राजांच्या बरोबर लहान-थोर सारे दिसतात. ब्राह्मण, मराठे, महार, रामोशी, प्रभू… अठरापगड जातीचे लोक आहेत. त्यांत देशमुख आहेत, देशपांडे आहेत. मावळे आहेत. राजांच्या मनीचे बेत कळत नाहीत.’
‘विनाकारण कल्पनेचे डोंगर रचता, दादोजी! याचा अर्थ एवढाच की, राजांचा ओढा सर्वांनाच आहे. आणि ते का वाईट?’ दादोजी काही उत्तर देऊ शकले नाहीत. ते तसेच माघारी गेले.
दादोजींना जी शंका आली, तीत काही खोटे नव्हते. शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता. वाड्याची पागा तट्टांनी सजली होती. राजे बाहेर आले, तेव्हा त्यांच्याबरोबर दादाजी नरसप्रभू गुप्ते, येसाजी, तानाजी, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी होती. भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला.
‘भीमा, कुठवर आलं?”
‘पन्नास तलवारी आणि शंभर-एक भाले तयार हाईत.’
‘शाब्बास! आणि इतरांचे ?” ‘तेवी तेवढेच असतील.’
‘चला, निघू या.’
सारे रोहिडेश्वराकडे निघाले. भर दोन प्रहरी रोहिडेश्वरावर सारे पोहोचले. शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज दिसत होते. झऱ्यावर हात-पाय धुऊन ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. दादाजी नरसप्रभूंनी व पुजाऱ्याने पूजा केली. बेल आच्छादिलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी साष्टांग दंडवत घातला. राजे म्हणाले,
‘दादाजी, पुन्हा विचार करा.’
‘विचार केव्हाच ठरला.’ दादाजी म्हणाले, ‘जगायचं असलं, तर वाघाचं जीवन जगू. शेळी म्हणून जगावंसं आता वाटत नाही.’ ‘मग व्हा पुढं.’
राजांनी दादाजींचा हात हाती घेतला. पिंडीवर हात ठेवीत राजे म्हणाले, ‘शंभो, हर हर महादेव! आज तुझ्या प्रेरणेनं आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही, तोवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाही. दिल्या वचनाला अंतर देणार नाही.’
एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला. दादाजींनीही राजांचे अनुकरण केले. नारळ फुटले. प्रसादाचे ताट घेऊन पुजारी बाहेर आला. मंदिराच्या समोर जमलेले शे-सव्वाशे साथीदार हर्षभरित नजरेने राजांच्याकडे पाहत होते.
राजे पायरीवर बसले. प्रसाद वाटला जात होता. येसाजी, बाजी, तानाजी हे सारे राजे आता काय सांगतात, इकडे लक्ष देऊन होते. राजे म्हणाले, ‘येसाजी, आज आम्ही शपथ घेऊन मोकळे झालो. हे शेंदरीलगतचं दैवत स्वयंभू
आहे. यानं आम्हांला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ
हिंदवी स्वराज्याचे. तेही तो पुरे करील. त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी.’ नेताजी हे राजांचे आप्त. वयानेही फार मोठे. ते म्हणाले,
‘भीती कसली?”
‘भीती नाही. पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं, याचा विचार
करतो आहे.’ ‘त्यात इचार कसला ?’ तानाजी म्हणाला, ‘देवाम्होरं शपथ झाली, तेच पहिलं
ठिकाण.”
“म्हणजे?”
‘म्हणजे काय? रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कबज्यात आणू या. कसं?’
‘फार सुरेख! पण गडाची हालत ?”
बाजी म्हणाला, ‘मी फिरून आलोय् गड. लई तर दोनशेपातूर शिबंदी असंल. गडाला मजबुती न्हाई. चारी बाजूंना खिंडारं हाईत.’
‘काय, दादाजी ?’
‘ठरलं! रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची!’ ‘ठीक आहे.’ राजे म्हणाले, ‘उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ.’
‘हर हर महादेव’ ची गर्जना उठली. राजांनी येसाजीला हाक मारली, ‘येसाजी, बाजी, तानाजी, तुम्हां सर्वांची माणसं तयार आहेत ना?’
‘हो.’
‘रोहिड्याच्या पायथ्याला रात्र असतानाच साऱ्यांनी गोळा व्हायचं. आम्ही तिथं पहाटे येऊ. आवाज, गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चूपचाप पार पडलं •सारे रोहिडेश्वराच्या डोंगरावरून परतले. राजे समोर दिसणारा किल्ला पाहत उतरत होते. मध्यरात्र होईपर्यंत राजे वाड्यात जागे होते. लोहारांनी तयार करून आणलेल्या भाले-तलवारींचा ढीग पडला होता. चार लोहारांनी रात्रंदिवस राबून पंधरा दिवसांत
पाहिजे.’
