मराठा आरक्षण आवाहन
पुरुषोत्तम खेडेकर चिखली
संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ
दिनांक.. २८-१२-२०२३
विषय – राज्य मागासवर्ग आयोग माहिती फॉर्म भरणे
जय जिजाऊ मराठा बंधू भगिनींनो व सर्वच समाज बांधवांनो ,
सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०२१ च्या निकालानुसार मराठा समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे असे मानले जाते.या कारणाने मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यात आले होते.
तरीही या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनास सूचना केली होती की राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे अत्यंत बारकाईने सर्वेक्षण करून घेणे. या सर्वेक्षणात मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागासलेला असल्याचे स्पष्ट झाले तर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सरसकट राज्याच्या अखत्यारीतील पन्नास टक्के आरक्षणातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे.थोडक्यात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याची ही शेवटची संधी आहे.
समाज बांधवांनो,सर्वेक्षण करून मराठा समाजातील सामाजिक मागासलेपण ठरविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे कर्मचारी व सदस्य राज्यभरातील सर्व शहरे व गावांमध्ये जाऊन सर्वेक्षण करत आहेत.आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे.या फॉर्ममध्ये सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज ठरविण्यासाठी प्रश्न विचारले आहेत. तुम्हाला अत्यंत सावधपणे प्रश्न समजून घेऊन सविस्तरपणे योग्य उत्तर द्यावे लागते.
गंभीरपणे विचार करून योग्य उत्तर निवडा
बांधवांनो,आपणास विनंती आहे की कृपया मोठेपणा दाखवण्याच्या नादात चूकीची माहिती देऊ नका.अंधश्रद्धा,कालबाह्य रुढ्या प्रथा परंपरा, बालविवाह ,स्त्रि भृण हत्या,मुलगा मुलगी भेद,महिला सन्मान व शिक्षण, जादूटोणा व बुवाबाजी,अवैज्ञानिक विचार अशा अनेक कारणांमुळे मराठा समाज मागे राहिलेला आहे. हे खरे आहे.कृपया भंपक मोठेपणा दाखवून आत्मघातकी माहिती देऊ नका.राज्य मागासवर्ग आयोगाचे पथके कदाचित तुमच्या आजूबाजूला पोचलेले असतील. वर्तमानपत्रात फॉर्म छापून आला असेल.सामाजिक -१०० , शैक्षणिक -८० तर आर्थिक -७० असे एकूण २५० गुण आहेत. काही समजले नाही तर विचारा. मराठा आरक्षण लागू होण्यासाठी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला असणे अत्यावश्यक आहे.तरी तयारीला लागावे.सर्वच शेजारी,सहकारी,मित्र परिवार,नातेवाईक , पाहूणे व परिचितांना सांगावे.फॉर्म मिळवून समजून घेण्यासाठी आपसात चर्चा करून उत्तरे मांडा.
गटचर्चा करा
तसेच मराठा सेवा संघ व ३३ कक्ष मध्ये कार्यरत सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सगळीकडेच फिरुन समाजाला जागृत करावे. मार्गदर्शन करावे . वेळ कमी आहे . फारतर एखादा आठवडा उपलब्ध आहे . घरात न बसता घराघरात जाऊन फॉर्म समजावून सांगणे . राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवावी . काही झाले तरी कृपया टाळाटाळ करु नये . तसेच तुम्ही सुद्धा फॉर्म व उत्तरे योग्य प्रकारे समजून घेणे .
पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी ही शेवटची संधी आहे
कृपया उठा व कामाला लागा.चालढकल करु नका.
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण ही नववर्षाची भेट देण्यासाठी सज्ज रहा …
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
कृपया ही माहिती जास्तीत जास्त मराठा कुटुंबातील सदस्यांना पाठवावी .
जय जिजाऊ व सदिच्छा.
पुरुषोत्तम खेडेकर चिखली
विलासदादा पाटील
राष्ट्रीय अध्यक्ष
तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद
हे पत्रक आपले सर्व नातेवाईक, मराठा मित्र मंडळी व परिचितांना पाठवावे, ही आग्रहाची विनंती
