शिवरायांचे बालपण व जन्म

शिवरायांचे बालपण व जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सूर्यास्त समयी किल्ले शिवनेरीवर झाला. आईचे नाव जिजामाता तर पित्याचे नाव शहाजीराजे भोसले होते. राजकारण व लढायांच्या धामधुमीत शहाजीराजांनी गर्भवती जिजाऊस सुरक्षिततेच्या दृष्टीने बाळंतपणासाठी नोव्हेंबर १६२९ दरम्यान शिवनेरीवर ठेवले होते. शिवनेरी त्या काळात निजामशाहीत होता. शहाजीराजेंचे थोरले सुपुत्र संभाजी यांचे सासरे विजयराव श्रीनिवासराव देशमुख हे त्यावेळी शिवनेरीचे किल्लेदार होते. त्यांची मुलगी जयंती हिचा विवाह संभाजीसोबत झालेला होता.

शहाजीराजांची आदिलशहासोबत ताटातूट झाली होती. निजामाने लखुजीराजेंची क्रूर हत्या केली होती. मोंगल बादशहा शहाजहान मोठी फौज घेऊन आदिलशाही व निजामशाही जिंकण्याच्या इराद्याने ब-हाणपूरला पोचत होता. आदिलशाहीने शहाजीराजांची खाजगी पुणे जहागीर सन १६३० च्या सुरुवातीलाच उद्ध्वस्त केली होती. राजनैतिक गरज म्हणून शहाजीराजेंनी मोगलाशी संधान बांधून पुणे-इंदापूर जहागिरीसह स्वत:चाही जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. शहाजहानलाही आनंद झाला. कारण आदिलशाही वा निजामशाहीपासून शहाजीराजांना तोडल्याशिवाय दक्षिणेत शिरकाव करणे अवघड असल्याचे शहाजहान जाणून होता. यामुळे शहाजीराजेंना पुत्रजन्माचा निरोप मिळूनही त्वरित शिवनेरीवर येऊन पुत्रमुख बघता आले नव्हते.. मोगलांकडील सेवेमुळे शहाजीराजेंना जुन्नर परगणा जिंकून स्वत:कडे ठेवता आला, त्यामुळे निजामशाही ही खिळखिळी होऊ लागली. या वातावरणात शहाजीराजेंनी जिजाऊसोबत सल्लामसलत करून नवबालकाचे नामकरण इत्यादी विधी उरकले. जिजाऊंना स्वतःच्या हेरखात्याकडूनही निजामशाही, आदिलशाही व मोगलशाहीतील हालचाली समजत होत्या.

shivaji maharaj balpan
shivaji maharaj balpan

शिवनेरी शहाजीराजांच्या व्याह्यांच्या ताब्यात असला तरी त्यांचा मोगलांवर विश्वास नव्हता. जिजाऊसह मुलांच्या संरक्षणासाठी शहाजीराजेंनी पेमगढ किल्ल्याची दुरुस्ती करून त्याचे नामकरण शहागड केले. काही दिवस शहाजीराजे जिजाऊ, बाल शिवबा व इतर कुटुंबकबिला घेऊन शहागड, माहुली परिसरात राहिले. मोगलांनी सन १६३३ मध्ये निजामशाहीत बेदिली निर्माण केली. शहाजीराजांनी जिजाऊ व बाल शिवबास आईच्या भेटीसाठी सिंदखेड राजास रवाना केले. त्यानंतरची साधारण अडीच वर्षे बाल शिवबांची सिंदखेड राजा येथे गेली. सन १६३६ च्या शेवटी शहाजीराजे व आदिलशहा – मोगलशहा यांचा तह झाल्यावर जिजाऊ, शिवबा व सर्वच कुटुंबकबिला पुणे जहागिरीत परतले. यावेळी बाल शिवबांनी सहा वर्षे पूर्ण केले होते.

या सहा वर्षांपैकी पहिली दीड-दोन वर्षे शिवनेरी, १६३० ते १६३२, शहागड व पुणे जहागीर १६३२-३३, सिंदखेड राजा १६३३-१६३६, पुणे जहागीर व परिसर- १६३६ चा शेवटचा अर्धा भाग. या काळात त्यांच्या सोबत जिजाऊ, सावत्र आई तुकाई, थोरले बंधू संभाजी, वहिनी जयंती, सावत्र बंधू व्यंकोजी असे शहाजीराजे वगळता उर्वरित सर्वच कुटुंब होते. किल्ले शिवनेरीवरच जिजाऊंनी बाळावर आवश्यक बालसंस्कार कान टोचणे, जावळ काढणे, अन्नग्रहण, सूर्यदर्शन इत्यादी संस्कारांसह बालसंगोपनातून आवश्यक नीतितत्त्वांचे संस्कारही केले.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अक्षर ओळखीस सुरुवात झाली. सिंदखेड राजास औपचारिक व अनौपचारिक शिक्षणासोबतच अनेक विषयांशी तोंड ओळख करून देण्यात आली. बाल शिवबा इतर मुलांच्या तुलनेत अभ्यासात, मैदानी खेळात, शस्त्रविद्येत, शास्त्रविद्येत, भूगोल व भाषा परिचय अशा सर्वच विषयांत अग्रेसर व तल्लख असल्याचे त्यांच्या पंतोजींचे मत असे.जिजाऊही स्वतः शिवबांच्या बालविकासावर विशेष ध्यान देत असत.