एवढी तयारी केली होती. भीमा म्हणाला,
‘राजे, जरा आगूप कळवायला पाहिजे हतं. बर्च्या तयार झाल्या असत्या.’ राजे हसले. म्हणाले, ‘भीमा, एवढं केलंत, हे काय थोडं झालं?’ हातातले सोन्याचे कडे त्यांनी भीमाला दिले. ते म्हणाले, ‘हे चौघांत वाटून घ्या. ‘तुमच्या हाताचं कडं मोडणार काय आमी? पूजेला हाईल हे!’
राजे वाड्यात आले. मागोमाग भीमा आला. राजे वळले. त्यांनी विचारले,
“काय, भीमा ?’
भीमाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला,
“एक मागनं हाय.’
‘कसलं?’
‘देतो, म्हना?’
‘अरे, तुला नाही म्हणेन का? दिलं!’
‘उद्या जानार हाईसा, तितं मला संगं न्या.’
‘काय म्हणतोस, भीमा ? अरे…’ ‘राजे, मला तलवार चालवाया येते. भाला येतुया. उगीच धंदा करीत न्हाई म्या. तुमीच तलवार दिलीसा, ते काय लांडगं मारत बसू?’
राजांना गहिवरून आले. त्यांनी भीमाला उठविले. पाठ थोपटीत ते म्हणाले,
‘भीमा! तुझ्यासारखीच माणसं हुडकतोय् मी. जाऊ सकाळी.’ आनंदाने भीमा गेला. लोहारशाळेत भली रात्र होईपर्यंत भीमा एकटाच तलवारीला पाणी पाजीत बसला.
भल्या पहाटे राजे स्नान आटोपून बाहेर आले. चौकात भालदार हत्यारी उभे होते. राजांनी पूर्वेकडे तोंड करून उभ्या असलेल्या अश्वावर मांड टाकली. पाठीमागचे स्वार झाले. त्यांत भीमाही होता. राजांनी मनात देवाचे स्मरण करून घोड्याला टाच मारली. आकाशात नक्षत्रे लुकलुकत होती. पूर्वेला अजून पांढरी कड उमटली नव्हती. रात्रीतून पहाट होत असताना राजे रोहिडेश्वराच्या पायथ्याशी पोहोचले. वाटेवर सारे राजांची वाट पाहत होते.
राजांनी उतरताच विचारले, ‘तानाजी, किती गोळा झाले ?’ ‘हजारांवर पन्नास।’
‘ठीक आहे! ज्यांना हत्यारं नसतील, त्यांना हत्यारं द्या.’ शस्त्रे वाटण्यात आली. पूर्वेला उजाडू लागले होते. साऱ्या रानात पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला होता. राजांनी येसाजीला विचारले,
‘येसाजी!’
‘जी?’
“भारे किती तयार आहेत ?’
‘पन्नास आहेत.’ ‘पुरे होतील?’
‘रग्गड ! हत्यारी होते, तेवढे चारी बाजूंनी सोडलेत. इशारत झाली, की गडावर
मिळतील.’
‘आणि तू?’
‘मी, तानाजी आपल्या बरोबर राहू. इशारत आली, की रानखिंडीनं वर जायचं.
माणसं पेरून आलोय मी.’
‘गड?’
‘शांत आहे. कालच सुभाना गडावर वस्तीला गेलाय. त्याची मामी हाय गडावर.’ साऱ्यांच्या चेहऱ्यांवर स्मित झळकले. राजे दादाजींना म्हणाले,
‘दादाजी, तुम्ही इथंच राहा. गड फत्ते झाला, की वर या.”
‘ते नाही जमायचं!’ उमदे दादाजी म्हणाले, ‘रोहिडेश्वरावर अशी शपथ झाली
नव्हती. गडावर तुम्ही, आणि गडाखाली मी?’ “आज प्रभूला शोभलात खरे! तुमच्याखेरीज असलं प्रभुत्व कोण गाजवणार?” राजांनी दादाजींचे कौतुक केले.
पहाटेचा दरवाजा उघडल्याचा चौघडा वातावरणात घुमला. राजे स्वस्थ होते. एक भारेकरी उठला. राजांना मुजरा करून भारा डोक्यावर घेऊन तो चालू लागला. थोड्या वेळाने आणखी दोन भारेकरी निघाले. अधीर भीमाने विचारले,
‘राजे, मी जाऊ?’
