छत्रपती संभाजीराजे संघर्ष योद्धा

छत्रपती संभाजीराजे संघर्ष योद्धा

छत्रपती संभाजीराजे-संघर्ष योद्धा
.. नानाभाऊ माळी

          काल दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी कोरेगाव पार्क,पुणे येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक सभागृहात अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित १६ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पार पडले!अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं देशपातळीवर १७९वे साहित्य संमेलन होते!ही साहित्यिकांसाठी विचारांची उत्तम मेजवानी होती!साहित्याचं घुसळण होत राहिलं!विचार मंथनातून,लोणीतून शुद्ध साहित्यरुपी निघत राहिलं!काल साहित्याच्या घागरी भरून भरून नेणारे अनेक रसिकजन होते!कविजन होते!विचारवंत होते!साहित्य तृष्णा भागवून तृप्त मनाने घरी निघालें होते!



सुप्रसिद्ध इतिहास संशोधक,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा.शरद गोरे सर  संमेलनाचे उदघाटक तर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, संशोधक मा डॉ. श्रीपाल सबनीस सर होते!स्वागत अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी अन प्रगतीशील शेतकरी मा किशोर टिळेकर होते तर निमंत्रक म्हणून प्रसिद्ध कवी,आदर्श शिक्षक मा.सूर्यकांत नामुगडे सर होते!



      पहिले सत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सत्यप्रकाश टाकणारा ठरला!छत्रपती संभाजी महाराजांच चरित्र आणि चारित्र्यावर भाष्य करणार भाषण हृदयाला भावलं!स्पष्टवक्ते,निष्कलंक, निर्मळ आणि प्रजादक्ष लोकराजांच्या कार्यकर्तृत्वावर,विविध पैलुंवर सखोल विचारमंथन झालं!पहिले सत्र नामवंत वक्त्यांच्या हृदयस्पर्शी भाषणांनी गाजलं!संभाजी महाराजांच्या आयुष्यावर नेमका प्रकाश टाकतांना त्यांच्यातील उत्तम प्रशासक, कवी-लेखक,बहुभाषिक, बहुआयामी व्यक्तिमत्वावर मतं मांडली गेली!मा. शरद गोरे सर अन मा डॉ सबनीस सरांनी आपल्या भाष्यातून महाराजांच्या कार्य कर्तृत्वाविषयीं विविध पैलूनां स्पर्श केला!



           छत्रपती संभाजीराजे महान योद्धा तर होतेचं,त्यांच्यातील सर्वोत्तम उत्तम प्रशासक असणाऱ्या गुणांची समर्पक मांडणी दोन्ही वक्त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून करून दिली!नकारात्मक इतिहास मांडणाऱ्या इतिहासाकारांनी महाराजांच्या चारित्र्यावर विकृत लिखाण केले होते!त्यांचं चरित्र्य हणन करण्याचा हेतूही त्यात असावा!बदनाम करायचा प्रयत्न असावा!खरा इतिहास लपवून खलनायक करण्याचा डाव रचला गेला असेल!तॊ डाव दोन्ही वक्त्यांनी पुरावे अन इतिसातील संदर्भ घेऊन हाणून पाडला!खोडून काढला!उधळून लावला!

         छत्रपती संभाजी राजे शत्रूशी लढत नऊ वर्षें राज्य चालवीत राहिले!धर्म सहिष्णूता, समानता, समता तत्वाचा अवलंब करीत त्यांनी संपूर्ण समाज एकत्र करायचा प्रयत्न केला होता!त्यांची धर्माविषयीं त्यांचे विचार वैश्विक होते!त्यांच्या बुधभूषण या ग्रंथातून ते अधोरेखित होतं!असं उदघाटक मा गोरे सर यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले !

     साहित्य वास्तवाचा आरसा  असतॊ!साहित्यिक पोटतीडकीने मांडीत असतात!अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे असून कवी, साहित्यिक अन विचारवंत सत्ताधाऱ्यांचें मांडलिक नसावे!साहित्यिक खुशामती करणारा नसावा!साहित्य दिशादर्शक असावं असे परखड विचार अन मत दोन्ही वक्त्यांनी मांडले!

       छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य चालवतांना महिलांसंबंधी व्यापक दृष्टिकोन ठेवला होता!म्हणून त्याची सुरुवात आपल्या राजवाड्यापासूनचं केली होती! त्यांच्या पत्नी महाराणीसाहेबांचं चित्र चलनावरती कोरून घेतले होते! व्यापक दृष्टिकोन ठेवणारे छत्रपती संभाजी राजे रयतेप्रति अतिशय दक्ष होते!समाजप्रिय होते!प्रयोगशील होते!रयतेशी नाळ जोडलेली होती!राजांनी राज्यकारभाराचं प्रारूप मांडलं होतं!असेही वक्त्यांनी इतिहासातील संदर्भ देत मत मांडले!

        छत्रपती संभाजी राजांनी जाती पातीला मूठमाती देऊन सर्वव्यापी समाजाचं आदर्श राज्य चालवलं होतं!त्या काळात त्यांनी जल नीती वापरली होती!जिथे पाऊस भरपूर होतो पण उन्हाळ्यात एकही थेंब पाणी राहात नाही अशा डोंगर दऱ्यातील दुर्भीक्ष ठिकाणी पाणी अडवा पाणी जिरवा ही उत्तम नीती वापरली होती!धनधान्याचा साठा करण्याची उत्तम पद्धत अवलंबून राज्यात वर्षभर धान्य पुरेल इतकं धान्य कोठारे बनवून घेतली होती,इतकं सूक्ष्म निरीक्षण राजांचं होतं!बचती बद्दलही त्यांनी भूमिका मांडलेली आढळून येते!

