चला जाऊया गड-किल्ल्यांवर
(प्रतापगडावर मज शिवराय दिसती)
नानाभाऊ माळी
दिनांक २१जानेवारी २०२४ रविवारी आमच्या तुकडीचे सेनापती आदरणीय वसंतराव बागूल सरांच्या देखरेखीखाली आम्ही प्रतापगडावर गेलो होतो!हिवाळा त्यात हिरवळ, आम्ही देहभान विसरलो होतो!शुरांच्या महाकीर्तीने अचंबित झालो होतो!सह्याद्री पर्वत डोळ्यात बसत नव्हता!आम्हासं प्रतापगड दिसत होता!
इतिहासातील अनंत पानांवर राजे राज्य करीत आहेत!छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार जावळीच्या घनदाट जंगल खोऱ्यात ढोरप्याच्या उंच डोंगरावर प्रतापगड बांधला गेला!मोरोपंत पिंगळे यांच्या कल्पनेतून किल्ला बांधला गेला!कष्टाने, मेहनतीने,आर्थिक झळ सहन करीत अवघ्या दोन वर्षात अतिशय मजबूत तटबंदी असलेला इतिहास साक्षी किल्ला बांधला गेला!संपूर्ण जावळी खोरं जंगलांनी अच्छादित होतं!त्यात प्रतापगड मान उंचावून उभा दिसतो!समुद्र सपाटी पासून ३५५६ फूट उंचावर आपली मान ताठ करून उभा असलेला किल्ला युद्ध कौशल्यानें परिपूर्ण असावा!
किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर, शिवलिंग मंदिर,चिलखती बुरुज, केदारेश्वर मंदिर,दिंडी दरवाजा, हनुमान मूर्ती मंदिर,राजामाता जिजाऊंचा महाल,पलीकडे अरुंद असा टेहळणी बुरुज!शत्रू गडावर पोहचणार नाही अशी किल्ल्याची बांधकाम रचना!घनदाट जंगलात सह्याद्री पर्वताशी स्पर्धा करणारं उंच शिखरावर एकटाच उभा असलेला प्रतापगड छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचं द्योतक आहे!प्रतापगडावरील छत्रपती शिवरायांचा आश्वारुड पुतळा जना-मनातं देशप्रेमाची हाक देतांना दिसतो!हिंदवी स्वराज्याची आठवण करून देत असतात!
महाबळेश्वर,पांचगणी,वाई सारख्या जंगलांनी वेढलेल्या,निसर्गाने नटलेल्या ठिकाणाहून पुढे पसरणीचा घाट-माथा पार करीत जावळी खोऱ्यात एकांतात उभा असलेल्या प्रतापगडाच्या दिशेने आदिलशाही सरदार अफजल खान चाल करून येत असतो!छत्रपती शिवरायांना आव्हान देत येत असतो!अतिशय क्रूर,मग्रूर,धीप्पाड अफजल खान आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व हिंदू मंदिरानां नष्ट करीत पूढे येत होता!
युद्धनिती चतुर राजे… अफजल खानास प्रतापगड पायथ्याशी येण्यास भाग पाडतात!जड बुद्धी,गर्विष्ठ, रानटी,अहंकारी अन राक्षशी वृत्तीचा अफजल खान शिवरायांच्या नीती कौशल्य जाळ्यात फसतो!पुढे स्वतःचा नाश करून घेतो!अहंकाराचा नाश होतं असतो!छत्रपती स्वतः शिवावतार होते असं मानलं जातं!छत्रपती शिवरायांनी वाघ नखानीं अफजल खानाचा वध केला! प्रतापगडाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला!…. कसा तो बघा
“भीती एक भूत असतं!माणूस स्वतःला खात असतो!भीतीपोटी राक्षस दिसतो!लोभ,हव्यासांशी शत्रू होतो!कधी माणूस माणसाचा मित्र होतो!फक्त सत्ताधिकार पाहिजे असतो!बळी कान पिळी होतो!दमनातून सत्ता येते!येथून स्पर्धा सुरु होते!विजेता सत्ताधीश होतो,पूढे तो शक्तिमान होतो!विजेता रयतेचा राजा होतो!रयतेचा शासक होतो!शासकाला शत्रू असतात!डोळ्यासमोर गनिम दिसतात!राजा सुरक्षित भूमी शोधतो! दगडं-चुन्यात भिंती उभ्या राहतात!दगडांची मोठी भिंत होते!तटबंधी अभ्यद्य होते!शासक सुखाचा श्वास घेतो!आनंदी सुखाचा घास घेतो!राजा रयतेचा कैवारी होतो!युक्ती-शक्ती एक होते!भक्कम उत्तम काम होतं,तेथे किल्ला जन्म घेतो!