‘जा! हुशारीनं. इशारत झाल्याखेरीज काही करायचं नाही.’
‘तेची काळजी सोडा.’
थोडे भारे आणखी गेले; आणि भीमाने भारा उचलला. राजांनी विचारले, ‘तलवार घेतलीस ना?’
भीमाने हसून भाऱ्याकडे बोट दाखविले.सूर्य क्षितिजावर येईपर्यंत रानात फक्त राजे, दादाजी, येसाजी आणि पन्नास मावळे राहिले. रानावर उन्हें फाकत होती. नव्या पालवीचे नानाविध रंग रानावर दिसत होते. येसाजीने राजांना खूण केली. राजांनी तलवार उपसून मस्तकी लावली; आणि
ते गडाच्या रोखाने चालू लागले. एक एक पाऊल सावधगिरीने टाकले जात होते. गडाच्या दरवाज्यावर चौकी-पहारेकरी दरवाजाच्या देवडीवर चिलीम फुंकीत बसले होते. भारे आत जात होते. पावसाळा आता लौकरच येणार होता. गडावर झडी बांधायचे काम सुरू झाले होते. भारे घेऊन जाणारे सरळ गडात जात होते. पण जसे जास्त भारे जाऊ लागले, तसे एकाचे लक्ष त्याच्याकडे गेले.
‘आयला! आजवर झोपले हुते काय भडवे? किती भारं चढत्यात गडावर?’ तोवर आणखीन एक भारा आला. पहारेकऱ्याने हटकले,
‘कुठलं भारं ?’
‘इथलंच जी!’ भारेवाला म्हणाला.
‘गाव?’
“मावळ, जी!’
भारेवाला आत गेला. पाठोपाठ तिघे मुंडासे बांधलेले, ठेवणीतले कपडे केलेले, कमरेला तलवार, हाती भाला घेतलेले गडात घुसले; पहारेकऱ्याकडे न पाहता पुढे जाऊ लागले. पहारेकऱ्याने हाक मारली,
‘आवं पावनंऽऽ…’
काय म्हंतासा?’ एकाने वळून विचारले.
‘काय म्हणणार? अगदी घरागत आतच सुटलासा नी. कोन, कुठलं, सांगशिला, का न्हाई? कुटं निघालासा?”
‘कुटलंसा? लगीन ठरवाया निगालोय् आमी!’ ‘आवो, पन कुनाचं?’
“गडाचं!’
‘आवो, गडाचा पोरगा, म्हंजे गडाचंच की!’
पहारेकरी हसले. एक म्हणाला, ‘आमांस बोलवा लगनाला.’ ‘तुमच्याबिगर लगीन पार पडल व्हय?’ म्हणत तिघे मिशीवर ताव देत गडावर
गेले.
एका पहारेकऱ्याच्या डोक्यात कोड पडली होती. त्याला कुठे तरी खटकत होते. हे भारेकरी, लग्न ठरवायला गेलेले हत्यारबंद इसम त्याला काही सुचेना. त्याच वेळी आणखीन एक भारा आत घुसला. पहारेकऱ्याने कट्ट्यावरून उडी घेतली. तो ओरडला,
‘ए, थांब!’
भारेवाला थांबला.
‘कुठं भारं घेऊन निघालास?”
‘आत, जी!’
‘ते दिसतंय् मला. कुणाच्या घरात ?’
‘वाड्यात, जी!’ ‘किल्लेदाराच्या?’
‘व्हय, जी.’
‘काल हवालदारानं वर्दी दिली व्हती, तेच भारं ?’
‘व्हय, जी!’ भारेकरी म्हणाला.
‘टाका भारा खाली. ‘
भारा खाली टाकला गेला. पहारेकरी ओरडला,
‘सोड भारा.’
देवडीवरचे सारे हसत होते. एकजण म्हणाला,
‘राम्या, कशाला गोतं करतोस त्याचं? जाऊ दे. तिकडे लक्ष न देता रामजी म्हणाला, ‘उघड भारा.
भारेकऱ्याने पाहिले. सूर्य वर चढला होता. तो बेताने वाकला; आणि एकदम तोंडात बोट घालून त्याने शीळ घातली.