            छत्रपती संभाजी राजांना अष्टपैलू व्यक्तीमत्व होते!त्यांना १८ भाषा अवगत होत्या असं इतिहासकार सांगतात!ते उत्तम लेखक होते! कवी होते!महायोद्धा होते!महापराक्रमी राजा होते!त्यांचा सर्व व्यापक दृष्टिकोन होता!ममत्व अन मैत्रीबद्दलही त्यांची सर्वव्यापी भूमिका होती!विचार प्रकटिकरण राष्ट्र उन्नतीसाठी असावा ही भूमिका महाराजांची होती!त्यांनी बाभळीच्या झाडाचं अतिशय उदाहरण देऊन उत्तम भाष्य केलेलं सांगितलं जातं असं इतिहासकार  गोरे सर म्हणाले!

          मातीला माते म्हणत असतांना ती कुंभाराच्या पायाखाली तुडवली जाते!एकजीव होते!भट्टीत तापवून नवरूप घेते!मातीच्या यातना वेदनादायी असतात!तिच्या वेदना हृदयाला भिडतात!छत्रपती संभाजी महाराजांच्या हृदयाला वेदनादायी वाटत असे!कनवाळू,हळव्या मनाचे देखील संभाजी महाराजांचं होते!इतकं सूक्ष्म निरीक्षण त्यातून दिसून येतं!तसें त्यांच्या बुधभूषण ग्रंथातून दिसून येतं!

छत्रपती संभाजी महाराजांनीं बिदागी पद्धत राबवली होती!तसं भाष्य त्यांनी केलं होतं!व्यापक विश्वकल्याण त्यांचें विचार होते!त्यांनी प्रारूपास प्राधान्य दिलेले होते!बुधभूषण ग्रंथातून छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक पैलांचा उलगडा होतो!आपल्या भूमिपुत्रांना कुशल आणि कौशल्यज्ञान देणारे पहिले राजे होते!जीवन जगण्याचं कसब अन कौशल्य कौशल्य माणसात आलं पाहिजे असं ते मानत असतं!पोर्तुगीज आणि डचानां प्रचंड कर लावून भूमिपुत्रांच्या उत्पादीत मालाचं संरक्षण केलं होतं!अशा अनेक बाबतीत निरीक्षण करून राजकारभार करणारे छत्रपती संभाजीराजे महान राजे होते!
बुधभूषण ग्रंथाची अर्पण पत्रिका धर्माचार्य गागाभट्ट यांना अर्पण केली दिसते असेही इतिहास संशोधक मा शरद गोरे यांनी सांगितले!

      साहित्यिक वैश्विक भूमिका मांडीत असतो!साहित्यिक आणि विचारवंत समाजाचा दर्शनकार असतो!निकोप दृष्टिकोन ठेवून साहित्य लिहिले गेलें पाहिजे!साहित्यिकांनी काळाशी सुसंगत राहायला हवे अन्यथा नोकिया मोबाईल सारखी स्थिती व्हायला वेळ लागतं नाही असंही मा.गोरे सरांनी आपल्या उदघाट्नपर भाषणात मत मांडले!संत कबीर, संत तुकाराम महाराज आदी महासंतांचा आदर्श मानणारें छत्रपती संभाजी राजे होते!

        छत्रपती शिवरायांचा हा छावा रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत लढला!झुंज देत राहिला!अखेर पर्यंत आपल्या पौलादी छातीवर वार झेलत, लढत राहिला!धर्म रक्षणासाठी लढत राहिला!स्वधर्मासाठी प्राणाहुती देत राहिला!स्वराज्यातील काही देशद्रोही अन फितूरांमुळे शत्रूच्या कैदेत प्राणायातना भोगत भारतीय इतिहासातील पानावर अमर झाले!त्यांचं वैश्विक योद्धा म्हणून नाव कोरले गेलें!

छत्रपती संभाजी राजांचा नाट्यमय जीवन संघर्ष,लढा त्यांच्या राजमहलातून सुरू झाला होता!प्रचंड जीवन संघर्ष करीत सावत्र आईशी थोरले पुत्र म्हणून चाललेंला संघर्ष न्याय होता!राजगादीचें पहिले हकदार, वारसदार जेष्ठतेमुळे त्यांना मिळायला हवा होता!लहानपणापासूनचं संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता!बुधभूषण हा ग्रंथ समजदारी, युद्धनीती, राजनीती, निसर्ग,पर्यावरण अशा सर्वांगानां स्पर्श करतो!

           इतिहासकार मा.गोरे सरांनी छत्रपती संभाजी राजांच्या  सामाजिक, सांस्कृतिक पैलूवर स्वतंत्र मतं मांडले आहेत!राजे ९ वर्षांत १२० लढाया लढलेले संघर्ष योद्धा होते!छत्रपती संभाजी राजांचे उदात्त विचार समाजमनात रुजविण्याचं महान कार्य इतिहास संशोधक मा शरद गोरे सर करीत आहेतं!

छत्रपती संभाजी राजे विद्वत्तेच्या बाबतीत महान आहेत!विश्वधर्म मानणाऱ्या राजांची विश्वात्मक दृष्टिकोन दिसून येतो!महाराष्ट्र सरकारच्या युगपुरुषांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजी राजांचं नाव आलेलं आहे!त्यांचं नाव राज परीपत्रकात आलेलं आहे!अशा अद्वितीय संघर्ष योध्यास शत शत मानाचा मुजरा!
🚩🚩🚩🚩👏🏼🚩🚩🚩🚩
***************************
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१७ डिसेंबर २०२४