अहो!!!किल्ला तर एक दास असतो!राजाचाचं गुलाम असतो!किल्लेदार लढत असतो!लढाईत किल्ला ढासळतं असतो!बुरुज-तटबंदी घायाळ होतात!शत्रू कधी जिंकत असतो!तोचं किल्ल्याचा राजा होतो!किल्ला पून्हा गुलाम होतो!किल्ला पुन्हा पुन्हा ढासळु लागतो!पाषाणी तटबंदी पडक्या होतात!तलवारीने हिंसा होते!हिंसेतून रक्त सांडते!शक्ती सत्तेने परिवर्तन होतें!नवी सत्ता काबीज होते!विजेत्यास दास सलाम करतो!किल्ला पुन्हा गुलाम होतो!
नवी संस्कृती झेंडा गाडते!जुनी संस्कृती जखमी होते!नवी संस्कृती मीठ चोळते!जुनी संस्कृती रक्त सांडते!सुडाग्नी किल्ल्यावर भडकत राहतो!कधी अस्मितेला जाग येते!अस्तित्वाची लढायी होते!किल्ला पुन्हा ढासळत राहतो!जीर्ण-शिर्ण बुरुज पडतात!किल्ला पुन्हा गुलाम होतो!
जीवंत सारें मातीत पूरतात!जीवंत सारे जाळूनी टाकतात!किल्ला एकटा उभाचं असतो!किल्ला पिढ्या मोजीत बसतो!इतिहास जीर्ण पाने किल्ल्यावर उडत राहतात!पाने मोजीत किल्ला डागडुजी होते!जिंकणारे काळ पडद्यात लुप्त होतात!हरणारे ही निघूनी जातात!किल्ला एकटा उभा असतो!अवशेषातून जीवंत असंतो!ढासळून-ढासळून शेष राहतो!किल्ला कधी बेचीराख होतो!
…….मग काळ लोटूनी सूर्य उगवतो!राखेतूनी नवी फडफड होते!फिनिक्स होऊनि उड्डाणं घेतो!माँ जिजाऊंचां सुपुत्र येतो!भगवा शिवनेरीवर फडकू लागतो!भगवी पताका मंदिरं दिसतं!श्रद्धेचां मंदिर गाभारा होतो!तेथे मज शिवराय दिसती!सह्याद्री पर्वतात घनदाट वृक्ष दिसती!जावळी खोर काबीज करती!शिवाराय रयतेचे राजे होती!रयतेचा राजा उत्सव करती!उंच सह्याद्री राजाचां होतो!प्रतापगडाशी अफझल येतो!पायथ्याशीचं खानाचा मुडदा पडतो!तेथे मज शिवबा दिसती!सह्याद्री शिखरावरं जयजयकार होतो!तेथे देव-देश-धर्म दिसती!पताका भगवी फडकू लागतीं!प्रतापगडावर भगवा फडकतीं!प्रतापगडावर मज राजा दिसती!खेडे-पाडे गुमान हसती!अंधार चिरून प्रकाश येतो!तेथे मज शिवराय दिसती!”
…. नानाभाऊ माळी
हडपसर, पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२५डिसेंबर २०२४



1 thought on “प्रतापगडावर मज शिवराय दिसती”