याच बालवयात जिजाऊंनी शिवबावर अनेक सामाजिक एकलमयतेचे विचार व संस्कार पेरले. सामाजिक, जातीय, धार्मिक, आर्थिक वा तत्सम विषमतेविरोधात वयाच्या सहाव्या वर्षीच बाल शिवबांचे मन पक्के झालेले होते. ते अजून घट्ट करण्यासाठी जिजाऊंनी बाल शिवबास सरदार जहागीरदाराचा लाडावलेला मुलगा म्हणून न वाढवता सर्वसामान्य रयतेतील शेतकरी-कष्टकरी कुटुंबातील मुलासारखेच घडविले. त्यासाठी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शिवनेरी- शहागड सह्याद्रीच्या मावळखोऱ्यातील कुणबी, आदिवासी, रामोशी, कोळी, कुंभार, न्हावी, लोहार, धनगर, मुसलमान, महार, मातंग, कातकरी मुले शिवबांचे सवंगडी झाले होते. तोच कित्ता सिंदखेड राजामधील सुमारे अडीच वर्षांच्या काळात गिरवला गेला. अशा रीतीने जिजाऊंनी योग्य बालवयात शिवबावर मानवतावादाचे, समतेचे, अन्याय-अत्याचार विषमतेविरोधाच्या आचार-विचारांचे बीजारोपण केले होते.

शिवाजी महाराजांचे बालपण
शिवाजी महाराजांचे बालपण

ते अधिक बलवान होण्यासाठी जिजाऊ बाल शिवबास प्राचीन इतिहासातील काही रोचक कथा उदाहरणासह सांगत असत. अशा रीतीने बालवयातच परिपक्व झालेले शिवबा सन १६३६ मध्ये वडिलोपार्जित; परंतु आदिलशहा सरदार मुरार जगदेवने सन १६३० मध्ये उद्ध्वस्त केलेल्या पुणे जहागिरीत परतले. मोगलशहा व आदिलशहासोबत १६३६ मधील झालेल्या तहानुसार शहाजीराजांना त्यांची सर्व वडिलोपार्जित; खाजगी जहागीर परत मिळाली होती. त्याबाबतचे सर्व मालकी व मुलकी अधिकार शहाजीराजास मिळाले होते. एका अर्थाने शहाजीराजांच्या स्वतंत्र राज्यास (वा स्वराज्यास) मोगलशहा व आदिलशहाने अप्रत्यक्ष मान्यताच दिलेली होती.या खाजगी जहागिरीचे सर्वांगीण मालकीचे अधिकार शहाजीराजांकडे होते. त्यामुळे फौजदारी व मुलकी कायदे अधिकार, कर आकारणी, दैनंदिन प्रशासन, शासन, नेमणुका सर्वाधिकार शहाजीराजांनाच होते. असे असले तरी मध्यंतरीच्या धुमधामीत जवळपास पाचेक वर्षे जहागिरीकडे पूर्ण लक्ष देता आले नव्हते. म्हणून शहाजीराजांनी सिद्दी हिलाल या विश्वासू हबशी सहकान्यास जहागिरीतील संरक्षण अधिकारी नेमले. याप्रमाणे काही जबाबदार कर्मचारी, अधिकारीही नेमले.

या जहागिरीत काही महिने थांबून शहाजीराजांनी सर्व कुटुंबास आपले वैभव प्रथमच एकत्रितपणे दाखवले. या अल्पशा काळात शहाजीराजांच्या नजरेत बाल शिवबांचा चौकसपणा, तेज बुद्धी, सामाजिक जाण, अन्यायाविरोधातील चीड, भाषेवरील पकड, राजनैतिक शहाणपण, शत्र व शास्त्र परिचय इत्यादी बाबी भरल्या. शहाजी राजे, जिजाऊ, संभाजी, शिवबा, व्यंकोजी जहागिरीतील प्रमुख वतनदार, देशमुख, पाटील, शेतकरी, गावकरी यांना भेटले. सर्वांच्या ओळखी झाल्या. जहागिरीबाहेरील अनेक जुने सहकारीही शहाजीराजांच्या सदिच्छा भेटीसाठी येऊन मसलत करत होते. आता शहाजीराजांचा दर्जा आदिलशहाचे फर्जंद (प्रधानमंत्री वा राजपुत्र दर्जा) झालेला होता. आदिलशहा बादशहानंतरचा दुसरा सन्मान शहाजीराजांना प्राप्त झाला होता. यातून शहाजीराजांनी खाजगी जहागिरीची देखभाल करण्याच्या नावाखाली काही जुन्या व काही नव्या विशेष विश्वासातील वतनदारांना जोडून घेतले. त्यांचा विशेष परिचय जिजाऊ व शिवबासोबत करून दिला. या दरम्यान जिजाऊ व बाल शिवबांनीही जहागिरीत फेरफटका मारण्याच्या नावाखाली ग्रामस्थ, शेतकरी, कष्टकरी, सामान्य रयतेशी जिव्हाळ्याचा संवाद साधला. ग्रामस्थांसोबत एकत्रित मांडीला मांडी लावून जेवणे केली.