‘आयलाऽ! डोंबारी काय ?’ पहारेकरी म्हणाला. तोच भाऱ्यातून तलवार उपसली गेली. उभ्या जागी पहारेकऱ्याचे डोळे ताठरले. क्षणात तो देवडीकडे धावू लागला. त्याने दोन पावले टाकली असतील, नसतील, तो त्याच्या पिंढरीवर घाव बसला. किंचाळत पहारेकरी कोसळला.
देवडीवाल्यांच्या हातून चिलीम केव्हाच सुटली होती. पायावर पडलेला इंगळ झटकत एक उभा राहिला. बाकीच्या दोघांनी त्याचे अनुकरण केले; आणि जेथे तलवारी, भाले ठेवले होते, तिकडे ते धावले.
शीळ घुमताच मागचा भारेकरी सावध झाला. भीमाने भारा खाली टाकला आणि तलवार काढून तो धावू लागला. एक पहारेकरी नगारखान्याजवळ जाऊन पोहोचला होता.खाली चकमक चालू झाली होती; आणि नगाऱ्याचा आवाज गडावर घुमू लागला. गडाच्या चारही बाजूंनी ‘हर हर महादेव’ च्या गर्जना उठत होत्या. हातघाईचे तुरळक सामने होत होते. पाहता-पाहता चारही बुरुजांच्या चौक्या काबीज झाल्या.
गडाच्या किल्लेदाराची झोप अजून उतरली नव्हती. तो धडपडत बाहेर आला. एकच गोंधळ गडावर माजला होता. ‘शिवाजी आला!’ आरोळी उठत होती. किल्लेदार तलवार घ्यायला वळला; पण त्याच वेळी चारही बाजूंनी शिवाजीचे लोक पुढे आले. किल्लेदार गिरफदार झाला.
शिवाजीराजे एका बुरुजावरून हे सारे पाहत होते. गडावर शांतता पसरली. राजे संथ पावले टाकीत पायऱ्या उतरले. साऱ्यांचे मुजरे झडले. अभिमानाने, कौतुकाने साऱ्यांचे चेहरे फुलले होते. भीमाच्या पाठीला जखम झाली होती. राजे म्हणाले,
‘भीमा, अंगावर जखम घेतल्याखेरीज बरं वाटत नाही ?” ‘राजं, करणार काय? नामर्दाची जात ही. पाठीवर घाव घातला!’
‘पळत सुटला असशील!’ तानाजी चिडविण्यासाठी म्हणाला.
‘तर! येशीत जाऊ बघ! दोन मुडदं पडल्यात. किल्लेदाराला समोर आणले गेले. किल्लेदार थरथरत होता. उसन्या अवसानाने तो
म्हणाला, ‘हे बरं नव्हं! सांगून ठेवतो. दीस गमजा चालायच्या न्हाईत ह्या.’ ‘येसाजी, गडावर तोफ आहे?’
‘जी, आहे.’
‘याला तोफेच्या तोंडी द्या.’ राजे म्हणाले. किल्लेदार एकदम राजांच्या पायांवर पडला.
‘राजे, यात काय माझा गुन्हा न्हाई. गड तुमचा हाय! सांगशिला, ती चाकरी करीन.’
राजे हसले. दादाजींच्याकडे वळून म्हणाले,
‘दादाजी! पाहिलंत? ही आदिलशाहीची इमानी माणसं! किल्लेदारांना नजरकैदेत ठेवा. येसाजी, पुढची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही गडावर राहा. बाळाजी, चिमणाजी, गडाची मालमत्ता, धान्य, शिबंदी यांचा हिशेब करा. आम्ही पुण्याला जाऊन ताबडतोब माघारी येऊ.’
गडाच्या बायाबापड्या येऊन राजांच्या पाया पडत होत्या. राजांनी साऱ्यांना धीर, आश्वासन दिले. गडाची शिबंदी राजांची बनली. जखमींना तातडीने डोलीने शिवापूरच्या वाड्यात हलविण्यात आले. गडाच्या प्रथम दरवाज्याशी येताच राजांचे लक्ष नगारखान्यावर फडकणाऱ्या हिरव्या ध्वजावर गेले. राजांनी विचारले,
‘दादाजी! आपला झेंडा आणलात ना?”
‘जी!’ म्हणत दादाजींनी झेंडा पुढे केला.
‘दादाजी, देवाच्या इच्छेनं स्वराज्याचं पहिलं पाऊल पडलं. त्याच देवाचा ध्वज आम्ही यापुढं वापरू; देवाचं राज्य उभं करू.’
नगारखान्यावर राजे गेले. आदिलशाही ध्वज उतरला गेला; आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर भगवा ध्वज फडकू लागला..