मुक्काम केले. बाल गोपालासोबत खेळले, त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही सरदारकीचा अहंगंड नव्हता. गावच्या पोरांना शिवबा आपल्यापैकीच एक वाटू लागले. शहाजीराजांच्या चाणाक्ष नजरेतून शिवबांचे हे वेगळेपण सुटू शकले नाही. पुणे जहागिरीचा स्वतंत्र कार्यभार भविष्यात शिवबाकडे सोपवून आपल्या व जिजाऊंच्या कल्पनेतील रयतेचे स्वराज्य निर्माण करू शकू, असा विचार जिजाऊ-शिवबांच्या हालचालीवरून शहाजीराजेंनी मनात पक्का केला असावा. याच उद्देशाने शिवबास मोकासा नेमले असावे.अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या बालपणाचे टप्पे करता येतील. आपल्या लक्षातच आले असेल, की शिवरायांच्या जीवनाची सुरुवात गर्भावस्थेतील दगदगीपासूनच सुरू होते. शहाजीराजांच्या अस्थिरतेमुळे गर्भावस्थेतील जिजाऊंनाही सलग महिना-दोन महिने स्वस्थतेने एका ठिकाणी निवांतपणे राहता आले नव्हते.

शिवरायांचे बालपण माहिती
शिवरायांचे बालपण माहिती

सह्याद्री वा इतर अवघड डोंगराचा प्रदेश. रात्रंदिवस शत्रू पाठीवर. जिजाऊही या अवस्थेत घोड्याच्या पाठीवर. अनेकदा एकट्या स्वतंत्र घोड्यावर तर कधी कधी पतीसोबत एकाच घोड्यावर. अंगावर चिलखत, डोक्यावर शिरस्त्राण, पाठीवर भलीमोठी ढाल आणि कंबरेला एक म्यान केलेली तलवार. सोबत धारदार विशेष कट्यार. एका हातात घोड्याचा लगाम, तर उजव्या हातात लखलख चमकणारा पट्टा किंवा तलवार. यातून सैन्यासह शहाजीराजांच्याही अंगात वीरश्री संचारत असे. कारण समोर सतत दुर्गेपेक्षाही रुद्रावतारी वीर स्त्री जिजाऊ दिसत असे. जिजाऊंच्या मनात समोर आलेला शत्रू उभा कापून काढावा अशा भावना निर्माण होत.

आपल्या पोटात गर्भ आहे याचेही भान अनेकदा युद्धप्रसंगी जिजाऊंना राहत नसे. नंतर उसंत मिळाल्यावर जिजाऊ गर्भातील बाळाला समजावत असतील. बाळा, थोडी दगदग सहन कर. ज्या बालकाला गर्भावस्थेत असताना आपल्या वीरमातेने अशा प्रकारचे संस्कारक्षम बनविले असेल, त्या बालकाला प्रत्यक्ष जीवनात अभिमन्यूपेक्षाही जास्त शौर्य प्रदर्शनाची संधी प्राप्त झाली. कारण जिजाऊंनी शिवबास अभिमन्यूसारखे अर्धवट शिक्षण गर्भावस्थेत असतांना वा बालपणातही दिलेले नव्हते. स्वतः माताच गर्भाशी संवाद साधून त्याच्या जन्माचे कार्य त्यास सांगत असे. यातून शारीरिक वाढीसह गर्भातील बाळाचा मेंदूही सशक्त होत होता.

shivrayanche balpan in marathi
shivrayanche balpan in marathi

म्हटले तर दगदग, म्हटले तर संस्कार. अशा रीतीने शिवबांचे बालपण गेले. सहा वर्षे संपली; पण या वयातच शिवबांचे वेगळेच शहाणपण शहाजी-जिजाऊस खुणावत होते.आणि याच एका नव्या आशेने शहाजी-जिजाऊ आपला सर्व कुटुंबकबिला घेऊन पुणे जहागिरीकडून सन १६३७ च्या सुरुवातीस आदिलशाहीतील कर्नाटकांकडे-विजापूर-कंपिली करत बेंगळूरला पोचले. विजापूरला सुलतान आदिलशहाने शहाजीराजांना त्यांच्या पुणे-सुपे इंदापूर जहागिरीचे स्वतंत्र अधिकार जाहीर केले. त्यांना फर्जंद किताब दिला गेला.

शिवरायांचे बालपण व जन्म
शिवरायांचे बालपण व जन्म

1 thought on “शिवरायांचे बालपण व जन्म”

Leave a Comment